05 March 2021

News Flash

‘कान’ गोष्टी

कान म्हणजे पंचेंद्रियांपैकी एक. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा अर्थ लावण्यासाठी हे इंद्रिय मदत करते. मात्र कानाबाबत अनेक गैरसमज आहेत.

| July 25, 2015 07:54 am

कान म्हणजे पंचेंद्रियांपैकी एक. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा अर्थ लावण्यासाठी हे इंद्रिय मदत करते. मात्र कानाबाबत अनेक गैरसमज आहेत. खरे तर शरीरातील इतर भागांप्रमाणेच आरोग्य नीट ठेवण्यासाठी कानात यंत्रणा असते. मात्र ‘मळ’ काढण्याच्या नावाखाली आपण या यंत्रणेची घडी बिघडवतो आणि त्यानंतर कान दुखतो म्हणून तक्रार करतो.
कानाचे सर्वसाधारणपणे तीन भाग पडतात. बाहेरच्या भागात आपल्याला दिसत असलेली कानाची पाळी, त्याच्या आत कानाचा पडदा व त्याभोवतीचा दीड सेंटीमीटरचा भाग व त्याहीपलीकडे आणखी एक भाग असतो. सगळ्यात आधी कानासंबंधीचा सर्वात मोठा गैरसमज दूर करायला हवा. कानात मळ साठलाय, असे जे आपण म्हणतो तेच चुकीचे आहे. कानाच्या आतील भागातील पडदा हा अत्यंत नाजूक असतो. त्याचे संरक्षण करण्यासाठी त्याच्यापासून दीड सेंटीमीटपर्यंतच्या त्वचेमध्ये मेणासारखा चिकट द्रव पाझरणाऱ्या ग्रंथी असतात. हा द्रव पाण्याला प्रतिबंध करतो. त्याचप्रमाणे प्रतिजैविक (अ‍ॅण्टिबायोटिक), बुरशीविरोधी (अ‍ॅण्टिफंगल) तसेच (अ‍ॅण्टिसेप्टिक) क्षमताही या चिकट द्रवामध्ये असते. आपण मात्र मळ म्हणून हा द्रव काढून टाकतो. खरे तर हा मळ सुकून कानामधून आपोआप बाहेर उडून जात असतो. कान साफ करण्याच्या शरीरातील या यंत्रणेमुळे कानाचे आरोग्य चांगले राहते. आपण मात्र अनेकविध उपकरणे वापरून कान साफ करण्याच्या मागे लागतो. यात कान साफ तर होत नाही मात्र कानाच्या पडद्याला इजा होण्याची शक्यता असते. कान साफ करण्यासाठी मिळणाऱ्या बड्सवरही डू नॉट इन्सर्ट इन द इअर अशी सूचना असते. कानाच्या बाहेरच्या पाळ्या साफ करण्यासाठीच ते वापरायचे असतात. हे सर्व लक्षात घेऊन कानात विविध वस्तू घालून ते साफ करण्याची सवय आधी सोडून द्यायला हवी.
कानाची रचना अशा प्रकारची असते की त्यात सहसा बाहेरचा कचरा जात नाही. कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या कानातही तेथील धूलिकणांचा किंचित भाग आढळतो. त्यामुळे कानातील मळाबाबत खरे तर फारशी चिंता करण्याचे कारण नाही. मात्र कानातील मळ काढून टाकण्यासाठी त्यात पीन, पेन्सिल, बड्स घातले जातात. यामुळे मळ बाहेर येण्याऐवजी आत ढकलला जातो. त्यामुळे तो सुकून बाहेर पडण्याची शक्यता कमी होते. हा मळ साचून कडक झाला तर मग कमी ऐकू येते, खाज येते. अशा वेळी हा मळ मऊ करण्यासाठी त्यात औषध टाकले जाते. यामुळे मळ आपोआप बाहेर येत नाही तर कानाला न खरचटता मळ बाहेर काढण्यास डॉक्टरांना सोपे जाते. हे सर्व सांगण्याचा उद्देश एकच.. कानाचे आरोग्य टिकवायचे असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा.
कानाबाबत अनेक गैरसमज आहेत आणि त्यामुळेच लहानग्यांच्या कानातील मळ काढण्यासाठी त्यांच्या आई जिवाचे रान करतात. लहान मुलाला केवळ कानातील मळ काढण्यासाठी काही वेळा डॉक्टरांकडे नेले जाते. खरे तर अनेकदा सर्दीमुळे कान दुखत असतो. नाकाच्या व कानाच्या मागच्या जागेत सर्दी जमा होते. बाळ रात्री झोपले की ही सर्दी कानात येते. त्यामुळे कान दुखतात व मूल रडू लागते. या वेळी मुलांना उभे केले की ती रडायची थांबतात.
सर्दी झाली की नाक साफ केले जाते. मात्र त्या वेळी कान बंद झाल्याचा अनुभव येतो. होते काय की नाकपुडय़ा साफ करताना मोठा आवंढा गिळला जातो व त्यातून हवेचा बुडबडा कानामागे जाऊन बसतो. त्यामुळे आणखीनच अस्वस्थ वाटते. काहींना मात्र कानात सर्दी होते. म्हणजे नाकातली सर्दी कानातून बाहेर पडते. कानाच्या मागच्या बाजूला असलेली सर्दी कानाच्या पडद्याला बारीकसे छिद्र पाडून बाहेर पडते. सर्दी बाहेर पडली की दहापैकी आठजणांमध्ये पडद्याचे छिद्र आपोआप बंद होते. मात्र दोघांमध्ये हे छिद्र कायम राहते. त्यांना औषधोपचार घ्यावे लागतात.
कानाच्या आतल्या भागातील कार्य हे शरीराचा तोल सांभाळण्यासाठी महत्त्वाचे ठरते. या भागात विशिष्ट प्रकारचा द्रवपदार्थ असतो. उजव्या व डाव्या अशा दोन्ही बाजूंनी त्यावर दाब पडत असतो. या दाबाचे गणित बिघडले की मळमळ, उलटी, चक्कर येणे, तोल जाणे असे प्रकार घडतात. अनेकांना गाडी लागते त्यामागे हा आतल्या कानातील बिघडलेला तोल कारणीभूत असतो. यावर उपचार उपलब्ध आहेत.
– डॉ. अशेष भूमकर
नाक, कान, घसा तज्ज्ञ
drbhumkar@drbhumkar.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2015 7:54 am

Web Title: how ear works
टॅग : Health It,Human Body
Next Stories
1 डोळ्यांचे दुखणे
2 आत्महत्या कशी घडते?
3 एक अनोखे स्नेहसंमेलन : यकृत दाते आणि रुग्णांचे!
Just Now!
X