आईच्या फुप्फुसाचा तुकडा काढून तो तीन वर्षांच्या मुलाला बसवण्याची शस्त्रक्रिया जपानमध्ये यशस्वी झाली आहे. जिवंत दात्याच्या फुप्फुसाचा भाग अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीस बसवण्याची ही पहिलीच वेळ आहे. ओक्लाहोमा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तीन वर्षांच्या मुलाचे फुप्फुस खराब झाले होते. त्याला अगोदर कृत्रिम हृदय व फुप्फुस बसवण्यात आले होते. ते काढून टाकण्यात आले. नंतर ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली असून ती यशस्वी झाल्याचे प्रमुख शल्यविशारद ताकाहिरो ऑटो यांनी सांगितले. यात आईच्या उजव्या फुप्फुसाचा तुकडा काढून तो मुलास बसवण्यात आला. ‘मिडललोब’ प्रत्यारोपणाची जगातील ही पहिली शस्त्रक्रिया होती. जिवंत दात्याच्या फुप्फुसाचा तुकडा घेऊन ‘इंफेरियर लोब’ शस्त्रक्रिया यापूर्वी झाल्या आहेत. मुलाला फुप्फुस देणारा दाता मिळण्याची शक्यता नसल्याने आईने दात्याची भूमिका पार पाडली. विशेष म्हणजे या मुलावर दोन वर्षांपूर्वी रक्ताच्या कर्करोगावर अस्थिमज्जा रोपण शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.

नवे प्रतिजैविक तयार करण्याचे प्रयत्न
ऑस्ट्रेलियाचे वैज्ञानिक सध्या क्षयासह विविध रोगांवर गुणकारी ठरणाऱ्या प्रतिजैविकाची (अँटीबायोटिक्स) निर्मिती करीत आहेत. सध्याची प्रतिजैविके जीवाणूंच्या पेशीतील पाइपटलास लक्ष्य केले जाते, परंतु नवीन प्रतिजैविकात जीवाणूच्या चयापचय क्रियेत मदतनीस असलेल्या वितंचकास चिकटून त्याची जैविक क्रिया बंद पाडली जाते. अ‍ॅडलेड विद्यापीठातील अँड्रय़ू अ‍ॅबेल यांनी सांगितले की, नवीन प्रतिजैविक हे वेगळ्या पद्धतीने काम करणारे आहे. सध्या ते निर्मितीच्या प्राथमिक टप्प्यात असून त्याच्या प्राण्यांमधील चाचण्या अजून घेतलेल्या नाहीत. सध्याच्या प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या जीवाणूंना मारण्याची ताकद या प्रतिजैविकात असणार आहे. जी प्रतिजैविके सध्या वापरात आहेत त्यांचा प्रतिरोध करण्याची क्षमता जीवाणूंमध्ये तयार झाली आहे. जीवाणूजन्य रोगांवर या नवीन प्रतिजैविकाचा प्रभावी वापर करता येईल, असे अ‍ॅबेल यांचा म्हणणे आहे. प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या क्षयावरही त्याची मात्रा चालू शकेल. ‘केमिकल सायन्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

हळदीचा असाही उपयोग
लहान बाळांमध्ये असणाऱ्या फुप्फुसाच्या दोषांमध्ये हळदीतील क्युरक्युमिन नावाचा घटक उपयोगी ठरू शकते. भारतीय मसाल्याच्या पदार्थात महत्त्वाचे स्थान असलेल्या हळदीचे अनेक औषधी गुणधर्म असतात. जन्माला आलेल्या बाळांच्या फुप्फुसात दोष असेल तर त्यांना व्हेंटिलेटर लावून ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागतो. पण यामुळे लहान बाळांची फुप्फुसाची क्षमता कायमची कमी होण्याची व प्रसंगी मृत्यूचा धोका असतो. लॉसएंजल्स बायोमेडिकल रीसर्च इन्स्टिटय़ूट येथे जे प्रयोग करण्यात आले त्यात या रोगांचे प्रारुप तयार केले असता हळदीतील क्युरक्युमिनमुळे या रोगात फायदा होत असल्याचे दिसून आले. ‘अमेरिकन जर्नल ऑफ फिजिऑलॉजी लंग सेल्युलर अँड मॉलिक्युलर फिजिऑलॉजी’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. हळदीतील क्युरक्युमिनचा उपयोग ब्रांॅकोपल्मोनरी, डिस्प्लासिया या रोगात चांगल्या प्रकारे होतो. या रोगाला फुप्फुसात व्रण पडतात व त्यांचा दाह होतो. हायपरोक्सिया या विकारात जन्मानंतर पहिल्या २१ दिवसात मोठय़ा प्रमाणात ऑक्सिजन बाळाच्या शरीरात जातो. यात पहिले सात दिवस बाळाला हळदीतील क्युरक्युमिनमुळे संरक्षण मिळू शकते, असे दिसून आले. लॉसएंजल्सच्या बायोमेडिसीन संस्थेचे विरेंदर के. रेहान यांनी हा शोधनिबंध सादर केला आहे.

नवीन प्रकारची स्पर्श भिंगे
वैज्ञानिकांनी ‘टर्मिनेटर’ चित्रपटात दाखवली आहेत तशा स्पर्शभिंगांची (काँटॅक्टलेन्स) रचना तयार केली आहे, त्यात झूम इन व झूम आउट या सुविधा तुम्हाला मिळतात. १.१७ मि.मी. जाडीच्या स्पर्शभिंगाच्या या नमुन्यात दोन प्रकाशीय मार्ग वापरले आहेत. त्यात एकामुळे संबंधित वस्तू मोठी दिसते तर दुसऱ्यामुळे ती सर्वसाधारण, नेहमीच्या आकारात दिसते. भिंगाच्या मध्यभागातून पाहिले तर ‘झूम आऊट’ म्हणजे वस्तू आहे त्या आकारात दिसते. दुसऱ्या भागातून पाहिल्यास ती मोठी दिसते. या तंत्राचा उपयोग वयोमानापरत्वे होणाऱ्या ‘मॅक्युलर डिजनरेशन’ या विकारावर होऊ शकतो. यात मधल्या भागातून वस्तू आहे तशी दिसते पण स्पर्शभिंगाच्या बाजूने बसवलेल्या दोन आरशांच्या दुर्बिणीतून ती २.८ पट मोठी दिसते. आपल्या सोयीप्रमाणे यात झूम इन झूम आऊट यांचा वापर करता येतो. वैज्ञानिकांनी असे स्पर्शभिंग तयार केले असून त्यात पॉलिमेथिल मेथॅक्रायलेट यांचा वापर करण्यात आला आहे. अजून या प्रकारची स्पर्शभिंगे प्रत्यक्ष मानवी वापरासाठी तयार करताना त्यात अनेक बदल करावे लागतील, असे संशोधकांचे म्हणणे आहे. ‘ऑप्टिकल एक्सप्रेस’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

टेस्ट टय़ूब बेबीचे किफायतशीर तंत्रज्ञान
‘टेस्ट टय़ूब बेबी’ या तंत्राने अनेकांना अपत्यप्राप्तीचे स्वप्न पूर्ण करता आले तरी हे तंत्रज्ञान महाग असल्याने गरिबांना हा आशेचा दीप कधीच दिसला नाही. आता बेल्जियमच्या डॉक्टरांनी विकसनशील देशातील गरिबांना या तंत्राचा फायदा मिळावा यासाठी नवीन किफायतशीर असे टेस्ट टय़ूब बेबी तंत्र विकसित केले आहे. ही पद्धत प्रत्येक उपचार कालावधीसाठी २०० युरो म्हणजे २६० डॉलर खर्चाची आहे. पारंपरिक शरीरबाह्य़ फलन पद्धतीसारखीच विश्वासार्ह फलनिष्पत्ती यात झाली आहे. या पाश्चिमात्य बाह्य़पात्र फलन पद्धतीचा खर्च हा पारंपरिक पद्धतीच्या केवळ १० ते १५ टक्के आहे. त्यामुळे वंध्यत्व उपचार जगभरात अनेकांना साध्य होतील. १९७८ मध्ये टेस्ट टय़ूब बेबी तंत्र विकसित झाल्यानंतर ५० लाख बालके त्या माध्यमातून जन्मली आहेत, पण आतापर्यंत तरी भरमसाठ खर्चामुळे या तंत्राचा वापर ही विकसित देशांची मक्तेदारी होती. विकसनशील देशात वंध्यत्व हा दुर्लक्षिला गेलेला प्रश्न आहे, असे गेन्क इन्स्टिटय़ूट फॉर फर्टिलीटी टेक्नॉलॉजी या संस्थेच्या श्रीमती एल्क केल्र्क्‍स यांनी सांगितले. एम्ब्रियो कल्चर पद्धतीमुळे युरोपीय व उत्तर अमेरिकेतील आयव्हीएफ केंद्रात वापरल्या जाणाऱ्या महागडय़ा उपकरणांना पर्याय निर्माण झाला आहे.