मीनल आणि साक्षीची खूप वर्षांनंतर भेट झाल्यानंतर त्या ठरल्याप्रमाणे मीनलच्या घरी भेटल्या. साक्षीचा पाच वर्षांचा मुलगा- सोनीलपण तिच्याबरोबर होता. दोघी मैत्रिणी गप्पांमध्ये रंगल्या होत्या. सोनीलला मात्र कंटाळा येऊ लागला. त्याला भूक पण लागली. आता आईचे लक्ष वेधून घ्यावेच लागेल हे सोनीलच्या लक्षात आले. मग काय, त्याने त्याचे शस्त्र उपसले. जवळच त्याला एक उंचसा, नक्षीदार शो-पीस दिसला. हळूहळू तो त्या शो-पीस दिशेने सरकला आणि त्या शो-पीसला न्याहाळायला लागला. तो आता त्या शो-पीसला हात लावणार इतक्यात साक्षी त्याच्यावर खेकसत त्याच्याजवळ आली आणि तिने त्याला उचलून बाजूला घेतले. आईचे लक्ष वेधण्यात, सोनील यशस्वी झाला होता. त्याच्या वागण्यामुळे आईच्या गप्पांमध्ये व्यत्यय आला होता. आई त्रस्त झाली, पण सोनील मात्र खूश होता. त्याला हवं ते मिळालं होतं. त्याचं इकडे तिकडे उचकाउचकी करणं सुरूच राहिल्यामुळे आईने तेथील भेट आवरती घेत, तडक घरचा रस्ता गाठला!
ऑफिसला सुट्टी घेऊन घरी बसलेल्या रमेशला मॅच बघायला मिळणार असली, तरी त्याबरोबरच अक्षयला सांभाळण्याची जबाबदारीही त्याच्यावर सोपवून श्रावणी फिरायला गेली होती. रमेश खूश होता, क्रिकेटची मॅचपण ऐन रंगात आली होती. तेवढय़ात अक्षयने भोकाड पसरले.‘आई, आई’ असा धोषा लावत तो हात-पाय आपटत रडायला लागला. रमेशला अचानक कळेच ना अक्षयला काय झाले ते. थोडासा चडफडतच त्याने टीव्ही बंद करत अक्षयला कडेवर घेतलं, तरी तो रडतच होता. रमेशच्या लक्षात आलं अक्षयने बऱ्याच वेळात काही खाल्लं नाहीये. त्याला भूक लागली असेल, असा विचार करीत अक्षयला तो तसाच स्वयंपाकघरात घेऊन गेला. खाण्याच्या पदार्थाची ताटली त्याने अक्षय समोर ठेवताच तो शांत झाला. त्याला भूक लागली होती, पण सांगता मात्र येत नव्हतं. वडिलांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्याने रडारड सुरू केली होती.
अशा एक ना अनेक प्रसंगांमध्ये भुकेसारख्या गोष्टींबरोबरच भावनिक प्रकटीकरणासाठीही मुलं पालकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेकानेक क्लृप्त्या लढवतात. त्यासाठी मुलांना फार विचार करावा लागत नाही. पालक मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत असले, एकमेकांशी गप्पा मारत असतील, समूहामध्ये गप्पांच्या फडात रंगले असतील आणि अवतीभोवती त्यांची मुलं असतील आणि त्यांच्याकडे पालकांचे दुर्लक्ष झाले, त्यांना काही हवं असलं, की त्या मुलांमधील काही मुलं पालकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेक गोष्टी शोधून काढतात. त्या-त्या वेळी त्या मुलांना काय हवं असेल, याची कल्पना अनेकदा पालकपण करू शकत नाहीत. आपल्याकडे आपल्या आई-वडिलांचे लक्ष जाणे, हा या मुलांसाठी एक आनंदाचा क्षण असतो आणि तो आपल्याला मिळावा, म्हणून ही बच्चेकंपनी असे उपक्रम सुरू करते. सातत्याने मुलं अशाच प्रकारे वागायला लागली, तर ती पुढे जाऊन कायमस्वरूपी ‘वर्तन समस्या’ ठरू शकते. या वेळी पालकांना काय करावे हेच नीट उमगत नाही.
पाळणाघरात किंवा पालकांना सोडून दिवस-दिवसभर वेगळे राहणाऱ्या मुलांना पालकांचा सहवास कमी मिळत असल्यामुळे त्या मुलांना अशी लक्ष वेधून घेण्याची सवय असल्याचे अनकेदा बघायला मिळाले आहे. प्रत्येक मूल वेगळे असल्यामुळे ज्या मुलाला अशी वर्तन समस्या असेल, त्याच्याशी कसं वागायचं याबद्दल काही ठोकताळे नाहीत. त्यामुळे अशा मुलाशी वागण्याची पद्धत पालकांनाच अनेकदा ठरवावी लागते. त्यांना जर शक्य नसेल, तर समुपदेशकाची ते मदत घेऊ शकतातच. मुख्य म्हणजे मुलाच्या अशा वागण्यामुळे तो ‘बॅड’ अथवा ‘गुड’बॉय असू शकत नाही, हे देखील लक्षात घेण्याची गरज आहे.
दुसरं मूल झाल्यानंतर पहिल्या मुलाकडे दुर्लक्ष होतंय असं त्या मुलाला वाटायला लागल्यामुळेही आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याकडे मुलांचा कल वाढतो. त्या वेळी देखील पालकांनी थोडीशी काळजी घ्यायला हवी. दुसऱ्या मुलाची काळजी घेतानाच पहिल्याकडे दुर्लक्ष होणार नाही, हे पाहणेही गरजेच ठरते. एकूणच काय तर मूल वाढवताना सकारात्मक दृष्टिकोनाबरोबरच त्याच्यामध्ये कोणत्याही वर्तनसमस्या निर्माण होणार नाहीत, याची काळजी पालकांनी घ्यायला हवी.