डोके दुखण्याचे बरेच प्रकार आहेत. ‘अर्धशिशी’ किंवा ‘मायग्रेन हेडेक’ हा त्यातला एक. यात मेंदूतील रक्तप्रवाहात काहीतरी असमतोल होऊन तो मेंदूच्या काही भागात वाढतो आणि काही भागात कमी होतो. रक्तप्रवाहातील या कमी-जास्तपणामुळे मेंदूत काही विशिष्ट संप्रेरकांचे स्रवण होते. या संप्रेरकांच्या असमतोलामुळे डोके एकाच बाजूस दुखू लागते. आता अर्धशिशीची डोकेदुखी एकाच बाजूस का, हा प्रश्न पडणं साहजिक आहे. मेंदूला होणारा रक्तपुरवठा मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागात अगदी काटेकोरपणे विभागला गेलेला असतो. त्यामुळे मेंदूच्या ज्या बाजूच्या रक्तप्रवाहात असमतोल होतो त्याच बाजूला डोकेदुखी सुरू होते. अर्धशिशी नेमकी कोणत्या वयात होऊ शकते याचे काही ठोकताळे नाहीत. पण अर्धशिशीच्या रुग्णांमध्ये
१५ ते १७ वर्षांपासून ६० वर्षे हा वयोगट प्रामुख्याने दिसून येतो.
अर्धशिशीचेही विविध प्रकार-
एकाच बाजूचे डोके दुखणे हे अर्धशिशीचे प्रमुख लक्षण असले तरी या डोके दुखण्यातही विविध प्रकार आहेत. ‘मायग्रेन विथ ऑरा’ आणि ‘मायग्रेन विथआऊट ऑरा’ हे शब्द बऱ्याच जणांनी ऐकले असतील. काही रुग्णांना अर्धशिशीचा त्रास सुरू व्हायच्या आधी आपल्या शरीराकडून ‘आता त्रास सुरू होणार बरं का,’ अशा सूचना मिळत असतात. रुग्णाला या सूचना लक्षात येतात आणि त्यानुसार थोडय़ाच वेळात त्याला अर्धशिशीचा त्रास सुरू देखील होतो. यालाच ‘मायग्रेन विथ ऑरा’ अशी संकल्पना वापरतात. पण बऱ्याच जणांना शरीराकडून कोणतीही पूर्वसूचना न मिळता अचानक अर्धशिशी सुरू होते. असा त्रास म्हणजे ‘मायग्रेन विथआऊट ऑरा.’ या दुसऱ्या प्रकारचीच अर्धशिशी सर्वाधिक रुग्णांमध्ये बघायला मिळते. अर्धशिशीचा त्रास असलेल्या स्त्रियांमध्ये तो त्रास मासिक पाळीशी संबंधित असू शकतो. काही जणींचा त्रास गर्भावस्थेत खूपच वाढतो तर काहींचा त्रास त्या काळात पूर्णत: बंदही होऊ शकतो.   

पूर्वसूचनेसह येणारी अर्धशिशी
‘मायग्रेन विथ ऑरा’ या प्रकारात अर्धशिशी होण्यापूर्वी वेगवेगळ्या रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसतात. ती खालीलप्रमाणे-
०    अर्धशिशीचा त्रास सुरू होण्यापूर्वी डोळ्यांसमोर तारे चमकल्यासारखे वाटणे. याला वैद्यकीय भाषेत ‘स्किंटिलेटिंग स्कोटोमा’ म्हणतात. यात रुग्णाला जे दृष्य दिसते ते मध्यभागी गडद आणि बाजूला खूप प्रकाशमान दिसते. विशेष म्हणजे ज्या बाजूचे डोके दुखते त्याच बाजूला डोळ्यांसमोर तारे चमकल्यासारखे दिसते.
०        काही जणांना अर्धशिशीच्या त्रासापूर्वी विचित्र वास येऊ लागतात किंवा कसेतरीच होऊ लागते.
अर्धशिशीची अशीही लक्षणे
वर सांगितलेल्या दोन प्रकारांव्यतिरिक्तही अर्धशिशीत आणखीही काही लक्षणे दिसू शकतात. काही रुग्णांना अर्धशिशीचे डोके दुखत असताना अशक्तपणा आल्यासारखे वाटते, तर काहींना त्या काळापुरता शरीराला अर्धागवायू होऊन हात-पाय हलवणेही शक्य होत नाही. अर्थात डोके दुखणे थांबले की अर्धागवायूही जातो. काही व्यक्तींमध्ये ज्या बाजूचे डोके दुखते, त्या बाजूच्या डोळ्याची हालचाल तेवढय़ा वेळेपुरती पूर्णत: बंद होते. या प्रकारच्या अर्धागवायूचा त्रास कायम टिकणारा नसतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

अर्धशिशीच्या त्रासाला कारणीभूत
ठरणारे घटक
विविध रुग्णांच्या अर्धशिशीच्या त्रासाला वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत ठरत असतात. हे ‘ट्रिगर्स’ पुढीलप्रमाणे-
– खूप जागरण होणे.
– डिओड्रंट किंवा अत्तराचा तीव्र वास येणे.
– खूप मोठ्ठा आवाज कानावर पडणे.
– डोळ्यांवर अचानक खूप प्रकाश येणे.
– खूप गर्दीत जाणे किंवा लिफ्टसारख्या बंदिस्त जागेत जाण्यामुळेही काहींना अर्धशिशी सुरू होते.

काय करावे
आपली अर्धशिशी कशामुळे सुरू होते तो ‘ट्रिगर’ ओळखणे आणि ती गोष्ट जाणीवपूर्वक टाळणे हाच महत्त्वाचा उपाय आहे. अर्धशिशीचा त्रास आहे, त्यांनी कॉफी प्यावी किंवा मध्यरात्री उठून मिठाई खावी असे बोलले जाते. पण कुणाची अर्धशिशी कशामुळे सुरू होईल ते कारण वेगवेगळे असते. त्यामुळे काही रुग्णांना अर्धशिशीत कॉफी प्यायल्यावर किंवा चॉकलेट खाल्ल्यावर बरे वाटते, तर कॉफी प्यायल्यामुळे काहींना अर्धशिशीचा त्रास सुरू होतो. याशिवाय अर्धशिशीचा अटॅक आल्यावर किंवा अटॅक येऊ नये म्हणून विशिष्ट औषधे आहेत. तसेच डोके दुखण्यावर पेनकिलर औषधेही घेता येतात. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ही औषधे घेता येतील.    
– डॉ. अभिजीत देशपांडे.
drabhijitad@gmail.com