04 December 2020

News Flash

दूध, दही अन् ताक!

आपल्या मुलांनी दररोज नित्यनेमाने दूध प्यावे, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते! जवळपास सगळी मुले मात्र दूध प्यायला टाळतात.

| March 21, 2015 02:46 am

आपल्या मुलांनी दररोज नित्यनेमाने दूध प्यावे, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते! जवळपास सगळी मुले मात्र दूध प्यायला टाळतात. मग पालक व मुले यांच्यात वाद होतो आणि हा वाद अनेकदा डॉक्टरांपर्यंत नेला जातो. ‘दूध पिशील ना रोज, नाहीतर डॉक्टर आँटी इंजेक्शन देतील बघ,’ असा दमच मुलांना भरला जातो!. हे बघितल्यावर प्रश्न पडतो की दुधाला पूर्वीपासून इतके महत्व का दिले जाते? फक्त दूधच नव्हे, दूधापासून विरजलेले दही, आणि दह्य़ाचे ताक या सगळ्याच पदार्थाचे शरीराला काय- काय उपयोग असतात हे पाहूया..
दूध
दूध म्हणताना आपण अर्थातच म्हैस किंवा गाईच्याच दुधाचा प्रामुख्याने विचार करणार आहोत. दूध पोषक आणि आरोग्यवर्धक असले तरी थोडेसे कफ वाढवणारे आहे. दुधात असणारी प्रथिने ‘पूर्ण प्रथिने’ असतात. म्हणजेच रोज आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या अ‍ॅमिनो अ‍ॅसिडस्ची परिपूर्तता ती करतात. शिवाय त्यात असणारी केसिन प्रथिने कॅल्शियमच्या बरोबर जोडून असतात. शिवाय ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’, ‘ई’, ‘के’ ही सर्व जीवनसत्वे दुधात असतातच. चेतासंस्थेवर काम करणारे महत्त्वाचे ‘ब’ जीवनसत्व त्यात पुरेशा प्रमाणात असते. थोडक्यात दूध आरोग्यास हितकारकच.
दही
दूध विरजून तयार होते ते दही. या प्रक्रियेदरम्यान त्यात रासायनिक बदल होतात व दुधातील लॅक्टोजचे लॅक्टिक अ‍ॅसिडमध्ये रुपांतर होते. या अ‍ॅसिडच्या उपस्थितीत शरीरात कॅल्शियमचे शोषण अधिक उत्तमरित्या केले जाते. हे तत्व पचण्यास सोपे असते; त्यामुळे दुधापासून उद्भवणारे त्रास दह्य़ाच्या सेवनाने मात्र कमी होतात. दह्य़ात दुधातील इतर सर्व तत्वे- म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, फॉलिक अ‍ॅसिड असतातच. त्यामुळे दही पोषक आहे. त्याच्या सेवनाने पोट लवकर भरते व सतत भूक लागण्याचा प्रकार कमी होतो. वजन वाढवण्यासाठी (वेट गेन) जेव्हा आपण आहाराचे नियोजन करतो, तेव्हा त्यात दह्य़ाचा समावेश करावा. दही- भाताचे जेवण किंवा दह्य़ाचे भाज्या घालून केलेले रायते किंवा नुसते वाटीभर दही आहारात घ्यावे. दह्य़ाने प्रथिनांची कमतरता भरून येते आणि आपली हाडे, दात आणि नखे सुद्धा बळकट राहतात. आंबट दह्य़ाचा उपयोग त्वचेसाठी फेसपॅक तयार करण्यासाठी करता येतो.
दूध कसे घ्यावे?
दूध पचायला फार हलके नसते. त्यामुळे सर्वानाच ते तेवढय़ा प्रमाणात मानवेलच, असे नाही. दुधात साखर घालून घेतल्यास ते पचनास अधिक अवघड होते. त्यामुळे कफाचा त्रास अधिक प्रमाणात वाढू शकतो. ज्यांची पचनशक्ती उत्तम आहे, अशांनी केव्हाही दूध घेतले तरी त्रास होत नाही. काहींना मात्र दुधातील ‘लॅक्टोज’ नावाच्या साखरेचा त्रास होतो कारण त्याच्या पचनासाठी आवश्यक असणारी पाचक तत्वे त्यांच्या शरीरात पुरेशा प्रमाणात तयार होत नाहीत आणि ‘लॅक्टोज इनटॉलरन्स’मुळे गॅसेस, पोटात कळा येणे, पोट फुगणे, जुलाब, मळमळ अशी लक्षणे दिसू शकतात. यासाठी काही उपाय करता येतील-  
’डॉक्टरांच्या सल्ल्याने पाचक तत्वांची गोळी घ्यावी.
’दुधात सुंठ, हळद, वेलची आणि जायफळ यांची किंचितशी पूड घालून घ्यावे.
’खीर, रबडी, बासुंदीसारखे आटीव दुधाचे पदार्थ टाळावेत.
’दूध हे मुळात थोडे सारक गुणधर्माचे असते. याचा उपयोग मलावष्टंभावर (कॉन्स्टिपेशन) उपाय म्हणून करून घेता येतो. त्यासाठी रात्री झोपताना कपभर गरम दुधात २ चमचे साजुक तूप किंवा १ चमचा बदामाचे तेल घालून प्यावे.
दही कसे असावे?
’ घरी लावलेले ताजे आणि घट्ट दही उत्तम
’दह्य़ात गुठळ्या नसाव्यात, त्यातून तार निघू नये. पिवळट पडलेले दही खाऊ नये. शिळे आणि आंबट दही खाण्यास अहितकारकच. खराब दही खाण्यात आले तर त्वचेच्या तक्रारीही निर्माण होऊ शकतात.
’विकतच्या दह्य़ात जिलेटिनसदृश पदार्थ मिसळलेले असण्याची शक्यता असते. त्यामुळे औषधासाठी दही घ्यायला सांगितलेले असल्यास विकतचे दही शक्यतो टाळावे.
होणारे त्रास व उपाय
दही कफकर व थंड असल्याने सर्दी, सायनस, खोकला, घसा खवखवणे असे त्रास उद्भवू शकतात. या त्रासांवर काही उपाय आहेत-
’ज्यांना वारंवार असे त्रास होतात त्यांनी दह्य़ाचा वापर कमी करावा. तसेच सुंठ घालून दूध उकळून, कोमट करुन ते विरजावे व असे दही खावे.
’दह्य़ात सुंठ, काळे मिरे, दालचिनी यांची थोडीशी पूड घालून घ्यावे.
’आंबट दही खाण्यात आले तर जेवणानंतर अधूनमधून गरम पाणी पीत राहावे.
’आयुर्वेदानुसार रात्री शक्यतो दही खाणे टाळावे.
’दही व विविध फळे एकत्र करुन खाऊ नये.
ताक
दही चांगले घुसळून, पाणी घालून ताक तयार होते. त्यासाठी भरपूर घुसळणे आवश्यक आहे. या क्रियेमुळे त्यात उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे ताक पचण्यास खूपच हलके होते. दह्य़ाचे सर्व गुणधर्म, जीवनसत्वे आणि मूलतत्वे त्यात असतात.
कधी घ्यावे
रोजच्या जेवणात ताक प्यावे. ते पाचक, गॅसनाशक आणि थंडावा निर्माण करणारे असते. उन्हातून आल्यावर थंड ताक शरीराला शांत करते. जुलाब, आमांश, कोलायटिस अशा पोटाच्या आजारांमध्ये ताकभाताचे पथ्य करता येऊ शकेल. अपचन झाले असता एखाद्-दोन दिवस नुसत्या ताकावर राहून देखील चालू शकते. मूळव्याध, गर्भिणींचा थकवा, पोटशूळ यातही ताक उपयोगी पडते.
ताक कसे असावे?
’ताक फारसे आंबट व शिळे नसावे.
’ताकाचा रंग पिवळसर झाल्यास ते पिऊ नये.
’विशिष्ट वास येणारे ताक पिऊ नये.
’ताक घट्ट नसावे. पुष्कळ पाणी घालून पातळ केलेले असावे.

कसे घ्यावे
’ताकात जिरेपूड, काळे मीठ घालून घ्यावे.
’ताकात सुंठीची पूड किंवा आल्याचा रस व चाट मसाला घातला तरी चालतो.
’सुंठ, काळे मिरे पूड आणि हिंग घालूनही ताक घेता येईल.
आंबट ताकाने सर्दी- खोकला व घसा खवखवण्यासारखे त्रास होतात. अशा वेळी-
’गरम पाण्यात हळद, मीठ घालून गुळण्या कराव्या.
’गरम पाण्यात थोडा आल्याचा रस व मध घालून ते पाणी पीत राहावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2015 2:46 am

Web Title: milk buttermilk and curd
टॅग Milk
Next Stories
1 विचारी मना! : नको भीती, नको चिंता!
2 उन्हाळा आला, डोकेदुखी वाढली!
3 वाणी आणि भाषाविकार!
Just Now!
X