‘चल एकेक दम मारू..’ चित्रपटांमध्ये आणि अगदी कट्टय़ाकट्टय़ांवरही सहजपणे ऐकू येणारे हे वाक्य. ‘एक एवढीशी सिगरेट! कधीतरी ओढली म्हणून काय झाले!’ अशा भावनेतून आणि आकर्षणातून सुरू झालेल्या सिगरेट ओढण्याच्या सवयीचे व्यसन कधी बनते तेच कळत नाही. हळूहळू या व्यसनाने विविध व्याधी जडतात. आधी खोकला, श्वास घेण्यास अडचणी असे विकार निर्माण होत असले तरी, पुढे हृदयविकार, कर्करोग अशा व्याधी बळावतात. या महाभयंकर व्यसनाच्या धोक्यांविषयी आणि ते सोडण्यासाठी उपलब्ध असलेल्या पद्धतींविषयी माहिती देत आहेत  डॉ. संजय जानवळे.
धूम्रपानामुळे खालील
धोके वाढतात
* फुप्फुसाचा कर्करोग, इतर कर्करोग.
* हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका.
* श्वासनलिकांना सूज येणे.
* फुप्फुसे कमकुवत होऊन त्यांचे कायमचे नुकसान होणे.
* रक्तवाहिन्यांचे आजार, उच्च रक्तदाब.
* मेंदूत रक्तस्राव होणे. (स्ट्रोक)
* लैंगिक शक्ती कमी होणे. (इरेक्टाइल डिसफंक्शन)
धूम्रपानामुळे शरीरावर लगेच दिसून येणारे परिणाम
धूम्रपानाचे व्यसन साधारणपणे पौगंडावस्थेत किंवा वयात येण्याच्या टप्प्यावर सुरू होते. त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम हे व्यसन जडलेल्या व्यक्तीच्या उत्तर आयुष्यात दिसून येत असले, तरी काही घातक परिणाम हे व्यसन सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यातच दिसू लागतात. ते खालीलप्रमाणे-
* शरीराची तंदुरुस्ती (फिटनेस) कमी होतो. उदा. तरुण अ‍ॅथलिट धूम्रपान करत असेल तर त्याची शारीरिक क्षमता आणि सहनशक्ती व्यसनामुळे कमी झालेली लगेच दिसून येते.
* फुप्फुसांच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. उदा. श्वास घेताना सुऽ सुऽऽ असा आवाज येऊ लागतो, कफनिर्मिती वाढते.
* त्वचा कोरडी पडते, सुरकुतलेली बनते.
* आवाज बदलतो.
* दातांवर डाग पडू लागतात.
धूम्रपान सोडण्यासाठी..
निकोटिन हे ‘अ‍ॅडिक्टिव्ह’ म्हणजे सवय लावणारे असल्यामुळे धूम्रपानाचे एकदा लागलेले व्यसन सोडणे काहीसे कठीण होऊन बसते. त्यामुळे मुळात व्यसन लागूच न देणे गरजेचे. त्यासाठी सिगरेटचे कितीही आकर्षण वाटले तरी ते प्रयत्नपूर्वक बाजूला सारून धूम्रपान कधीच न करणे हाच उपाय आहे. तरीही ज्यांना हे व्यसन आहे त्यांच्यासाठी व्यसन सोडण्याच्या विविध पद्धती हल्ली उपलब्ध आहेत. यातली कोणतीही पद्धत अवलंबताना आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन ती योग्यप्रकारे अमलात आणणे आवश्यक आहे.
* निकोटिन रिप्लेसमेंट थेरपी
या पद्धतीत एक निकोटिनयुक्त पॅच त्वचेवर लावला जातो. शरीराला त्या पॅचद्वारे निकोटिन पुरवले जाते. या पॅचमधील निकोटिनची मात्रा हळूहळू कमी करत नेली जाते. निकोटिनयुक्त च्युइंगम्सही बाजारात उपलब्ध आहेत. पण त्यांचा उपयोग कसा आणि किती कालावधीसाठी करणे योग्य हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ठरवणे गरजेचे.
* अँटी डिप्रेसंट औषधे
या पद्धतीत धूम्रपान सोडण्यासाठी मदत करतील अशी ‘अँटी डिप्रेसंट’ औषधे रुग्णाला सुचवली जातील, परंतु ही औषधे घेण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला अत्यावश्यक आहे.
* बिहेविअर चेंज प्रोग्रॅम
या उपचारपद्धतीत धूम्रपान सोडण्याच्या दृष्टीने वर्तणुकीत अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. समुदेशन, दूरध्वनीद्वारे फॉलोअप यांसारख्या सेवा या पद्धतीत उपयुक्त ठरतात.
प्रबळ इच्छाशक्ती हवी
अनेकांचे धूम्रपान सोडण्याचे प्रयत्न फोल ठरून त्यांचे व्यसन पुन्हा सुरू झाल्याचेही पाहायला मिळते. असे झाले तरी निराश न होता पुन्हा धूम्रपान सोडण्याचा निश्चय करणे आणि पूर्वीपेक्षा अधिक प्रयत्नपूर्वक तो अमलात आणणे आवश्यक आहे. धूम्रपान सोडू इच्छिणाऱ्यांनी अशा वेळी पूर्वीच्या अनुभवातून शिकावे. धूम्रपान बंद केल्यानंतरचे सुरुवातीचे काही दिवस जड जाऊ शकतात. अशा वेळी धूम्रपानाची तल्लफ आली तरी मन दुसऱ्या सकारात्मक गोष्टींमध्ये (उदा., व्यायाम, खेळ) रमवायचा प्रयत्न करावा.