त्वचेच्या सुरकुत्या घालवणाऱ्या क्रीममध्ये वापरला जाणारा एक घटक हा पार्किन्सन म्हणजे कंपवातामुळे होणारी मेंदूतील पेशींची हानी रोखतो असे नवीन संशोधनात स्पष्ट झाले आहे. त्याच्या आधारे तयार केलेले किनेटिन या औषधावर सध्या प्राण्यांमध्ये चाचण्या सुरू आहेत.
किनेटिन हा असा रासायनिक रेणू आहे ज्याचा वापर सध्या सुरकुत्यांची वाढ रोखणाऱ्या क्रीम्समध्ये केला जातो, त्याचा उपयोग पार्किन्सनमुळे होणारी मेंदूच्या पेशींची हानी रोखतो, त्यामुळे सध्या लोक वापरत असलेल्या औषधातील हा रेणू असल्याने तो वापरण्यास सुरक्षित आहे हे अगोदरच स्पष्ट झालेले आहे, असे  सॅनफ्रान्सिस्को येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक हॉवर्ड ह्य़ूजेस यांनी म्हटले आहे.
पार्किन्सनमधील आणखी जनुकीय उत्परिवर्तने सापडली
पार्किन्सन हा असा आजार आहे ज्यात मेंदूतील चेतापेशी मरतात व सुरुवातीला हा आजार हालचालींवर परिणाम करतो व नंतर शरीरात कंप निर्माण होतो. त्यातून नंतर चालणे अवघड जाऊ लागते, बोलणेही चाचरल्यासारखे होऊ लागते. नंतरच्या टप्प्यात ती व्यक्ती संदर्भहीन बोलू लागते, तिला डिमेन्शिया जडतो. २००४ मध्ये इटलीतील ज्या कुटुंबात कंपवाताचे जास्त रुग्ण आहेत, त्यांच्यावर केलेल्या संशोधनात असे दिसून आले होते, की पार्किन्सन हा पिंक १ (पीआयएनके १) या प्रथिनातील जनुकीय उत्परिवर्तनामुळे होतो. विशेषत: पार्किन्सनचा आजार अनुवंशिकतेने आला असेल, तर ही जनुकीय उत्परिवर्तनांमुळे हे घडून येते. न्यूरॉन्सला खूप ऊर्जा लागत असते पण मायटोकाँड्रियातील दोषामुळे ती न मिळाल्याने न्यूरॉन्स मरतात.
चहा व कॉफी सेवनाने यकृतात चरबी साठण्यास प्रतिबंध
रोज चार कप चहा किंवा कॉफी सेवन केल्याने ज्यांच्या यकृतात चरबी साठते अशांना त्यापासून संरक्षण मिळते असा दावा वैज्ञानिकांनी केला असून या संशोधनात एका भारतीय वैज्ञानिकाचाही समावेश आहे. डय़ुक नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर ग्रॅज्युएट मेडिकल स्कूल व डय़ुक युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन या दोन संस्थांमध्ये हे संशोधन झाले असून जे लोक मद्यसेवन करीत नाहीत अशांमधील यकृताच्या आजारात कॅफीनचा फायदा होतो. जगात ७० टक्के लोकांना मधुमेह व लठ्ठपणाशी निगडित यकृत चरबी संचय दिसून येतो. आहाराचे नियमन व व्याायाम या दोन गोष्टींशिवाय यावर प्रभावी उपाय नाही. पेशी समूह व उंदरांची प्रारूपे वापरून पाल येन व रोहित सिन्हा यांनी हे संशोधन केले आहे. कॅफीनमुळे यकृतात साठलेल्या चरबीची चयापचय क्रियेला उत्तेजन मिळते व त्यामुळे उंदरांमध्ये जास्त चरबीयुक्त आहार देऊनही त्यांचे यकृतात चरबी साठण्यामुळे होणाऱ्या विकारांपासून संरक्षण झाले. चार कप कॉफी किंवा चहात जेवढे कॅफीन असते तेवढे या चांगल्या परिणामासाठी पुरेसे असते. कॅफीनमुळे चरबीवर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करणारे संशोधन प्रथमच झाले आहे. वाईट परिणाम नसलेली यकृताच्या आजारावरची औषधे यातून तयार करणे शक्य होणार आहे. हेपॅटॉलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
मुलावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
टोकियो – जपानमध्ये प्रथमच डॉक्टरांनी यकृताच्या पेशींचे प्रत्यारोपण केले असून अकरा दिवसांच्या मुलाला जीवदान दिले आहे. त्याचे यकृत योग्य प्रकारे काम करीत नव्हते. डॉक्टरांनी मे २०११ मधील १४ यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या वेळी काही अतिरिक्त पेशी डॉक्टरांनी गोठवून ठेवल्या होत्या त्यांचा वापर डॉक्टरांनी या वेळी केला आहे. ‘द नॅशनल सेंटर फॉर चाइल्ड हेल्थ अँड डेव्हलपमेंट’ या संस्थेने म्हटले आहे, की आम्ही यकृताच्या पेशींचे यशस्वी प्रत्यारोपण केले आहे. गर्भाच्या मूलपेशी किंवा बहुउपयोगी मूलपेशी वापरून आम्ही यकृताचे असे विकार बरे करता येण्यासारखी आशादायी स्थिती निर्माण केली आहे. या अकरा महिन्यांच्या मुलाचे यकृत काम करीत नव्हते. त्याच्यावर १० ऑगस्टला शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला त्याच्या रक्तगटाशी जुळणाऱ्या यकृतपेशी देण्यात आल्या होत्या. डॉक्टरांनी सांगितले, की या मुलाला दीड महिन्यात रुग्णालयातून घरी जाऊ देण्यात येईल.
कोकेनचा मेंदूवर तासाभरात परिणाम
कोकेन हा पदार्थ अवघ्या काही तासात मेंदूची रचना बदलतो त्यामुळे ती व्यक्ती नशाधीन होते, असा निष्कर्ष एका संशोधनात काढण्यात आला आहे. उंदरांना कोकेन दिले असता त्यांच्या मेंदूतील विशिष्ट पेशींची वेगाने वाढ होते असे सॅनफ्रान्सिस्को येथील एका संशोधन केंद्राचे व अर्नेस्ट गॅलो क्लिनिकच्या संशोधकांना आढळून आले आहे. कोकेनमुळे मेंदू पुन्हा तशा प्रकारच्या रसायनाची मागणी करू लागतो व ते मिळाले नाही तर अस्वस्थता वाढते त्याला व्यसनाधीनतेकडे झुकणारे वर्तन म्हणता येईल. मेंदूच्या पेशींचे थेट सूक्ष्मदर्शकातून निरीक्षण केले असता असे दिसून आले, की कोकेन दिल्यानंतर या उंदरांच्या मेंदूत डेंड्रिटिक स्पाइनची दोन तासांत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली. प्राण्यांच्या फ्रंटल कॉर्टेक्सकडे संदेश पाठवण्याचे काम जे सिनॅप्सेस करतात त्यांना डेंड्रिटिक स्पाइन्स असे म्हटले जाते. याउलट साधे सलाइनचे मिश्रण दिले असता त्यांच्या मेंदूत असे परिणाम दिसत नाहीत. डेड्रिटिक स्पाइन व कोकेनसारखे अमली पदार्थ यांचा थेट संबंध असल्याचे दिसून आले आहे. यातील मुख्य संशोधक लिंडा विलब्रेड्ट यांनी सांगितले, की अमली पदार्थाच्या वापराने नशा करण्यास उद्युक्त करणारे वर्तन कशा प्रकारे वाढते याचा उलगडा होणार आहे. मेंदूच्या फ्रंटल कॉर्टेक्स या भागात मेंदूतील अनेक महत्त्वाची कार्ये घडत असतात त्यात दीर्घकालीन नियोजन, निर्णय घेणे व इतर तर्काधिष्ठित बाबींचा समावेश असतो. कोकेनमुळे महत्वाच्या न्यूरॉन्सवर वाईट परिणाम होतो, त्यामुळे निर्णयक्षमता व इतर कौशल्यांवर परिणाम होऊ शकतो.