07 March 2021

News Flash

योनिस्रावाच्या गुजगोष्टी..

काही गोष्टी अगदीच न बोलण्याच्या.. पण त्या न बोलण्याने समस्या सुटत नाहीत तर वाढतात.

| December 23, 2014 06:32 am

काही गोष्टी अगदीच न बोलण्याच्या.. पण त्या न बोलण्याने समस्या सुटत नाहीत तर वाढतात. लहान मुलींपासून ते रजोनिवृत्ती आलेल्या स्त्रियांना अनेकदा योनीच्या कमी-अधिक स्रावाची समस्या भेडसावत असते. योनीचे आरोग्य राखण्यासाठीच या स्रावाची निर्मिती होत असली तरी स्त्रियांच्या शरीरात होत असलेल्या बदलांनुसार या स्रावाचेही प्रकार बदलतात. मात्र हे स्राव आरोग्यासाठी हितकारक आहेत की त्रासदायक याचा अनेकींना बोध होत नाही. या समस्येसाठी डॉक्टरकडे जाण्याची तसदी घेतली जात नाही किंवा डॉक्टरांना खुलेपणाने पूर्ण माहिती देण्याबाबतही टाळाटाळ केली जाते. योनिस्रावाची समस्या सर्वच वयोगटांतील स्त्रियांमध्ये असली तरी मासिक पाळी सुरू झालेल्या किशोरवयीन मुली आणि लैंगिक संबंधांना सुरुवात झालेल्या तरुण मुली यांना योनिस्रावाचा संसर्ग अधिक प्रमाणात होत असल्याचे दिसते.
योनीत असणाऱ्या ग्रंथीतून नसíगक स्राव झरतच असतो, त्याचे काम असते योनिमार्गाची स्वच्छता ठेवणे. गर्भाशयाचे तोंड (सर्विक्स), योनिमार्ग येथील मृत पेशी, नसíगक जीवाणू यांना बाहेर ढकलून हा मार्ग स्वच्छ ठेवणे आणि योनीला ओलसरपणा, नरमपणा देण्याचे काम योनिस्राव करीत असतो. नसíगक योनिस्रावाची मात्रा, रंग आणि दाटपणा हे पाळीचक्राच्या अवस्थेवर अवलंबून असते. अंडाशयातून अंडे बाहेर पडत असताना, आधी आणि नंतरच्या दिवसात, किंवा गरोदरपणा अशा सर्व अवस्थांमध्ये नैसर्गिक स्राव वेगवेगळा दिसतो.
 जर योनिस्रावाची मात्रा, रंग आणि दाटपणा यात नेहमीपेक्षा जास्त फरक जाणवला किंवा मायांगावर (वल्वा ) खाज येऊ लागली, वेदना होऊ लागल्या, सूज आली, जळजळ होऊ लागली तर ते योनिमार्गाच्या किंवा मायांगाच्या जंतुसंसर्गामुळे असू शकते. सामान्यपणे डॉक्टर असे प्रश्न विचारतात-  योनिस्रावातील हा बदल कधीपासून आहे? स्रावाचा रंग कसा आहे? स्रावामुळे खाज येते आहे का?  पॅड लावावे लागते का? पाळीच्या वेळी कापड / पॅड दिवसातून कमीतकमी तीन वेळा बदलता का? प्रवासामध्ये आंघोळ किवा स्वच्छता करायची राहून गेली का? काही मोठे आजारपण होते का? मधुमेह आहे का? एकापेक्षा जास्त व्यक्तींशी असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले गेले का? योनिमार्ग धुण्यासाठी काही सुगंधी द्रव्ये वगरे वापरली होती का? उपचारासाठी डॉक्टर योनिस्रावाचा नमुना घेतात, ‘पेप टेस्ट’ करतात.
योनिमार्गाचा जंतुसंसर्ग होऊ नये
म्हणून काय करावे?
दररोज आंघोळीच्या वेळी भरपूर पाणी आणि सौम्य साबणाने मायांगाची स्वच्छता राखावी. जास्त उग्र किवा सुगंधित साबण स्वच्छतेसाठी वापरू नये किंवा सुगंधी द्रव्ये वापरू नयेत. योनिमार्गाच्या आतून स्वच्छता करण्याची गरज नसते. शौचानंतर आणि लघवीनंतर पाण्याने स्वच्छता करताना हात पुढून मागे न्यावा म्हणजे लघवी (मूत्र मार्गाचा) किवा योनीचा जंतुसंसर्ग होणार नाही. अंतर्वस्त्रे नेहमी शंभर टक्के सुती असावीत म्हणजे घाम शोषला जाईल. मासिक पाळीच्या वेळी साबण आणि भरपूर पाण्याने नियमित स्वच्छता करणे खूपच आवश्यक असते. दिवसातून तीन वेळा आणि रात्री झोपण्याअगोदर पॅड बदलणे जरुरीचे असते.  
मधुमेह आणि शारीरिक क्षीणपणाने योनिमार्गाचा जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते, कारण शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. मासिक पाळी गेल्यावरही योनिमार्गाची आंतरत्वचा खूपच नाजूक बनते, सहजी जंतुसंसर्ग होतो.
पाढरं अंगावर जाण्याची समस्या क्वचितच वयात येणाऱ्या मुलींमध्ये दिसते, तीदेखील पाळीच्या वेळी योग्य स्वच्छता न बाळगल्याने. काही वेळा नायलॉनच्या अंतर्वस्त्रामुळे खाज सुटते आणि पांढरा स्रावही जाऊ शकतो. पण त्या वेळी फक्त सुती अंतर्वस्त्र घातली की पुरे. अगदी छोटय़ा मुलींनाही मातीत खेळताना माती, वाळूचे कण योनीत गेल्यानेही स्राव होऊ शकतो. काही वेळा मुली खेळताना पेन्सिलीचा तुकडा, मणी वगरे काही योनीत गेल्यानेही तसे होऊ शकतो. क्वचितच उपचाराची गरज भासते. अगदी तान्ह्य़ा बाळांना नॅपी बदलल्याने ‘नॅपी रेष’ येते तेव्हाही स्राव होऊ शकतो, परंतु केवळ जास्त वेळा नॅपी बदलली तर ही रेष जाते किंवा सुती लंगोट घातल्यानेही फरक पडतो.
योनिस्राव हा योनीच्या संरक्षणासाठी बनला आहे. या मार्गाचा जंतुसंसर्ग झाला तरच हा स्राव वाढतो, दाट होतो, रंग बदलतो, वास येतो. जंतुसंसर्ग नेमक्या कोणत्या कारणाने झाला आहे, हे समजले की त्यावर उपायही करता येतो. स्वच्छता ठेवल्याने योनिस्रावाच्या अनेक समस्या कमी होतात. काही वेळा समस्या गंभीर असली तर मात्र डॉक्टरांचा सल्ला आवश्यक ठरतो.
स्वच्छता व जोडीदारावरही उपचार या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष केल्यास शारीरिक संबंधातून संसर्ग नेहमीच होत राहतील. सर्व गुप्तांगातील विकार लैंगिक संबंधातून पसरत नाहीत. योनिमार्गाच्या जंतुसंसर्गाबरोबरच लघवीचा जंतुसंसर्ग होणे स्वाभाविकपणे दिसून येते. त्यासाठी जास्त पाणी पिणे, नारळपाणी पिणे वगरे आवश्यक आहे.
Untitled-1
 – डॉ. कामाक्षी भाटे, केईएम रुग्णालय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2014 6:32 am

Web Title: vaginal secretions
टॅग : Health It
Next Stories
1 कॅन्सर प्रतिबंध व आयुर्वेद – २
2 आले उपासाचे दिवस!
3 पिढींमधले सेतू
Just Now!
X