News Flash

महिलांनो हृदय सांभाळा!

तीस वर्षांच्या संगीताला हृदयविकाराचा झटका आला. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येऊन अँजिओप्लास्टी करावी लागली.

तीस वर्षांच्या संगीताला हृदयविकाराचा झटका आला. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येऊन अँजिओप्लास्टी करावी लागली. अवघ्या तीशीत आपल्याला हृदयविकाराचा त्रास का झाला ही प्रश्न तिच्यासह अनेकांच्या मनात निर्माण झाला. तीशी पस्तीशीच्या महिलांमध्ये हृदयविकाराचा त्रास निर्माण होणे ही गोष्ट आता फारशी नवीन नसली तरी चिंताजनक निश्चितच आहे. प्रामुख्याने शहरांमधील नोकरदार महिलांना हृदयविकाराचा त्रास मोठय़ा प्रमाणात उद्भवताना दिसतो. यामागे अनेक कारणे आहेत.

संगीता एका मोठय़ा जाहिरात कंपनीत नोकरीला होती. कामाच्या वेळांची निश्चिती नव्हती. उत्तम पगार व सर्व सुखसोयी उपलब्ध असल्यामुळे उंची सिगारेट तसेच दारु पिण्याची तिला सवय लागली. खाण्यापिण्याच्या वेळा निश्चित नव्हत्या तसेच पिझ्झा-बर्गरसारखे जंक फूड हेच तिचे जेवण बनले होते. यासाऱ्यातून नवऱ्याबरोबर वाद होऊ लागले. तशातच गर्भरपणाच्या काळात एकीकडे घरातील भांडणामुळे निर्माण होणारा ताण व तो घालविण्यासाठी सिगारेट व दारुचा घेतलेला सहारा..अखेर व्हायचे तेच झाले..अवघ्या तिशीत हृदयविकाराचा झटका आला. अर्थात सर्वच नोरकरदार महिला धुम्रपान अथवा दारू पिणाऱ्या नसतात हे जरी खरे असले तरी या महिलांची बदललेली लाफईस्टाईल हे धोक्याचे प्रमुख कारण ठरते, असे पालिकेच्या शीव रुग्णालयातील विख्यात हृदयविकारतज्ज्ञ डॉ. अजय महाजन यांचे म्हणणे आहे.
बहुतेक नोकरदार महिला या बैठे काम करणाऱ्या असतात. त्यातच खाण्याच्या वेळा पाळणे शक्य होत नाही. बरेचवेळा नैसर्गिक विधीसाठी वेळ न मिळणे किंवा जागा उपलब्ध नसल्यामुळे शरीरावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. नोकरीचा ताण आणि घरची जबाबदारी यातून स्त्रीयांची सुटका नसते. यासाऱ्यातून आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. रक्तदाब वाढणे, वजन वाढणे, कोलेस्ट्रोलची वाढ, मधुमेह असे अनेक आजार उद्भवून शेवटी याची परिणीती हृदयविकारात होते. बहुतेकवेळा नोकरदार महिला अथवा सुडौल राहण्याच्या अट्टाहासातून गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर नियमितपणे करताना दिसतात. गर्भनिरोधक गोळ्यांच्या नियमित सेवनामुळे रक्तदाब तसेच रक्तामध्ये गुठली होण्याची शक्यता असते असे डॉ. महाजन यांनी सांगितले. महापालिकेच्या एकटय़ा शीव रुग्णालयाचा जरी विचार केला तरी तेथील हृदयविकार विभागात वर्षांकाठी ८३ हजार रुग्ण उपचारासाठी येतात तर तीन हजार रुग्णांवर अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर बसवणे आदी प्रक्रिया केल्या जातात. यात महिलांचे प्रमाण दहा टक्क्य़ांपेक्षा अधिक असल्याचे विभागप्रमुख डॉ. नाथानी यांनी सांगितले.
शहरी भागातील नोकरदार अथवा महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या मुलींमध्ये धुम्रपानाची सवय वाढत असल्याचे आढळून आहे आहे. भारतात अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार .५ टक्के महिला या धुम्रपान करतात. तसेच ग्रामीण भागात तंबाखुचे सेवन करणाऱ्या महिलांची संख्या मोठी असल्यामुळे ग्रामीण महिलांमध्येही कॅन्सर तसेच हृदयविकाराचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. यातही महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोकरी न करता केवळ चूल आणि मूल म्हणजे घरची जबाबदारी सांभाळणारी स्त्री ही सोशीक असल्यामुळे अनेकदा आपल्याला होणारा त्रास अंगावर काढण्याकडे कल असतो. बहुतेकवेळा नोकरदार अथवा घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला आपल्याला होणारा त्रासावर वेळीच तपासणी करून घेत नाहीत. यामुळे आजार बळावल्यानंतरच हृदयविकाराचा त्रास उघढकीस येतो. संतुलित आहार, नियमित व्यायाम सर्वासाठीच अत्यावश्यक आहे. विशेषत: मधुमेह व रक्तदाब असलेल्यांनी व्यायाम व खाण्यापिण्याची काळजी घेणे गरजेचे ठरते असे हृदयविकार तज्ज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी यांनी सांगितले. याशिवाय छातीत दुखणे, दरदरुन घाम येणे अथवा तत्सम कोणताही त्रास आढळल्यास तात्काळ जवळच्या रुग्णालय अथवा डॉक्टकडे जाऊन इसीजी काढणे आवश्यक असल्याचे डॉ. महाजन व डॉ. रत्नपारखी यांनी सांगितले.
सामान्यपणे जळजळ वाटते, बहुतेक अ‍ॅसिडिटी असेल असे मानून घरच्या घरीच इनो अथवा अँटासिड घेण्याकडे बहुतेकांचा कल असतो. ‘इंडियन हार्ट वॉच संस्थे’ने काही वर्षांपूर्वी भारतातील बारा प्रमुख शहरातील महिलांच्या आरोग्याचा अभ्यास केला होता. यामध्ये ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे अशा महिलांचे जास्त प्रमाण आढळून आले. एक लाख सहा हजार महिलांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३२ टक्के महिलांना हृदयविकाराचा त्रास असल्याचे दिसून आले. यात ३५ ते ४५ वयोगटातील स्त्रायांचे प्रमाण जास्त होते. यामध्ये .५ टक्के महिला धुम्रपान करणाऱ्या, ८३ टक्के महिला नोकरी करणाऱ्या, ४८ टक्के महिला चिज, पिझ्झासारखे हाय फॅट खाणे खाणाऱ्या, ५७ टक्के महिला भाज्या व फळे कमी खाणाऱ्या, ४५ टक्के महिला जास्त वजन असलेल्या, ३० टक्के महिलांना उच्च रक्तदाब तर ३७ टक्के महिलांमध्ये मधुमेह असल्याचे आढळून आले. ‘सफोला’ने केलेल्या एका सर्वेक्षणात ३५ पेक्षा कमी वय असलेल्या महिलांमध्ये केवळ १५ टक्के महिलांनी आपल्या कोलेस्ट्रोलची तापासणी केल्याचे दिसून आले.
अलीकडच्या काळात ताणतणाव, खाण्याच्या सवयी तसेच पुरेशी झोप न मिळाल्यामुळे आरोग्य बिघडून त्याच्या परिणामी हृदयविकाराचा त्रस उद्भवण्याचे प्रामाण वाढले आहे. त्यातही तीशी-पस्तशीमध्येही हृदयविकार होऊ शकतो हे लक्षात घेऊन प्रमुख्याने शहरांमध्ये राहणाऱ्या नोकरदार महिलांनी आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
– संदीप आचार्य

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 7:03 am

Web Title: womens take care of your heart
Next Stories
1 मरणाची भीती!
2 हिरव्या पालेभाज्यांची नवलाई!
3 तरुणांनो, हृदय जपा!
Just Now!
X