शब्दांकन- संपदा सोवनी  
पाठदुखी, कंबरदुखी आणि मणक्यांचे आजार केवळ वाढत्या वयातच होतात असे नाही. तरूण आणि अगदी लहान वयातही चुकीची जीवनशैली या आजारांना कारणीभूत ठरू शकते. मणक्यांच्या आजारांचे प्रकार कोणते, त्यांची लक्षणे काय, कोणत्या आजाराला कोणत्या तपासण्या फायदेशीर ठरतील याविषयी सांगताहेत मेंदू व मणक्यांचे तज्ज्ञ डॉ. मनीष सबनीस.
मणक्यांमध्ये नैसगिकत: चार वेगवेगळे बाक असतात. मानेला पुढच्या दिशेने, पाठीला मागच्या दिशेने, कंबरेला पुढच्या दिशेने आणि माकडहाडाला मागच्या दिशेने बाक असतो. हे चार बाक मिळून मणक्यांचा पूर्ण स्तंभ तयार होतो. हे बाक जोपर्यंत टिकून असतात तोपर्यंत मणक्यांच्या स्तंभाची लवचिकता टिकून राहते.
सतत सोफ्यावर, खुर्चीवर किंवा मोटारीत बसणे, दिवसभर संगणकासमोर बसून काम करणे अशा प्रकारच्या बैठय़ा जीवनशैलीत मानसिक कष्ट वाढले आणि शारिरिक कष्ट कमी झाले. त्यामुळे मणक्यांच्या जडणघडणीसाठी आवश्यक असणारे चांगले ओझे त्यांवर पडणे बंद झाले आणि चुकीच्या पद्धतीने मणक्यांवर येणारे ओझे वाढले. ‘आम्ही बारा तास संगणकावर बसून काम करतो’, असे जेव्हा तरूण अभिमानाने सांगतात तेव्हा आपला मणका बारा तास बसण्यासाठी बनलेला नाही ही बाब त्यांच्या लक्षात आलेली नसते. असा ताण मणक्यांवर सहन करण्यासाठी लागणारी लवचिकता चालण्याच्या व्यायामाने येऊ शकते. काही वर्षांपूर्वी प्रत्येकाकडे वाहन नसे. त्या निमित्ताने दररोज पायी चालणे आणि सायकल चालविण्यासारखे व्यायाम केले जात असत. आजच्या जीवनशैलीत ‘एग्झरसाईज’ जीवनातून हद्दपार झाला आणि केवळ ‘एग्झरशन’ उरले! अमेरिकन लोकांच्या जीवनशैलीबरोबरच त्यांचे आजारही आपण उचलले आहेत. ही जीवनशैली लहानपणापासूनच मणक्यांचे आजार होण्यास कारणीभूत ठरते. पंधराव्या वर्षी कोणतेही शारिरिक श्रम न करताही मणक्यांची चकती घसरण्याचा अर्थात ‘स्लिप डिस्क’चा आजार झालेला रूग्ण मी पाहिला आहे. चकती घसरण्यामागे व्यक्तीचे वजन खूप जास्त असणे, रोज लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागणे, फार कष्टांची कामे करावी लागणे हीच कारणे असावी लागतात असे मुळीच नाही. एखाद्या व्यक्तीच्या मणक्यांत नैसर्गिकरित्याच कमकुवतपणा असू शकतो. अशा कमकुवतपणाचे नेमके वैद्यकीय कारण अजुन उलगडलेले नाही.
वाढत्या वयानुसार होत जाणारी मणक्यांची झीज म्हणजे स्पाँडिलोसिस. मणक्यांचे नैसर्गिक बाक बिघडायला लागले की मणक्यांच्या स्तंभाची लवचिकताही कमी होऊ लागते. त्यामुळे मणक्यांवर विचित्र पद्धतीने वजन येण्याची प्रक्रिया सुरू होते. परिणामी मणक्यांच्या चकतीच्या कुंपणाची आणि चकतीचीही झीज सुरू होते. वाढत्या वयापरत्वे हा त्रास वाढत जातो. याला स्पाँडिलोसिस म्हणतात. हा आजार नव्हे.
 मणक्यांच्या इंग्रजी ‘एस’ अक्षराच्या आकाराच्या चार नैसर्गिक बाकांना आधार मिळेल अशा पद्धतीने न बसता चुकीच्या पद्धतीने बसले तरी पाठदुखी सुरू होऊ शकते. साधी बैठकही माणसाला भयंकर आजाराच्या दिशेने ढकलू शकते. हा त्रास एका दिवसांत निश्चितपणे होत नाही. दिवसांगणिक तो हळूहळू वाढत जातो. ओझे उचलताना, उचलण्यापेक्षा ओढणे बरे असे वाटून विचित्र पद्धतीने वाकून ओझे ओढण्याचा प्रयत्न केला जातो. एका हाताने वस्तू ओढताना मणक्याच्या एकाच बाजूच्या स्नायूंवर चुकीचा भार पडू शकतो. नव्वद अंशांच्या कोनात वाकून वजन उचलतानाही पाठीतून ताकद लावली जाते आणि पाठीला हिसका बसू शकतो. यांमुळे मणके व पाठदुखीच्या आजारांना आमंत्रण मिळते. शरीराच्या गुरूत्वाकर्षणाचा मध्य व्यवस्थित राहील अशा पद्धतीने शरीराची हालचाल केल्यास मात्र हे आजार होण्याची शक्यता खूप कमी होते.
काही मंडळींना पाठदुखीबरोबर पायात कळा येण्याचीही समस्या असते. काहींची पाठ दुखत नाही पण फक्त पायात कळा येतात. काही रूग्णांना मात्र पाठदुखी आणि पायात कळा येणे यातले काहीच न होता चालल्यावर पाय भरून येण्याचा किंवा पायांत मुंग्या येण्याचा आजार असतो. प्रत्येक पाठदुखी मणक्यांचाच आजार आहे का, पाठ दुखू लागल्यावर लगेच एमआरआय चाचणी करून घ्यावी लागेल का, पाठदुखी स्पाँडिलोसिसनेच होते का, असे असंख्य प्रश्न रूग्णांच्या मनात असतात. पाठदुखीसाठी केवळ चकती घसरून एखादी नसच दबली पाहिजे असे नाही. सांध्यात खराबी आल्यामुळे अर्थात ‘फॅसेट जॉईंट डिसफंकशन’मुळेही पाठदुखी सुरू होऊ शकते. विचित्र पद्धतीने वाकल्यावर, ओझे उचलल्यावर किंवा ओढल्यावर मणक्यांमधील स्नायूंच्या पडद्याला इजा होऊन वा लिगामेंट फाटून पाठ दुखू शकते. लिगामेंट फाटल्यामुळे होणारी पाठदुखी मात्र खूप काळ टिकू शकते.
एखाद्याची नस काही कारणाने दबली असेल तर त्या व्यक्तीचा त्रास केवळ कंबर दुखण्यापुरताच मर्यादित राहत नाही. ती नस पायात ज्या दिशेने गेलेली असते त्या दिशेने पायातही कळा येऊ लागतात. चालायला सुरूवात केल्यावर ते दुखणे वाढत जाते. याबरोबरच पायात थोडा बधिरपणा येऊ शकतो आणि आणखी त्रास वाढल्यावर पायातील ताकद कमी होण्याचीही शक्यता असते. पण काही मंडळींना बसल्यावर दुखते आणि चालल्यावर बरे वाटते. या लोकांना सांध्यांची समस्या, लिगामेंट फाटणे किंवा मणक्यांवर चुकीच्या पद्धतीने वजन पडणे या तीन पैकी कोणतीतरी एक समस्या असू शकते. काही वेळा एमआरआय चाचणीत चकती घसरलेली दिसते. पण चकती घसरून नस दबण्याने सामान्यत: जी लक्षणे दिसतात ती लक्षणे व रूग्णाची लक्षणे जुळत नसतात. त्यामुळे रूग्णाची पाठदुखी नक्की चकती घसरल्यामुळेच उद्भवलेली आहे का याचे निदान अचूक होणे गरजेचे आहे.
ज्या व्यक्तीच्या पाठदुखीचा त्रास पाठीपुरताच मर्यादित राहून तो पायाकडे पसरत नाही पण सुचविलेले व्यायाम व औषधे घेऊन पाठदुखी बरीही होत नाही, त्या व्यक्तीसाठी एक्स रे ही तपासणी फायदेशीर ठरू शकते. त्याद्वारे मणक्यांच्या रचनेत काही बदल आहे का हे तपासता येते. लगेच एमआरआय चाचणी करण्याची गरज भासत नाही. जेव्हा पाठ भयंकर दुखत असते, पायही दुखत असतात. चालल्यानंतर हा त्रास वाढत जातो. पायात बधिरपणाही असतो आणि हळूहळू पायातली ताकद कमी होण्याचीही भावना असते तेव्हा मात्र एमआरआय तपासणी गरजेची आहे. पायातून चप्पल वारंवार निसटणे, मांडी घालून बसल्यावर उठताना एकाच पायावर खूप जोर देऊन उठावे लागणे, खुर्चीत बसून हाताची घडी घालून उठण्याचा प्रयत्न केला असता उठता न येणे ही पायातली ताकद कमी होण्याची काही लक्षणे आहेत.  एमआरआय ही खूप संवेदनशील तपासणी असल्याने त्यात रूग्णाच्या नेमक्या समस्येविषयी अधिक माहिती कळते.
(क्रमश:)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bead disease cause symptoms and checking
First published on: 26-01-2013 at 12:16 IST