‘ब्रेन टय़ूमर झाला की सगळे संपले!’ अशी अनेकांची भूमिका असते. ‘टय़ूमर म्हणजे कॅन्सरच’ अशा भ्रमातही अनेकजण असतात. या चुकीच्या समजामुळे ब्रेन टय़ूमर हा ‘भीतीचा गोळा’ ठरतो! ब्रेन टय़ूमर म्हणजे नेमके काय, तो कसा होतो, त्यावरील अत्याधुनिक उपचारपद्धती कोणत्या, याबद्दल माहिती घेऊया या लेखामधून..
बंद कवटीत जेव्हा ब्रेन टय़ूमरची गाठ जागा व्यापू लागते तेव्हा तिचा दाब मेंदूवर पडायला लागतो. त्यामुळे ब्रेन टय़ूमरच्या ७५ ते ८० टक्के रुग्णांमध्ये टय़ूमर झाल्याची लक्षणे दिसून येतात. डोकेदुखी, उलटी होणे अशा लक्षणांबरोबरच मेंदूच्या ज्या भागावर दाब पडतो आहे त्या भागाशी संबंधित असलेल्या शारीरिक कार्यात बिघाड होणे अशी लक्षणे दिसू शकतात. या प्रकारात दृष्टी अधू होणे, दृष्टीस पडलेल्या गोष्टी लक्षात न राहणे, रंग ओळखता न येणे, बोलताना अडखळणे, हाता-पायातली ताकद कमी होणे अशा तक्रारीही आढळतात, पण वीस टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. काही रुग्णांत ब्रेन टय़ूमर खूप सावकाश वाढतो. त्यामुळे मेंदूतली जागा व्यापली जाण्याची प्रक्रियाही सावकाश होते. अशा रुग्णांमध्ये मेंदूला या गाठीची सवय होत जाते आणि त्यामुळे कोणतीही लक्षणेही दिसत नाहीत.
‘टय़ूमर झाला म्हणजे तो कॅन्सरच असणार’, असा सार्वत्रिक समज आपल्याकडे आढळून येतो, हे मात्र खरे नाही. टय़ूमरची गाठ कॅन्सरची नसलेलीही असू शकते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. मेंदूतील टय़ूमरची गाठ कॅन्सरची असण्याची शक्यता साधारणपणे ५० ते ६० टक्के असते. म्हणजेच उरलेल्या ५० टक्के रुग्णांचा टय़ूमर हा कॅन्सर नसतो. मेंदूतील कॅन्सरच्या नसलेल्या गाठी शस्त्रक्रियेद्वारे पूर्णपणे बाहेर काढता येतात. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण अल्पावधीत बरा होऊन अगदी पूर्वीसारखे आयुष्यही जगू लागतो. हे बऱ्याच रुग्णांना माहिती नसल्यामुळे ‘टय़ूमर झाला म्हणजे सगळे संपले’ या भावनेने रुग्ण आधीच मनाने खचतात. ‘टय़ूमरची शस्त्रक्रिया म्हणजे मरण’ या चुकीच्या कल्पनेमुळे काही रुग्ण शस्त्रक्रियेलाच नकार देऊन ‘असेल-नसेल ते आयुष्य तरी बरे जगावे!’ अशी भूमिका घेतात. त्यामुळे रुग्णांनी आपल्याला काय झाले आहे याविषयी वाचनाद्वारे माहिती मिळवत राहणे आवश्यक आहे. त्याद्वारे त्यांची दिशाभूल होणे टळेल.
गेल्या तीस वर्षांत ब्रेन टय़ूमरच्या शस्त्रक्रियांमध्ये प्रचंड प्रमाणात बदल झाले आहेत. पूर्वी जे टय़ूमर असाध्य मानले जात ते आज साध्य आहेत. ज्या शस्त्रक्रिया करायला पूर्वी दहा-दहा तास लागत त्या शस्त्रक्रिया आता दोन तासांतही होऊ शकतात. एमआरआय प्रतिमांसारख्या तंत्रांद्वारे टय़ूमरची गाठ खूप लहान असतानाच लक्षात येते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर दहा मिनिटांत रुग्ण शुद्धीवर येतो, बोलायलाही लागतो! लहान शस्त्रक्रियेनंतर तर रुग्णाला दुसऱ्या दिवशी रुग्णालयातून घरी सोडणेही शक्य होते. हा आमूलाग्र बदल गेल्या दहा वर्षांत झाला आहे.
परदेशात ज्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया केल्या जातात त्याही आज मुंबई-पुण्यात यशस्वीपणे केल्या जाऊ शकतात, पण राज्यातील जवळजवळ सर्वच जिल्ह्य़ांत ब्रेन टय़ूमरच्या शस्त्रक्रिया होण्याइतपत सुविधा नक्कीच उपलब्ध आहेत. मेंदूत रक्ताची गुठळी झालेल्या रुग्णालाही वाचवणे पूर्वी अवघड होत असे. आता तालुका पातळीवरही या शस्त्रक्रिया होऊ लागल्या आहेत. अद्ययावत दुर्बिणींचा शस्त्रक्रियेसाठी वापर, ‘क्यूसा’ म्हणजे ‘कॅव्हिट्रॉन अल्ट्रासाऊंड अ‍ॅस्पिरेटर’ चा वापर यामुळे शस्त्रक्रिया अधिक सुकर बनल्या आहेत. टय़ूमरचे लहान तुकडे करून काढण्याऐवजी क्यूसा या यंत्रणेद्वारे टय़ूमरला ‘व्हेपराईज’ करून म्हणजे वाफ स्वरूपात आणून शोषून घेता येते. आता ‘स्टिरिओटॅक्टिक सर्जरी’ त मेंदूतील कोणत्याही भागापर्यंत अचूकतेने पोहोचून टय़ूमरची ‘बायोप्सी’ करता येते. यात सर्वच रुग्णांना पूर्ण भूल देण्याचीही गरज नसते. ‘लोकल अ‍ॅनास्थिशिया’ देऊनही बायोप्सी करता येते. रुग्ण एकीकडे बोलत असताना त्याच्या मेंदूत सरळ ‘प्रोब’ घालून टय़ूमरची बायोप्सी काढणे म्हणजे पुढील निदानासाठी टय़ूमरचा तुकडा किंवा पस काढणे शक्य होते. या तुकडय़ाचा दुर्बिणीखाली अभ्यास केला जातो. त्यात कोणत्या प्रकारच्या पेशी आहेत यावर ती गाठ साधी आहे की कॅन्सरची आहे, याचे निदान होते. त्यावर पुढील उपचारांची दिशा ठरते.
मानवी जनुकांमध्ये होणारे बदल टय़ूमरसाठी मूलत: कारणीभूत ठरतात. प्रत्येक पेशीत आपल्यासारखीच पेशी निर्माण करण्याचा गुणधर्म असतो. ही नवी पेशी जुन्या पेशीसारखीच असते. त्यामुळेच शरीरातील काही पेशी खराब झाल्या तरी त्यांची कमतरता नव्या पेशी भरून काढतात. जनुकावर विपरीत परिणाम झाला तर नव्याने तयार होणारी पेशी वेगळ्या प्रकारची असू शकते. अशा वेगळ्या पेशींपासूनच पुढे गाठ निर्माण होण्याची शक्यता असते. भोवतालच्या नैसर्गिक बदलांचे दूरगामी परिणामही जनुकीय बदलांमध्ये दिसू शकतात. मोबाईल फोनचा अतिवापर ब्रेन टय़ूमरला कारणीभूत ठरतो असे म्हटले जाते. हे पुराव्यानिशी जरी सिद्ध करता येत नसले तरी प्रबळ इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी मानवातील जनुकीय बदलांसाठी कारणीभूत ठरू शकतात.
‘अमुक एक गोष्ट केली तर ब्रेन टय़ूमर होईल’, आणि ‘अमुक एक केले तर तो टाळता येईल’, अशी सोपी विभागणी करणे अशक्य आहे. पण ब्रेन टय़ूमर झाल्यानंतरही जीवन असाध्य नक्कीच नाही! त्यातून वाट काढायचे मार्ग आहेत. ते अगदी अत्याधुनिक आणि यशस्वितेच्या कसोटीवर उतरलेले आहेत.उपचारांनंतर रुग्ण त्याचे उरलेले आयुष्य अगदी पुर्वीसारखेच जगू शकतो. त्यामुळे ब्रेन टय़ूमर रुग्णाच्या आयुष्यात एखाद्या परीक्षेसारखा असेल कदाचित् पण तो भीतीचा गोळा ठरायला नको!  
डॉ. महेंद्र चित्रे
न्यूरोसर्जन
शब्दांकन- संपदा सोवनी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brain tumor feel dread
First published on: 13-04-2013 at 12:15 IST