दैनंदिन जीवनात माणसाला लहान-मोठय़ा संकटांना तोंड द्यावे लागते. काही धोक्याचे संकेत समोर आल्यावर व्यक्तीला भीती वाटते. भीती जाणवल्यामुळे माणूस वेळीच काळजी घेतो आणि धोका- इजा टळतात. भीतीच्या अनुभवांमध्ये तीन भाग असतात- भित्रे विचार, शरीरातील बदल आणि स्वतला वाचवण्याच्या कृती. भीती वाटल्यावर हृदयाचे ठोके वाढतात, मांसपेशीतील ताण वाढतो, श्वासगती वाढते, घाम येतो, रक्तातली साखर वाढते आणि रक्तदाब वाढतो- या बदलांमुळे व्यक्तीच्या शरीराला शक्ती मिळते ती परिस्थितीला तोंड देण्याची किंवा तिथून पळून जाण्याची.

भीती आजार कधी बनते?
काही व्यक्तींना धोका नसेल तेव्हाही भीती वाटते. या व्यक्ती कधीही ताणरहित नसतात. त्यांच्या मनात नेहमी वाईटच विचार येत असतात. एखाद्याला घरी यायला उशीर झाला तर अपघात झाला आहे, असे त्यांना वाटते. कुणी न्याहरी न घेता घराबाहेर पडले त्यांना चक्कर येऊन ते पडतील, असा विचार करतात. गाडी सतत हळू चालवण्याच्या सूचना चालकाला देत राहतात. लहान मुलांची आई त्याला खूप जास्त जपते. प्रवासाची खूप तयारी करून वेळेच्या खूप आधी निघण्याची त्यांची पद्धत असते. त्यांच्या अति भित्रेपणामुळे त्यांचे जीवन कोंडल्यासारखे होते आणि ते कशाचाही पूर्ण आनंद घेऊ शकत नाही. सतत विचार करत असल्याने त्यांना झोप लवकर लागत नाही. घरच्यांना त्यांचा अतिकाळजीचा आणि सतत सूचनांचा त्रास होतो. भित्रेपणा सतत असल्यामुळे काही अवयवांवर परिणाम होऊन त्यांना डोकेदुखी, अंगदुखी, आम्लपित्त, पोट साफ न होणे, थकवा, धाप लागणे, पोट गच्च वाटणे, छातीवर दडपण येणे असे त्रास सुरू होतात.
काही व्यक्ती नेहमी घाबरत नाहीत. किडे, अंधार, गर्दी, बंद जागा, उंचवटा, रक्त, ट्रेन किंवा विमानाचा प्रवास अशा विशिष्ट गोष्टीची किंवा स्थितीची त्यांना भीती वाटते. काही लोक इतरांसमोर बोलायला, सादरीकरण करायला घाबरतात, समारंभाच्या ठिकाणी सर्वाबरोबर जेवायला लाज वाटते किंवा घराबाहेरचे प्रसाधनगृह वापरायला घाबरतात. सर्वसाधारण व्यक्ती पहिल्या प्रथम काही गोष्टींना घाबरतात, पण नंतर त्यांची भीती कमी होते. या उलट वारंवार अनुभव झाल्यावरही सवय होण्याऐवजी या व्यक्तींची भीती वाढत जाते. बौद्धिक स्तरावर या व्यक्तींना माहीत असते की त्यांची भीती बिनबुडाची आहे, पण त्याप्रसंगी ते स्वतला थांबवू शकत नाही- त्यांना भीती वाटतेच. दीर्घकाळ भीती अनुभवल्याने व्यक्तिमत्त्व बदलते. काही व्यक्ती अतिउत्तेजित, अधीर आणि शीघ्रकोपी बनतात. तर काही व्यक्ती कुठेही एकटे जाण्यास किंवा अगदी घरीही एकटे राहण्यास नकार देतात. या व्यक्तींना निर्णय घेणे कठीण जाते. कुठलीही गोष्ट खूप तपासून घेण्याची सवय असल्यामुळे त्यांचा पटकन कशावरही विश्वास बसत नाही की कशाने समाधानही वाटत नाही. त्यांना शारीरिक आजारही लवकर होतात.
यावर काय उपचार करता येतील?
काही व्यक्तींच्या घरातील लोक त्यांना खूप सांभाळतात, त्यामुळेही त्यांची भीती तशीच राहते. घरातील एकच मूल, सर्वात लहान असणे, खूप वर्षांनी झालेले मूल किंवा आई-वडील भित्रे असतील तर असे होऊ शकते. त्या उलट काही कुटुंबांमध्ये खूप जोरात ओरडून बोलण्याची, एकमेकांची सतत िनदा करण्याची आणि कडक शिस्त पाळण्याची पद्धत असते. या घरातील मुलेही भित्री होतात. कुटुंबियांनी एकमेकांशी बोलताना प्रेमळ, शांत आवाजात बोलण्याची सवय करावी. भीती वाटत असल्यास, समजावून प्रोत्साहन देऊन ती कमी करण्याचा प्रयत्न करावा. त्यातूनही भीती कमी झाली नाही तर उपचाराकडे वळावे.
योगासनातील श्वासाभ्यासाने भित्रेपणा कमी होऊ शकतो. काही व्यक्तींना मसाजचा तात्पुरता फायदा होतो. समुपदेशनाने भीतीचे विचार कसे ओळखायचे आणि त्यांच्या आहारी कसे जायचे नाही त्याचा सराव करून घेतात. विशिष्ट भीतीला हळूहळू सामोरे जाऊन त्यांची सवय करता येते त्यामुळे काही गोष्टींबाबतची भीती कमी होते. शारीरिक बदल थांबवण्यासाठी औषधे दिली जातात. पण काही वेळेला भित्रेपणासाठी मानसोपचाराची औषधेदेखील द्यावी लागतात. आधी चारपाच दिवस या औषधांनी भीती वाढल्यासारखी वाटते, पण नंतर बरे वाटते. बऱ्याच व्यक्ती आपणच झोपेची गोळी घेत असतात. या गोळ्या तीन महिन्यांपेक्षा जास्त घेणे योग्य नाही. कारण त्यांचे मेंदूवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यापेक्षा मानसोपचाराची औषधे सुरक्षित आणि परिणामकारी असतात. भित्रेपणाचे आजार अनियंत्रित राहिल्यामुळे व्यक्तीचे शारीरिक आरोग्य, मनशांती आणि जीवनातील आनंद हिरावला जातो. त्याचे खरे व्यक्तिमत्त्वही गमावण्याची शक्यता असते. भीतीला कमी न लेखता त्यावर उपाय केल्याने हे सर्व दुष्परिणाम टळू शकतात.

lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय

vbkulhalli@gmail.com