‘‘उध्र्वजत्रुविकारेषु विशेषात् नस्य इष्यते ।
नासा हि शिरसो द्वारं तेन तद् व्याफ्य हन्ति तान् ।।’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाक हे शिरस्थानात प्रवेश करण्याचे द्वार आहे. त्यामुळे मानेच्या वरील अवयवांच्या सर्व विकारांमध्ये नाकाद्वारे दिलेले औषध गुणकारी ठरते. वाग्भटाचार्याच्या या सूत्राचे पालन करून १९९९ मध्ये नाकाच्या पोकळीत म्हणजे नेझल कॅव्हिटीत कॅन्सर झालेल्या ७५ वर्षांच्या लिमये आजोबांची आम्ही चिकित्सा केली. शस्त्रकर्माने नाकाच्या पोकळीतील कॅन्सरग्रस्त अर्बुद काढल्यावर त्याचा पुनरुद्भव होऊ नये म्हणून केमोथेरपी घेणे आवश्यक होते, मात्र वयाचा विचार करून लिमये आजोबांनी त्यास नकार दिला. परिणामी पुन्हा तेथेच उद्भवलेल्या दुष्ट अर्बुदाची चिकित्सा करण्याचे आव्हान आमच्यापुढे आले. नाकपुडीच्या पोकळीचा जवळजवळ पाऊण भाग अर्बुदाने व्यापला असल्याने आजोबांना श्वासोच्छ्वासात अडथळा येत होता. अशा वेळी त्रिफळा, ज्येष्ठीमध, गुग्गुळ अशा दूषित कफदोष, मांसधातू यांचा नाश करणाऱ्या शमन औषधांबरोबरच यष्टिमधु तेलाचे नस्य व औषधी द्रव्यांचे धूमपान नियमित करण्याचे महत्त्व त्यांना समजून सांगितले. त्यामुळे अर्बुदाचा आकार हळूहळू कमी होऊ लागला व तीन वर्षे लिमये आजोबांनी वानप्रस्थाश्रमातील आयुष्य चांगल्या प्रकारे व्यतीत केले. कॅन्सरने नव्हे तर वयोमानानुसार हृद्रोगाने त्यांचे निधन झाले.
पंचकर्मापकी नस्य हा उपक्रम प्राधान्याने कफ व वात दोषांचे विकार, डोळे-कान-नाक-मुख-घसा-मस्तिष्काचे व्याधी, वातवाही संस्थेचे म्हणजे नव्‍‌र्हस सिस्टिमचे आजार यांत लाभदायी ठरतो. विधिवत् नस्य करण्यासाठी रुग्णाला आसनावर झोपवून त्याचे डोके, चेहरा, मान, खांदा यांना किंचित गरम तेलाने मसाज करावा व मृदू शेक द्यावा. पाठीखाली व मानेखाली उशी घेऊन डोके पायापेक्षा खाली असेल अशा प्रकारे रुग्णास झोपवून एक नाकपुडी बोटाने बंद करून दुसऱ्या नाकपुडीत नस्याचे औषध सोडावे, अशा प्रकारे विशिष्ट मात्रेत नस्याचे औषध दोनही नाकपुडय़ांत घातल्यावर रुग्णाचे पाय, कान, टाळू, खांदे यांना मर्दन करावे. नस्यासाठी सामान्यत: तिळतेल, सिद्ध तेल, गाईचे तूप, सिद्ध घृत, दूध, औषधांचे ताजे स्वरस किंवा वस्त्रगाळ चूर्ण यांचा वापर केला जातो. तेल, तूप किंवा दुधाचे नस्य करण्यापूर्वी ते वाफेने किंवा कोमट पाण्यात ठेवून किंचित कोमट करावे. नस्य द्रव्य दीर्घश्वास घेऊन आत ओढून घ्यावे व घशात आल्यास थुंकून टाकावे. यानंतर साधारण ५-१० मिनिटे झोपून राहावे व उठल्यावर घशात साठलेला कफ काढून टाकण्यासाठी कोमट पाण्याने गुळण्या कराव्या. कफप्रधान व्याधींसाठी सकाळी, पित्तप्रधान व्याधींसाठी दुपारी व वातप्रधान व्याधीसाठी सायंकाळी किंवा रात्री नस्य करावे. तसेच विशिष्ट ऋतूंनुसारही दिवसाच्या विशिष्ट वेळी नस्य करावे असेही ग्रंथकारांनी सांगितले आहे. नस्याचे, त्याच्या कर्मानुसार विरेचन, बृंहण व शमन नस्य असे तीन प्रकार आहेत. प्रामुख्याने कफप्रधान दोष शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी वेखंड, ज्योतिष्मती अशा तीक्ष्ण औषधांनी सिद्ध केलेल्या तेल किंवा तुपाने विरेचन नस्य दिले जाते. बला, शतावरी, उडीद अशा अवयवांची शक्ती वाढविणाऱ्या औषधांनी सिद्ध तेल किंवा तुपाने दिल्या जाणाऱ्या नस्यास बृंहण नस्य म्हणतात. हे प्राधान्याने वातप्रधान व्याधींमध्ये दिले जाते. तर दोषांचे विशेषत पित्तप्रधान दोषांचे शमन करणाऱ्या अणुतेलासारख्या स्नेहाने दिल्या जाणाऱ्या नस्यास शमन नस्य म्हणतात. औषधी वनस्पतींचा ताजा स्वरस नाकात पिळून दिले जाणारे अवपीडक नस्य व औषधी चूर्ण फुंकून नाकात सोडले जाणारे प्रधमन नस्य होय. मर्श नस्य मोठय़ा मात्रेत म्हणजे ६, ८ व १० थेंब दिले जाते. हे सलग ७ दिवस दिले जाते. याउलट केवळ २-२ थेंब इतक्या अल्प मात्रेत परंतु दीर्घकाळ किंवा नित्यनियमाने दिल्या जाणाऱ्या नस्यास प्रतिमर्श नस्य म्हटले जाते. नस्य कोणत्या व्याधींत द्यावे कोणत्या व्याधींत देऊ नये याचेही ग्रंथकारांनी सविस्तर वर्णन केले आहे. तसेच ७ वर्षांखालील बालकांस व ८० वर्षांवरील वृद्धांस नस्य देऊ नये असा सामान्य नियम आहे.
श्रोत्र (कान), त्वचा, नेत्र, जिव्हा व नाक ही पाच ज्ञानेंद्रिये अनुक्रमे शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध या पाच प्रकारचे ज्ञान ग्रहण करतात तर वाचा, हात, पाय, गुद व जननेंद्रिय ही पाच कर्मेद्रिये प्रत्यक्ष कर्म करीत असतात. या १० इंद्रियांची सेंटर्स ज्याला आयुर्वेदाने इंद्रियबुद्धी असे नाव दिले आहे त्यांचे मस्तिष्क म्हणजे मेंदू हे स्थान असल्याने त्यांचे पोषण म्हणजे तर्पण करण्यासाठी नस्य ही महत्त्वपूर्ण चिकित्सा आहे. ही १० इंद्रिये प्राणवायूच्या आधिपत्याखाली असल्याने व वातदोषाचे शमन करण्यासाठी तेल हे श्रेष्ठ औषध असल्याने तिळतेलाचे किंवा औषधी सिद्ध तेलांचे नस्य इंद्रियांच्या स्वास्थ्यासाठी हितकर ठरते. कॅन्सरमध्ये मस्तिष्काचा कॅन्सर म्हणजे ब्रेन टय़ुमर, डोळ्यांचा कॅन्सर, नाकातील पोकळीत होणारे नेझोफ्यॅिरक्स व नेझल कॅव्हिटीचे कॅन्सर, मुखाचे विशेषत जिव्हेचा कॅन्सर यांत दुष्ट ग्रंथी अर्बुदादीमुळे त्या त्या अवयवांच्या कर्मामध्ये अडथळे निर्माण होतात. अशा वेळी ग्रंथी-अर्बुदादींची वाढ आटोक्यात ठेवून त्या त्या अवयवाला, स्थानाला बल देऊन कार्यशक्ती सुधारण्याचे दुहेरी कार्य नस्याद्वारे साध्य होते. त्यामुळे उपरोक्त प्रकारच्या कॅन्सरमध्ये उद्भवणाऱ्या पक्षाघात, तोंडाचा पक्षवध, मल-मूत्र विसर्जन अनियंत्रित होणे, विस्मरण, दृष्टिनाश, कर्णबाधिर्य, जिभेला चव न जाणवणे, गंध न समजणे अशा समस्यांपासून कॅन्सरच्या चिंतेमुळे, केमोथेरपी-रेडिओथेरपीचा दुष्परिणाम म्हणून उद्भवणाऱ्या निद्रानाशापर्यंत अनेक विकारांमध्ये नस्य ही प्रभावी चिकित्सा ठरते. शिरोगत कृमी हे आयुर्वेदीय ग्रंथकारांनी अनेक मस्तिष्कगत विकारांचे महत्त्वाचे कारण सांगितले आहे. मस्तिष्कगत अवयवांच्या कॅन्सरमध्ये हे संभाव्य कारण असल्यास अपामार्ग, विडंग, शेवग्याचे बीज अशा तीक्ष्ण व कृमिघ्न औषधांनी सिद्ध तेलाचे विरेचन नस्य करून दूषित दोषांचे निर्हरण करणे योग्य ठरते. मात्र कोणते व्याधी व रुग्ण नस्य देण्यास योग्य व अयोग्य आहेत, कोणत्या प्रकारचे नस्य द्यायचे, नस्यासाठी कोणते द्रव्य निश्चित करायचे, किती प्रमाणात व किती काळ नस्य द्यायचे याची निश्चिती तज्ज्ञ वैद्यांनीच करणे योग्य.
शिर म्हणजे मस्तिष्क व मुखाच्या कॅन्सरमध्ये आधुनिक वैद्यकात रेडिओथेरॅपी ही महत्त्वाची चिकित्सा असली तरी रुग्णांना त्यादरम्यान व नंतरही त्याचे अनेक दुष्परिणाम सहन करावे लागतात. तोंड येणे, तोंडाला कोरडेपणा जाणवणे, तोंडाची चव जाणे, वास न समजणे, जबडय़ाचे स्नायू आखडल्यामुळे तोंड पूर्णपणे उघडणे अवघड होणे व पर्यायाने अन्न गिळण्यास त्रास होणे, तोंडातून वारंवार कफाचा स्राव होणे, तेथील त्वचा काळी व अतिशय रूक्ष होणे, कान दुखणे, डोके दुखणे व निद्रानाश अशा रेडिएशनमुळे उद्भवणाऱ्या वात-पित्तप्रधान लक्षणांत विशिष्ट औषधी तेल किंवा तुपाच्या नियमित नस्याने निश्चितच लाभ होतो. केमोथेरपीमुळे केस गळणे ही तर कॅन्सररुग्णांची संवेदनशील परंतु अपरिहार्य समस्या आहे. कोणत्याही आयुर्वेदिक चिकित्सेने अशा प्रकारचे केस गळणे थांबत नसले तरी या काळात नियमित नस्य केल्यास पुन्हा येणारे केस काळेभोर, दाट व मऊ येतात असा अनुभव आहे.
केवळ कॅन्सर रुग्णांनीच नव्हे तर स्वस्थ व्यक्तींनीही नियमित नस्य केल्यास ज्ञानेंद्रिय व कर्मेद्रियाची कार्यशक्ती, स्मरणशक्ती व ज्ञानग्रहणशक्ती सुधारते, सुखप्रबोध म्हणजे रात्री शांत झोप लागते व सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटते, शरीराची कांती सुधारते, खांदे-मान व छाती भरदार होते, केस पांढरे होत नाहीत व गळत नाहीत, केसांना मऊपणा येतो व सर्वात शेवटी व महत्त्वाचे निरोगी असे शतायुष्य – दीर्घायुष्य मिळते असे नस्याचे अगदी समर्पक लाभ आयुर्वेदीय ग्रंथकारांनी सांगितले आहेत. आणि म्हणूनच आजच्या हेल्थ कॉन्शस समाजाने नस्यासारखी सोपी व प्रभावी आरोग्याची व आयुष्याची गुरुकिल्ली वैद्यांच्या सल्ल्याने नक्कीच अंगीकारावी!
– वैद्य स. प्र. सरदेशमुख

Web Title: Errhine therapy
First published on: 02-12-2014 at 07:38 IST