नवजात बाळाला झालेला कोणताही आजार त्याच्या घरच्यांची, विशेषत: ‘नव्या नव्या आईबाबां’ची झोप उडविणारा असतो. त्यातही बाळाला कावीळ झाल्याचे निदान झाले तर त्यांच्या तोंडचे पाणी पुरते पळते. पण बाळाची कावीळ दरवेळी गंभीर स्वरूपाचीच असते असे मुळीच नाही. अनेकदा या काविळीची तीव्रता कमी असल्यास कोणताही विशिष्ट उपचार न करताही ती बरी होऊ शकते. मात्र बाळाची कावीळ गंभीर स्वरूपाची आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे..
साधारणपणे ६० टक्के नवजात बालकांना कावीळ होते. काविळीत बाळाची त्वचा पिवळी पडते. ‘बिलीरुबीन’ नावाच्या पदार्थामुळे त्वचेला पिवळा रंग आलेला असतो. बाळाच्या रक्तातील लाल रंगाच्या पेशींचा नैसर्गिक प्रक्रियेतून किंवा काही आजारामुळे नाश झाल्यावर त्यातून बिलीरुबीन तयार होत असते. रक्तातले बिलीरुबीन काढून टाकण्याचे कार्य आपल्याच शरीरातील यकृत (लिव्हर) करत असते. नवजात अर्भकात पहिल्या काही दिवसांत यकृत अपरिपक्व असते. त्यामुळे ते बिलीरुबीन शरीराबाहेर काढून टाकण्यात असमर्थ ठरते. त्यामुळे बाळ पिवळे पडते.
जेव्हा नवजात बालकात कावीळ आढळते आणि ती होण्यासाठी दुसरा कुठलाच आजार कारणीभूत नसतो अशा स्थितीला ‘फिजिऑलॉजीकल जाँडिस’ म्हणजे नैसर्गिक कावीळ असे म्हटले जाते. अशा प्रकारची कावीळ नवजात बाळाचे यकृत पूर्णपणे विकसित झालेले नसल्याने होते. अपुऱ्या दिवसांच्या बाळात याचे प्रमाण  ७० टक्के तर पूर्ण दिवसांच्या बाळात हेच प्रमाण ६० टक्के एवढे असते. तर बाळाच्या रक्तातील बिलीरुबीनचे प्रमाण जर असाधारणपणे वाढलेले दिसले तर त्याला ‘हायपर बिलीरुबीनेमिया ’ असे म्हणतात. बहुसंख्य नवजात बालकांतील कावीळ आपोआप बरी होत असते. पण कधीकधी रक्तातील बिलीरुबीनचे प्रमाण नेहमीपेक्षा अधिक वाढते. तेव्हा मात्र त्याचा अनिष्ट परिणाम बाळाच्या मेंदूवर होण्याची शक्यता असते. या स्थितीला ‘केर्निक्टेरस’ असे म्हटले जाते. बाळाच्या मेंदूला इजा होऊ नये म्हणून रक्तातल्या असाधारणपणे वाढलेल्या बिलिरुबीनवर उपचारांची गरज भासते.
लक्षणे –
बाळाची त्वचा पिवळी किंवा नारिंगी रंगाची होते. त्वचेचा हा पिवळा रंग कधीकधी जन्मत:च असतो तर कधी जन्मानंतरच्या पहिल्या काही दिवसांत दिसून येतो. सुरुवातीला चेहऱ्यावरची त्वचा पिवळी पडते. नंतर तो पिवळा रंग हळूहळू बाळाच्या पोटाच्या त्वचेला अन नंतर पायावरही दिसू लागतो.
कारणे-
१)    नवजात बालकाला कावीळ होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे फिजिऑलॉजीकल जाँडीस हेच असते. यापूर्वी नमूद केल्याप्रमाणे त्यामुळे बाळाला कुठलाही अपाय संभवत नाही. या प्रकारची कावीळ जन्मानंतरच्या पहिल्या २४ तासांत होण्याची शक्यता असते.
२)    स्तनपानाशी निगडित कावीळ ( ब्रेस्ट मिल्क जाँडिस)
स्तनपानाशी निगडित काविळीच्या या प्रकारात सुरुवातीला बाळाला दूध नीट मिळत नसेल किंवा आईच्या दुधातील काही पदार्थ बाळाच्या रक्तातील बिलीरुबीनची पातळी वाढवीत असतील तरी कावीळ उद्भवते. या प्रकारामुळे वाढलेली रक्तातील बिलीरुबीनची पातळीही अपायकारक ठरत नाही.
३)    आई आणि बाळाचा रक्तगट किंवा आरएच फॅक्टर विसंगत असणे नवजात अर्भकाच्या काविळीला कारणीभूत ठरणारे महत्त्वाचे कारण आहे. रक्तगटाच्या किंवा आरएच फॅक्टरच्या विसंगतीमुळे बाळाच्या रक्ताचे विघटन होऊन बिलीरुबीनचे प्रमाण वाढते.
४)    नवजात बालकांना कावीळ होण्याच्या इतर कारणांत यकृताचे आजार, ‘ग्लुकोज ६ फॉस्फेट डीहायड्रोजनेझ’ या एन्झाइमची कमतरता आणि जंतुसंसर्ग यांचाही समावेश असू शकतो.
नवजात अर्भकांना कावीळ होण्याचा धोका केव्हा अधिक असतो?
०    मूल अपुऱ्या दिवसांचे असणे किंवा जन्मानंतरच्या पहिल्या काही दिवसांत नीट स्तनपान करत नसणे.
०    बाळाच्या मोठय़ा भावाला किंवा बहिणीला जन्मानंतर कावीळ झाली असेल तर.
०    नवजात अर्भकाच्या आईला मधुमेह असेल तर.
०    जन्मत:च बाळाला कावीळ असेल किंवा जन्मानंतर पहिल्या २४ तासांत बाळाला कावीळ दिसून आली असेल तर ती अधिक गंभीर होण्याचा धोका असतो.
संभाव्य गुंतागुंती कोणत्या?
जर बाळाच्या रक्तातील बिलीरुबीनची पातळी असाधारणपणे जास्त असेल तर त्याला ‘बिलिरुबिन एन्सेफॅलोपॅथी’ होण्याचा धोका असतो. ही गुंतागुंतीची परिस्थिती मेंदूची हानी करू शकते. रक्तातील बिलीरुबीनचे प्रमाण अधिक वाढू न देण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपचारांनी या गुंतागुंतीचे प्रतिबंधन करता येते.
उपचार
०    बहुसंख्य नवजात अर्भकांतील कावीळ ‘फिजिऑलॉजिकल जाँडिस’ प्रकारची असते. या प्रकारात बाळ पिवळे पडले तरी विशिष्ट उपचारांची आवश्यकता नसते. मात्र बाळाची कावीळ गंभीर प्रकारची आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.बाळाच्या रक्तातील बिलीरुबीनचे      प्रमाण मोजून त्या प्रमाणानुसार काविळीसाठी उपचार करावे लागतील की नाही, हे ठरवले जाते.
०    नवजात बाळाला मोठय़ा प्रमाणावर कावीळ झाली असली तर त्यासाठी ‘फोटो थेरपी’चे उपचार सुचविले जाऊ शकतात. त्यासाठी बाळाला वेगळ्या प्रकारच्या- बऱ्याचदा विशिष्ट निळ्या रंगाच्या प्रकाशात ठेवले जाते. त्यामुळे बिलीरुबीनची वाढलेली पातळी कमी करता येते. मात्र हे उपचार वैद्यकीय तज्ज्ञांकडूनच करून घेणे गरजेचे आहे.
०    बाळाच्या रक्तातील बिलीरुबीनचे प्रमाण उच्च असेल आणि बाळ फोटोथेरपीच्या उपचारांना प्रतिसाद देत नसेल तर त्यासाठी ‘एक्सचेंज ट्रान्सफ्युजन’ हा विशिष्ट उपचार केला जातो.
०    बाळाला नीट स्तनपान न केल्याने कावीळ झाली असेल तर त्याला पुरेसे स्तनपान कसे करावे, याबाबत आईला सल्ला दिला जातो. जर आईच्या दुधामुळे बिलीरुबीन वाढलेले असेल तर एक किंवा दोन दिवसासाठी स्तनपान बंद केले जाते. त्यामुळे बाळाच्या रक्तातील बिलीरुबीन कमी होते. तथापि, स्तनपान बाळासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने शक्यतोवर असे करणे टाळले जाते.
डॉ. संजय जानवळे
बालरोगतज्ज्ञ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaundice to new born baby
First published on: 20-04-2013 at 12:30 IST