News Flash

इंटिरियर – रेघा : वळणदार आणि नागमोडी

निसर्गातील कुठलीच गोष्ट फुटपट्टीसारखी सरळ नसते.

निसर्गात कोणतीही गोष्ट सरळसोट नसते. सरळ रेघांना मिळालेली वक्रता त्यांचं सौंदर्य खुलवते. अशा सौंदर्य खुलवणाऱ्या रेघा आपल्या आसपासच्या कितीतरी गोष्टींमध्ये इतक्या सहजपणे मिसळून गेलेल्या असतात, की आपल्या लक्षातही येत नाहीत.

माझी चार वर्षांची भाची मन लावून आई, बाबा आणि तिचे चित्र काढत होती. कुठलेही लहान मूल काढते तसे लाकडासारखे कडक हात-पाय आणि काडय़ांसारखी बोटे असलेल्या तिच्या चित्राला ‘काय मस्त आहे’ म्हणून मी कौतुक केले. पण ही आपली घुश्श्यातच. ‘बाबाचे गब्बू गब्बू पोट आणि आईचे कुरळे केस मला जमत नाहीत’ म्हणून ती अस्वस्थ झाली. त्या चित्रातील कृत्रिमपणा तिला जाणवला. एवढय़ा लहान मुलीलासुद्धा गोलाकार रेघांचा अभाव खटकला हे बघून मला आश्चर्य वाटले.

माणसाचे शरीर हे असे ताठच्या ताठ नसते, ते अनेक गोलाकार रेघांनी बनलेले असते. माणूसच काय पण निसर्गातील कुठलीच गोष्ट फुटपट्टीसारखी सरळ नसते. सरळसोट उंच दिसणाऱ्या डोंगरालासुद्धा उंचवटे व खड्डे असतात. प्राणी, पक्षी, झाडे, फळे-फुले, ढग, डोंगर. निसर्गातील कुठलीही गोष्ट उचला. त्यांचे चित्र एका रेघेच्या अभावी कृत्रिम व अपूर्ण दिसेल. ती रेघ आहे वक्राकार / गोलाकार रेघ. या गोलाकार रेघा सरळसोट रेघांपेक्षा मुलायम मृदू वाटतात. नदीसारख्या प्रवाही असणाऱ्या या रेघा प्रत्येक कोपऱ्यात आपल्या दिशा बदलतात. किती अंशांनी हे वळण घेतले आहे त्यावर या रेघांचा शांतपणा अवलंबून असतो. हे वळण घाटातल्यासारखे जास्त असेल तर छातीत धडकी भरवते. जर पिंपळपानासारखे सौम्य असेल तर आल्हाददायक वाटते. या रेघांची हीच खासियत आपण आपल्या गृहसजावटीत वापरू शकतो.

फर्निचर, भिंतीवरचे पॅनलिंग, सोफा व पडद्यावरील डिझाइन यामध्ये गोलाकार रेघा जरूर वापराव्यात. कारण त्यामुळे कलाकृतीमध्ये नावीन्य आणि कुतूहल निर्माण होते. बोजडपणा जाऊन हलकेपणा येतो. सरळ रेघांमध्ये ती रेघ कशी वळणार याचा आपल्याला साधारण अंदाज असतो. पण गोलाकार रेघांच्या बाबतीत आपल्याला अंदाजच करता येत नाही की ही रेघ आता काय वळण घेणार आहे. त्यामुळे मनात उत्सुकता राहते.

या गोलाकार रेघांचा दुसरा उपयोग म्हणजे ठेच / दुखापत कमी होण्यास मदत होते. आपण जाणतोच तीक्ष्ण कोपरा असलेल्या फर्निचरवर डोके आदळले किंवा चालताना त्याचा कोपरा लागला तर काय हालत होते. पण हाच फर्निचरचा कोपरा गोलाकार केला तर अपघाताची तीव्रता कमी होते. ज्या घरात लहान मुले किंवा म्हातारी माणसे आहेत त्या घरात तर असे कोपरे गोलाकार करणे फारच आवश्यक आहे. जेणेकरून उडय़ा मारताना, तोल जाऊन पडल्यावर कमीतकमी दुखापत होईल. चांगले दिसण्याबरोबरच ठेच लागू नये म्हणून जर का फर्निचरचे पाय न दिसतील असे थोडे आतमध्ये ठेवले तर संपूर्ण फर्निचर तरंगल्यासारखे दिसेल व सजावटीला वेगळीच मजा येईल.

सध्या क्लिओपात्रा म्हणून सोफ्याचा एक प्रकार बाजारात खूप लोकप्रिय आहे. अगदी डौलदार असलेल्या या सोफ्याच्या पाठीमुळे दिवाणखान्यात याला मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. औपचारिकपणे केलेल्या बैठकीच्या इतर फर्निचरमध्ये प्रामुख्याने गोलाकार रेघांचा वापर केलेला हा सोफा एकटा असूनसुद्धा लक्ष वेधून घेतो. एक गोष्ट फक्त लक्षात ठेवणे जरुरीचे आहे की हा सोफा थोडा वेळ बसण्यासाठी ठीक आहे. जास्त सुशोभित करण्याच्या नादात याला आरामदायी करणे राहून गेले आहे.

साठ-सत्तरच्या दशकात हिंदी सिनेमात मोठ्ठी घरे आणि दोन बाजूंनी झोकदार वळण घेतलेले गोलाकार जिने नेहमी पाहायला मिळत. त्या गोलाकार रेघांमध्ये एक प्रकारची नजाकत होती.  पूर्ण पिढीच या जिन्यांच्या प्रेमात होती. किती लोकांनी मनातल्या मनात त्या जिन्यावरून राजेश खन्ना स्टाइल वर- खाली केले असेल!!

गोलाकार रेघांप्रमाणे अजून एक रेघ आहे- नागमोडी रेघ. या दोन रेघांमध्ये फरक हा आहे की बऱ्याच वेळेला नागमोडी रेघा कोनात तीक्ष्णपणे वळतात. तर गोलाकार रेघा सौम्यपणे वळतात. नागमोडी रेघांमधील अंतर बऱ्याच वेळेला सारखे असते, तर गोलाकार रेघांना असे काहीही बंधन नसते. सजावटीत नागमोडी रेघांचा जास्त वापर डोळ्यांना त्रासदायक ठरू शकतो. मन अकारण चिडचिडे होऊ  शकते. सतत वर-खाली होणाऱ्या रेघांमुळे एखाद्या गोष्टीवर मन केंद्रित करणे अवघड होऊन बसते. त्यामुळे ह्य रेघांचा वापर अतिशय विचारपूर्वक व थोडय़ा प्रमाणातच करावा. एक मात्र आहे,  कल्पकतेने या रेघांचा उपयोग बुक शेल्फ्ससाठी, टेबलाच्या पायासाठी किंवा चप्पल स्टँडसाठी केला तर नेहमीपेक्षा सजावट निश्चितच वेगळी भासेल.

गंमत म्हणून तुम्ही मासिकातल्या कार्टून्सचा अभ्यास केलात तर लक्षात येईल की काहीही न लिहिता रेघांच्या मार्फत भावना कशा पोहोचवल्या जातात ते. पळताना मागे आडव्या रेघा पळण्याचा वेग दर्शवतात. चक्कर आली, टेंगूळ आले तर डोक्यावर गोलाकार रेघा आपल्याला खुदकन हसवतात. तर ओरडणे, चिडणे, शॉक बसणे या भावना दाखवायला नागमोडी रेघा काय  अचूक काम करतात. जिथे दहा ओळींमध्ये एखाद्या प्रसंगाचे वर्णन करावे लागते तिथे शि. द. फडणीसांच्या चित्रातील फक्त या  रेघांच्या मार्फत केलेले वर्णन बघून थक्क व्हायला होते.

एका ठिपक्यापासून रेघ सुरू होऊन परत त्याच ठिपक्याला येऊन मिळते तेव्हाच एखादा आकार पूर्ण होतो. पण हा आकार दर्शवायला रेघा पाहिजेतच असे नाही. आपला मेंदू ही मोठी अजब चीज आहे. दोन आडवे आणि त्याखाली दोन उभे ठिपके काढले तर मनातल्या मनात आपण ते चारही ठिपके जोडून चौकोन तयार करतो. आपला मेंदू हे एकत्रीकरण करून जी प्रतिमा तयार करतो ते गेस्टाल्ट तत्त्वावर आधारित आहे. मेंदू गाळलेल्या जागा भरतो. रस्त्यावर दोन लेन्सच्यामध्ये ठिपक्यांच्या रेघा मारल्या असतात. या रेघा जरी तुटक असल्या तरी आपल्या मनात ती एक अखंड रेघच असते, ज्यामुळे आपण लेन सोडून इकडेतिकडे जात नाही. ठिपक्यांच्या रेघा या दिसायला नाजूक तरी थोडक्यात पूर्ण अर्थ समजावून सांगणाऱ्या असतात. सुप्रसिद्ध चित्रकार व्हॅन गॉग यांनी चितारलेल्या अशाच तुटक रेघांचा वापर करून काढलेली चित्रे किती अर्थपूर्ण आहेत.

रेघांना फक्त लांबी नाही तर जाडीसुद्धा असते. रेघांचा स्वभाव त्यांच्या जाडीवर अवलंबून असतो. अगदी कमी जाडीची रेघ ही नाजूक, पटकन तुटेल अशी वाटते. अशा वेळी त्यांच्यात स्थिरता दाखवायची असेल तर त्यांचे एकत्रीकरण गरजेचे आहे. एखादे नाजूक नक्षीकाम, वेलबुट्टी हे पातळ रेघांच्या माध्यमातून दाखवल्यासच छान वाटते. सजावटीमध्ये एक प्रकारचा हलकेपणा येतो. त्याच्या विरुद्ध जाड रेघा या आक्रमक आणि कधीही न मोडणाऱ्या वाटतात. या रेघा सामथ्र्यवान व स्थिर भासतात. पण त्याचबरोबर जास्त प्रमाणातील यांचा उपयोग केला, तर सजावट अंगावर आल्यासारखी वाटते. पूर्वीच्या काळचे फर्निचर आठवून बघा. त्यात एकप्रकारचा जडपणा, बोजडपणा असायचा. कारण फर्निचर बनवायला लागणारी फ्रेम, दारे -खिडक्यांच्या चौकटी, दिवाण, खुच्र्या सर्व जाड लाकडामध्ये केले जायचे. त्याविरुद्ध आजकाल ‘स्लीक’चा जमाना आला आहे. त्यामुळे आजची घरे जास्त सुटसुटीत, आधुनिक व ऐसपैस वाटतात.

तर अशा या गमतीदार रेघा व त्यांचे वेगवेगळे स्वभाव!! या रेघांचा अभ्यासपूर्वक केलेला उपयोग गृहसजावट चांगली दिसण्यासाठी तर होतोच, पण त्याचबरोबर सुरक्षिततेसाठीपण होतो.

कॉलेजमध्ये लाइन मारण्यात बरेच लोक हुशार असतात. वरीलपैकी तुमची लाइन कुठली आहे? बाणासारखी सरळ का मोरपिसासारखी नाजूक गोलाकार की एकदम बोल्ड? की तुमचं तुम्हीच समजून घ्या ना म्हणणाऱ्या ठिपक्यांसारखी?…
वैशाली आर्चिक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2016 1:10 am

Web Title: interior decoration line
टॅग : House
Just Now!
X