19 February 2020

News Flash

बैठकीची खोली

कधी कधी एखाद्या गोष्टीला विशिष्ट नाव का पडले याचा इतिहास जाणून घेण्यात फार मजा येते.

बैठकीची खोली ही आपल्या कुटुंबाचा आरसा असते. ही घरातील प्रथमदर्शनी जागा असल्याने घराचे व त्याबरोबर घरातील माणसांबद्दलचे मत हे या खोलीवरून होते. त्यामुळे आपल्याकडील असेल नसेल तेवढी कलात्मकता व व्यवस्थितपणा या जागेसाठी उपयोगी आणावा.

कधी कधी एखाद्या गोष्टीला विशिष्ट नाव का पडले याचा इतिहास जाणून घेण्यात फार मजा येते. तो शब्द कसा अस्तित्वात आला यामागे बरेच वेळा काही सामाजिक, राजकीय कारणे असतात. आता हेच बघा ना पाहुण्यांचे स्वागत करण्याची, गप्पा छाटण्याची, लोळत टीव्ही बघण्याची आपल्या घरातील एक महत्त्वाची जागा म्हणजे आपली बैठकीची खोली. जिला आपण इंग्रजीत लिव्हिंग रूम म्हणून संबोधतो, तिला शंभर वर्षांपूर्वी ‘डेथ रूम’- मृत्यूची खोली म्हणून संबोधायचे हे माहीत आहे तुम्हाला? असे म्हणण्याचे कारण पहिल्या जागतिक युद्धानंतर पसरलेली साथ आणि त्या साथीत मरण पावलेले हजारो-लाखो लोक. या लोकांचे मृतदेह हे घराच्या पुढील खोलीत लोकांना दर्शनासाठी ठेवले जायचे. साथीने बराच काळ धुमाकूळ घातल्याने शेवटी घरातील या खोलीचे नामकरणच ‘डेथ रूम’ म्हणून झाले. पण पुढे जसजशी साथ ओसरू लागली, मृत्यूचे प्रमाण कमी झाले व घरातील प्रथमदर्शनी भागातील या खोलीचे महत्त्व बाकीच्या अनेक कारणांमुळे वाढू लागले तसे या खोलीला काय नाव द्यावे यावर चर्चा होऊ  लागली. तोपर्यंत बाकीच्या खोल्यांना झोपायची खोली, स्वयंपाकघर, मुलांची खोली वगैरे नामकरण करून झाले होते. त्यामुळे सरळ या जागेचे आता मृत्यूची खोली न म्हणता लिव्हिंग रूम- जिवंत खोली या त्याच्या विरुद्ध अर्थी शब्दाने बारसे केले गेले.

आपल्या घरात एकांतानुसार खोल्यांची विभागणी केली जाते. यामध्ये सर्वात जास्त प्रायव्हसी- एकांत लागणारी खोली म्हणजे झोपायची खोली व सगळ्यांना एकत्र जमवून दंगा करायची खोली म्हणजे आपली लिव्हिंग रूम- बैठकीची खोली. अर्थातच त्यामुळे बैठकीची खोली घराच्या सुरुवातीलाच येते तर झोपायची खोली (त्यातही मास्टर बेडरूम) घराच्या एकदम शेवटी. मधल्या भागात लोकांचे येणेजाणे थोडेफार खपवून घेतले जाईल अशी जेवणाची खोली, स्वयंपाकघर, पाहुण्यांची खोली वगैरे रचना केली जाते. एकांत, या एका मुद्यावरूनसुद्धा घरातल्या वेगवेगळ्या खोल्यांच्या व त्यातील फर्निचरच्या मांडणीत फरक पडतो. लहान मुलांना जसे आपण बोट धरून आपल्याला पाहिजे तसे, पाहिजे त्या वाटेने फिरवून आणतो. तशीच काहीशी खोल्यांची, फर्निचरची कल्पकतेने रचना केल्यास आपल्याला वाटते तिथपर्यंतच बाहेरच्या लोकांचा वावर आपण नियंत्रित करू शकतो. या लेखात बैठकीच्या खोलीची रचना कशी करावी हे आपण बघू.

घरातील कुठल्याही जागेचा म्हणजे ओसरीपासून गच्चीपर्यंत आपण कशा तऱ्हेने वापर करू शकू याचा सजावटीच्या आधीच नीट विचार केला पाहिजे. प्रत्येक जागेचा एकापेक्षा जास्त तऱ्हेने उपयोग होऊ  शकतो आणि बैठकीच्या खोलीचे तर अनंत उपयोग आहेत. वर सांगितल्याप्रमाणे पाहुण्यांची ऊठबस करायला, टीव्ही बघायला, खेळण्यासाठी, जेवणासाठी, मित्रांना पार्टी द्यायला, आराम करायला, आवडत्या खुर्चीत वाचत बसायला, घरगुती बारसे किंवा वाढदिवस साजरा करायला, घरगुती व्यवसायासाठी आणि जास्तीचे पाहुणे आले तर झोपण्यासाठीसुद्धा. या व्यतिरिक्त पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या त्या त्या कुटुंबाच्या जीवनातील आवश्यक भाग असतात. उदाहरणार्थ- दरवर्षी बसणारा गणपती किंवा न चुकता केली जाणारी सत्यनारायणाची पूजा व त्यानिमित्ताने मोठ्ठय़ा संख्येने येणारे लोक, यांची सोय आधीच करणे जरूरीचे आहे. त्याचबरोबर व्यवसायानिमित्त किंवा आवड म्हणून दिल्या जाणाऱ्या पाटर्य़ा याबद्दल डिझायनरला आधीच सांगणे जरुरी आहे. कुठलाही डिझायनर हा काही जादूगार किंवा मनातले ओळखणारा नसतो. त्याला/तिला जेवढे तुम्ही तुमच्या कुटुंब पद्धतीबद्दल आधीच सांगाल तेवढीच सजावट व्यवहार्य व्हायला मदत होते. अशावेळी डिझायनरसुद्धा तुमच्या गरजेनुसार फर्निचर व सजावट करून पुढील गैरसोय टाळू शकतो.

बैठकीच्या खोलीचा मुख्य वापर होतो एकत्र जमून गप्पा छाटण्यासाठी. त्यासाठी सोफे, खुच्र्या, पुफीज, बीन बॅग्स वगैरे ठेवून बसण्याची उत्तम व्यवस्था असणे गरजेचे आहे. गप्पांबरोबर खाणे हे आलेच. तेव्हा त्याच्याच जोडीला प्रत्येक माणसाला हातातील कप किंवा बाउल ठेवायला सोयीचे जाईल अशा रीतीने बाजूच्या व मधल्या टेबलांची सोय असायला पाहिजे. बसायची रचना ही नेहमी गोलाकार किंवा चौकोनी असावी; जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला दुसरी व्यक्ती दिसेल. बोलताना सगळी माणसे दिसावीत म्हणून सोफ्याच्या टोकाला बसून बोलू लागलात तर गप्पांची रंगत कशी वाढेल? एकदा एका घराचे पूर्ण नूतनीकरण करायच्या निमित्ताने त्या घराला भेट दिली. रुंदीच्या मानाने त्यांच्या बैठकीच्या खोलीची लांबी बरीच होती. पण म्हणून काय केले असेल त्या घरात? सरळ तीन सोफे एका ओळीत ठेवले होते. अगदी रेल्वे प्लॅटफॉर्मवरच्या बाकडय़ांसारखे. कसा संवाद साधायचा एकमेकांशी? पुढे सजावट करताना सरळ दोन वेगवेगळ्या बैठका केल्या. एकीकडे खोलीची रुंदी लक्षात घेता कमी जागा व्यापणाऱ्या फर्निचरची चौकोनी रचना व दुसरीकडे भारतीय बैठक. त्या दिवसापासून जेव्हा केव्हा घरमालकांची भेट होते तेव्हा ‘गप्पा मारायला काय मजा येते हो!’ हे ते आवर्जून सांगतात. किती छोटी गोष्ट पण बरेचदा त्याचाच विसर पडतो.

दुसरी गोष्ट, शक्य असेल तर बसण्याची जागा व टीव्हीमध्ये माणसांची सतत ये-जा  होईल अशी रचना करू नये. म्हणजे होते काय की, उत्साहाने टीव्हीवर एखादा रहस्यमय चित्रपट बघायला बसतो पण आपल्या व टीव्हीच्या मधूनच कामवाली बाई झाडू घेऊन या खोलीतून त्या खोलीत जाते, मुले स्वयंपाकघरात डबे हुडकायला जातात, आजोबा संथ गतीने पाणी प्यायला जातात. अशावेळी सगळी लिंक तुटून ‘का आपण चित्रपट पाहत आहोत?’ याचेच रहस्य वाटेल. तेव्हा फर्निचरची रचना अशी पाहिजे की जेणेकरून ही माणसांची वर्दळ मधून न होता बाजूने होईल आणि आपण मनसोक्त टीव्हीचा आनंद घेऊ शकू.

असे म्हणतात की बैठकीची खोली ही आपल्या कुटुंबाचा आरसा असते. ही घरातील प्रथम दर्शनी जागा असल्याने घराचे व त्याबरोबर घरातील माणसांबद्दलचे मत हे या खोलीवरून होते. त्यामुळे आपल्याकडील असेल नसेल तेवढी कलात्मकता व व्यवस्थितपणा या जागेसाठी उपयोगी आणावा. या खोलीला वापरलेली रंगसंगती, छताचे डिझाइन, पडदे, शोभेच्या वस्तू या गोष्टी लोकांना आकर्षित करणाऱ्या व स्वागतार्ह वाटणे जरूरी आहे. आपण संग्रह केलेल्या वस्तू, पेंटिंग यांना दिमाखाने दाखवायची हीच तर जागा आहे. फक्त लोकांसाठीच नाही, पण आपणसुद्धा दिवसभरच्या कामाने थकून आल्यावर घरात याच जागेचे प्रथम दर्शन होते. तेव्हा या जागेतून आपलेपणा व आनंद व्यक्त व्हायला पाहिजे.

घरातील बैठकीची खोली ही जरी सर्वात वर्दळीची जागा असली तरी या जागेलासुद्धा बाहेरच्या लोकांपासून एकांताची गरज असते. बैठकीच्या खोलीतच प्रवेशद्वार उघडत असेल तर छोटे पार्टिशन वगैरे घालून आडोसा करणे जरूरीचे असते. अशाने दारात उभ्या राहिलेल्या माणसाला आतमध्ये काय चालले आहे हे दिसत नाही. यामुळे एकतर सुरक्षितता वाढते व त्याचबरोबर आतील उपक्रमात खंड पडत नाही.

बैठकीच्या खोलीत नैसर्गिक प्रकाश व वायुविजनाची सोय तर पाहिजेच, पण त्याचबरोबर बाकीच्या खोल्यांपेक्षा या जागेत रात्रीच्या वेळी थोडय़ा नाटय़मय प्रकाशाची, मूड लायटिंगची सोय केल्यास पूर्ण खोलीच उठून दिसेल. असा प्रकाश पार्टीत रंगत आणेलच पण थकून विश्रांती घेतानासुद्धा उपयोगी पडेल. यामध्ये छतावरील मंद दिव्यांची रचना, एखाद्या मूर्तीला उठाव देणारी कलात्मक प्रकाशयोजना, वाचनाचा कोपराच फक्त उजळवणारी वरून लटकवलेली लॅम्पशेड वगैरे गोष्टींचा एकत्रित परिणाम सजावटीला खूप उंचीवर नेऊन ठेवतो.

तर अशी ही आपली लिव्हिंग रूम, बैठकीची खोली, दिवाणखाना.. काहीही नाव द्या. काम आटपून घरातील माणसांच्या ओढीने रात्री आपण घरी येतो पण माणसांबरोबर हीच खोली आपल्याला घरी आल्याचा खराखुरा आनंद देते. त्यामुळे यंदाच्या वर्षी हिच्या सजावटीवर विशेष लक्ष द्यायचा निश्चय आपण सगळेच जण करू या.

First Published on December 30, 2016 3:07 am

Web Title: living room interior design
Next Stories
1 कपाट नियोजन
2 फोकल पॉइंट
3 फ्रेम्स आणि पेंटिंग्ज
Just Now!
X