ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्सचे पारडे जड मानले जात असले तरी सनरायझर्स हैदराबादला कमी लेखण्याची चूक त्यांना महागात पडू शकेल. हैदराबादने मागील चार सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत, यापैकी एक विजय कोलकाताविरुद्धचाही आहे. त्यामुळे हैदराबादचा संघ कोलकातानंतर पाचव्या स्थानावर आहे. या पाश्र्वभूमीवर कोलकातावर दहशत असेल ती हैदराबादी हिसक्याची.
कोलकाताच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. गोलंदाजीच्या वादग्रस्त शैलीमुळे सुनील नरिनवर बंदी घातली गेल्यामुळे कोलकाताच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे.  शनिवारी दोन्ही संघ सामने खेळून रविवारी कोलकात्यामध्ये दाखल झाले आहेत. कोलकात्याने बंगळुरूकडून पराभव पत्करला आहे, तर हैदराबादने बलाढय़ चेन्नईला हरवण्याची किमया साधली आहे.
आतापर्यंत पाच वेळा कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात लढत झाली आहे. यापैकी तीनदा कोलकाताचा संघ जिंकला आहे; परंतु सध्याची कामगिरी पाहता हैदराबादचा संघ अधिक ताकदवान आहे. त्यामुळे डेव्हिड वॉर्नरसारख्या फलंदाजाला वेसण घालण्याचे महत्त्वाचे आव्हान कोलकात्याच्या गोलंदाजांवर असेल. वॉर्नरकडून नेतृत्वाला साजेसा खेळ होत आहे.  वॉर्नरला सामोरे जाण्यासाठी कोलकात्याकडे दक्षिण आफ्रिकेचा  गोलंदाज मॉर्ने मॉर्केल हे अस्त्र आहे.  मॉर्केलचा गंभीर कशा प्रकारे वापर करेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

सामन्याची वेळ : रात्री ८ वा.पासून
थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स, सोनी सिक्स.