अवकाळी पावसासह वादळ सध्या भारतातील अनेक शहरात घोंघावते आहे. मात्र बुधवारी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर ख्रिस गेलरुपी वादळ अवतरलं आणि या वादळात किंग्ज इलेव्हन पंजाबचा अक्षरक्ष: पालापाचोळा झाला. गेलने आपल्या अद्भुत फटकेबाजीचा अव्वल नजराणा सादर करत शतकी खेळी साकारली. गेलवादळाच्या बळावर बंगळुरूने २२६ धावांचा डोंगर उभारला. डोंगराएवढय़ा लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने लुटुपूटूच्या लढतीप्रमाणे खेळ केला आणि त्यांचा डाव ८८ धावांतच संपुष्टात आला. बंगळुरूने १३८ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्या चेंडूपासून केवळ आक्रमण धोरण स्वीकारलेल्या गेलने पंजाबच्या प्रत्येक गोलंदाजांचा समाचार घेतला. जॉन्सनच्या पहिल्याच षटकात त्याने २० धावा वसूल केल्या. संदीप शर्माच्या दुसऱ्या षटकात त्याने २४ धावा लुटल्या. या खेळीदरम्यान बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर ट्वेन्टी-२० प्रकारात १५०० धावा करणारा पहिला फलंदाज होण्याचा मान मिळवला. जॉन्सनच्या गोलंदाजीवर चौकार लगावत गेलने ट्वेन्टी-२० क्रिकेटमधले १४वे शतक पूर्ण केले. अक्षर पटेलने स्वत:च्या गोलंदाजीवर शानदार झेल टिपत गेलचा झंझावात संपुष्टात आणला. त्याने ७ चौकार आणि १२ षटकारांची लयलूट केली ५७ चेंडूंमध्ये ११७ धावा फटकावल्या. गेलची फटकेबाजी सुरू असताना विराट कोहलीने ३२ तर ए बी डी’व्हिलियर्सने ४७ धावांची खेळी केली. बंगळुरूने पंजाबपुढे २२७ धावांचे आव्हान ठेवले.
ज्या खेळपट्टीवर गेलने गोलंदाजांच्या ठिकऱ्या उडवल्या, त्याच खेळपट्टीवर बंगळुरूच्या गोलंदाजांनी पंजाबचा ८८ धावांत खुर्दा उडवला. जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा मिचेल स्टार्क आणि यंदाच्या हंगामातील पहिलाच सामना खेळणारा श्रीनाथ अरविंद यांनी प्रत्येकी ४ बळी घेतले.  

संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ३ बाद २२६ (ख्रिस गेल ११७, ए बी डी’व्हिलियर्स ४७ ; संदीप शर्मा २/४१) विजयी विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब : १३.४ षटकांत सर्वबाद ८८ (अक्षर पटेल ४०, मिचेल स्टार्क ४/१५, श्रीनाथ अरविंद ४/२७) सामनावीर : ख्रिस गेल