अत्यंत रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा अखेर ११ धावांनी पराभव झाला. या पराभवामुळे मुंबईचे प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याचे स्वप्न अखेर भंगले. बेन कटिंगने अखेरच्या तीन चेंडूपर्यंत सामना नेल्यामुळे कमालीची रंगत निर्माण झाली होती. परंतु, मोक्याच्या क्षणी फलंदाजांनी दाखवलेल्या कचखाऊ वृत्तीमुळे अखेर मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. बेन कटिंग्जने २० चेंडुत २ चौकार ३ षटकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. दिल्लीच्या गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी केली. संदीप लामिछाने, हर्षल पटेल आणि अमित मिश्रा यांनी प्रत्येकी ३ विकेट टिपल्या.

तत्पूर्वी, १७५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सने सुरूवात चांगली केली. सुर्यकुमार यादवने आपला आक्रमकपणा दाखवत प्रतिस्पर्धी गोलंदाजावर तुटून पडला. परंतु, ४ चेंडुंचा सामना करत १२ धावांवर तो तंबूत परतला. लामिछानेने त्याला बाद केले. दुसरा सलामीवीर लेविसची फटकेबाजी पाहता यादव तंबूत परतल्याचा त्याच्या फलंदाजीवर काहीच फरक पडल्याचे दिसले नाही. त्याने तुफान फटकेबाजी सुरू ठेवली होती. कर्णधार रोहित शर्मा जायबंदी झाल्याने पोलार्डला बढती देण्यात आली. परंतु, याचा त्याला फायदा घेता आला नाही. दोन जीवदाने मिळूनही पोलार्ड ७ धावांवर बाद झाला. तत्पूर्वी इशान किशन आणि लेविसही बाद झाले होते. पोलार्ड पाठोपाठ आलेला कृणाल पांड्याही स्वस्तात बाद झाला. कर्णधार रोहित शर्मा (१३ धावा) आणि हार्दिक पांड्याही (२७ धावा) लवकर बाद झाले. त्यामुळे संघ चांगलाच अडचणीत आला.

दरम्यान, ऋषभ पंत, व्ही शंकर यांच्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने निर्धारित २० षटकात ४ बाद १७४ धावा केल्या असून मुंबई इंडियन्सला १७५ धावांचे आव्हान दिले आहे. तत्पूर्वी दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीने पहिली तीन षटके चांगली खेळून काढली. ग्लेन मॅक्सवेल आणि पृथ्वी शॉ या सलामीवीरांनी पहिल्या तीन षटकांत १० च्या सरासरीने ३० धावा कुटल्या. परंतु, चौथ्या षटकात मुस्तफिजूर रहमानच्या चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात पृथ्वी शॉ (८ चेंडूत १२ धावा) धावबाद झाला. शॉ पाठोपाठ मॅक्सवेलही बाद झाला. बुमराहने त्याचा (१८ चेंडुत २२ धावा) त्रिफळा उडवला. कर्णधार श्रेयस अय्यरला मार्कंडेने स्वस्तात टिपले. अय्यरला ६ धावाच करता आल्या.

ऋषभ पंतने आपला फॉर्म या सामन्यातही कायम ठेवला. त्याने या हंगामातील सातव्या डावात आपले पाचवे अर्धशकत ठोकले. आपल्या खेळीत चौकार षटकारांची आतषबाजी करणार पंतला बाद करण्यात कृणाल पांड्याला यश आले. पंतने ४४ चेंडुत ४ चौकार ४ षटकारांच्या साहाय्याने ६४ धावा कुटल्या. दुसरीकडे त्याला व्ही शंकरने योग्य साथ दिली. शंकर ४३ धावांवर नाबाद राहिला.  यात त्याने ३ चौकार व २ षटकार ठोकले. मुंबईकडून कृणाल पांड्या, बुमराह, मार्कंडे यांनी एक-एक गडी टिपला तर एक फलंदाज धावबाद झाला.

UPDATES:

  • मुंबईचा ११ धावांनी पराभव, प्ले ऑफमधून मुंबई बाहेर
  • बेन कटिंगच्या आक्रमक फलंदाजीमुळे मुंबईच्या विजयाच्या आशा पल्लवित
  • मुंबईचे सात फलंदाज तंबूत परतले
  • मुंबईच्या फलंदाजीला लामिछाने-मिश्रा जोडगळीने खिंडार पाडले
  • मुंबईचा पाचवा बळी कृणाल पांड्याच्या रूपात गेला. कृणालला चार धावाच काढता आल्या. लामिछानीने घेतला बळी
  • लेविसचे अर्धशतक दोन धावांनी हुकले.
  • मुंबईला सलग दोन धक्के. लेविस, पोलार्ड एकापाठोपाठ तंबूत परतले
  • दुखापतीमुळे रोहित शर्मा ऐवजी पोलार्डला फलंदाजीची संधी
  • ईशान किशन ५ धावांवर बाद
  • मुंबईचा दुसरा गडीही बाद
  • मुंबईच्या ६ षटकांत १ बाद ५७ धावा
  • लेविसकडून चौकार-षटकारांची आतषबाजी
  • यादव लवकर बाद झाल्यानंतरही मुंबईची आक्रमक फलंदाजी
  • संदीप लामिछानेने घेतला बळी
  • मुंबईला पहिला धक्का, आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात सुर्यकुमार यादव १२ धावांवर बाद.
  • दिल्लीच्या २० षटकांत ४ बाद १७४. मुंबईला १७५ धावांचे आव्हान
  • व्ही शंकरने नाबाद ४३ धावा बनवल्या
  • पंत ६४ धावांवर बाद, यामध्ये ४ चौकार, ४ षटकारांचा पाऊस
  • ऋषभ पंतची वादळी खेळी कृणाल पांड्यांने संपुष्टात आणली.
  • चौकार, षटकारांची आतषबाजी
  • पंतचे सात डावातील पाचवे अर्धशतक पूर्ण
  • आणखी एका अर्धशतकाच्या उंबरठ्यावर पंत
  • ऋषभ पंतचा फॉर्म कायम, तुफान फटकेबाजी
  • श्रेयस अय्यरला मार्कंडेयने स्वस्तात टिपले. सहा धावांवर कृणाल पांड्याने त्याचा झेल पकडला.
  • दुसरा सलामीवीर ग्लेन मॅक्सवेलही २२ धावांवर बाद. बुमराहने त्याचा त्रिफळा उडवला.
  • चौथ्या षटकात सलामीवीर पृथ्वी शॉ १२ धावांवर धावबाद
  • पहिल्या षटकात दिल्लीच्या बिनबाद ९ धावा
  • मुंबईकडून कृणाल पांड्याकडून पहिले षटक
  • दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि ग्लेन मॅक्सवेल ही सलामीची जोडी मैदानात
  • दिल्लीच्या संघात अवेश खान ऐवजी लाएम प्लंकेटचा समावेश
  • दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला