कॅचेस विन द मॅचेस असे म्हणतात.. क्रिकेटमध्ये ही टर्म फारच प्रसिद्ध आहे. हैदराबादच्या संघाने आज राजस्थान रॉयल्सच्या संघाला रोखले ते याच कॅचेसच्या जोरावर. राजस्थान रॉयल्सची फलंदाजी हैदराबादच्या गोलंदाजीपुढे अक्षरशः ढेपाळली. त्यानंतर हैदराबादचा डाव सुरु झाला. हैदराबादचा वृद्धिमान सहा हा अवघ्या ५ धावांवर आऊट झाला. मात्र शिखर धवनने केलेली खेळी सनरायजर्स हैदराबादसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. ५७ चेंडूत १३ चौकार आणि १ षटकार लगावत शिखरने ७७ धावा काढल्या. तसेच शिखरने आपल्या फलंदाजीने राजस्थान रॉयल्सची गोलंदाजांना अक्षरशः फोडून काढले. १४८.९४ च्या स्ट्राईक रेटने राजस्थान रॉयल्सच्या संघाच्या गोलंदाजांची पिसे काढत शिखर धवनने हैदराबादच्या विजयाचे शिखर गाठले.

खरेतर अजिंक्य रहाणेची राजस्थान रॉयल्स ही टीम चांगला स्कोअर करेल असे वाटत होते. मात्र हैदराबादच्या गोलंदाजांपुढे त्यांची फलंदाजी ढेपाळली. एकट्या संजू सॅमसनने ४९ धावा केल्या. मात्र राजस्थानच्या एकाही फलंदाजाला २० ते ३० रन्सच्या पुढे जाता आले नाही. काहींना भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळेच राजस्थानच्या अवघ्या १२५ धावा झाल्या. वृद्धिमान सहा आऊट झाल्यावर शिखर धवन आणि केन केन विल्यम्सन या दोघांनी ११३ धावांची पार्टनरशीप करत सनरायजर्स हैदराबादला विजय मिळवून दिला. सनरायजर्स हैदराबादच्या संघात असलेल्या शिखरने यशाचे शिखर गाठल्याने पुन्हा जेव्हा या संघाचा सामना असेल तेव्हा त्याच्या खेळीकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष असेल.