आयपीएल २०१८ ला दणक्यात सुरूवात झाली असून प्रत्येक संघ सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी जीवतोड मेहनत करताना दिसत आहे. भारतभर आयपीएलचे सामने असल्यामुळे खेळाडूंना सतत प्रवास करावा लागतो. खेळाडूंना प्रवासातच आराम करण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे अनेक खेळाडू प्रवासात झोपणं पसतं करतात. पण सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू शिखर धवन मात्र त्याच्या सहकाऱ्यांना निवांत झोपूही देत नाही. सध्या या टीमचा फ्लाइटमधला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

४४ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये शिखरच्या हातात कापसासारखं काही तरी आहे. शिखर आरामात झोपलेल्या शाकिब अल हसनच्या नाकात तो कापूस घालतो आणि पटकन पाठी मागे जातो. शिखर फक्त एकदाच नाही तर अनेकदा करतो, शेवटी शाकिब त्याला पकडतोच. पण त्याच्यावर रागवण्याऐवजी तोही हसायला लागतो. शाकिबनंतर धवन इतर खेळाडूंसोबतही असेच करतो. १६ एप्रिलला शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले.

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार म्हणून आधी डेविड वॉर्नरकडे पाहिले जात होते. मात्र त्याच्यावर एक वर्षाची बंदी लागल्यामुळे त्याला आयपीएलमधूनही बाहेर पडावे लागले. डेविडशिवायही ही टीम सध्या चांगली कामगिरी करताना दिसत आहे. या टीमने आतापर्यंत तीन सामने खेळले असून तीनही सामन्यांमध्ये हैदराबादला विजय मिळाला आहे. डेविडनंतर केन विलियम्सनने कर्णधार पदाची धूरा सांभाळली आहे. आतापर्यंत सनरायझर्स हैदराबादने कोलकता, मुंबई आणि राजस्थानच्या टीमला हरवले आहे. १९ तारखेला हैदराबादचा सामना पंजाबशी होणार आहे.