आयपीएलच्या अकराव्या मोसमाची सुरुवात मुंबईसाठी निराशाजनक झाली असली तरी आज होणारा हैदराबाद सनरायजर्स विरुद्धचा सामना जिंकून विजयी ट्रॅकवर परतण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. यंदाच्या मोसमातला मुंबईचा हा दुसरा सामना असून पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून मुंबईला पराभव स्वीकारावा लागला होता. आयपीएलच्या बलाढय संघांमध्ये गणना होणाऱ्या मुंबईच्या संघाने नेहमीच आपल्या खेळात सातत्य राखले आहे. त्यामुळे या पराभवातून मुंबईचा संघ नक्कीच झेप घेईल असा चाहत्यांना विश्वास आहे.

फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाडयांवर मुंबईचा संघ संतुलित आहे. पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांडया यांच्याकडून अपेक्षित कामगिरी झाली नव्हती. पहिल्या लढतीत मुंबईने चेन्नईला विजयासाठी १६६ धावांचे आव्हान दिले होते. चेन्नईचे आठ फलंदाज ११८ धावांमध्येच तंबूत परतले होते. मुंबईचा संघ सहज विजय मिळवेल असे वाटत असतानाच ब्राव्होने (६८) दणकेबाज फलंदाजी करुन हाता-तोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावून घेतला. त्यामुळे आजच्या सामन्यात फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही मागच्या सामन्यातील चुका टाळाव्या लागतील.

हैदराबादचा संघ फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाडयांवर मजबूत आहे. भुवनेश्वर कुमार, शाकीब अल हसन, राशिद खान हे गोलंदाज तर विल्यमसन, शिखर धवन आणि वृद्धीमान सहा हे फलंदाज त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे आजचा सामना मुंबईसाठी तितका सोपाही नसेल.