आयपीएलच्या ११ व्या सिझनला मुंबईतल्या वानखेडे मैदानात सुरुवात झाली. पहिला सामना रंगला आहे तो मुंबई आणि चेन्नई या दोन संघांमध्ये. पहिल्या इनिंग्जनंतर मुंबईच्या संघाने चेन्नईपुढे १६६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. चेन्नईची सगळ्यात जमेची बाजू आहे ती म्हणजे त्यांची गोलंदाजी. यात भरीस भर म्हणून मागच्या वर्षीपर्यंत मुंबईकडून खेळणारा हरभजन यावर्षी चेन्नईकडून खेळतो आहे. त्यामुळे चेन्नईच्या संघाची गोलंदाजी आणखीच आक्रमक झाली आहे. इ लुईस धावचीत झाल्यावर रोहित शर्माने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र वॅटसनने त्याला झेलबाद केले.

त्यानंतर आलेल्या ईशान किशन सूर्यकुमार यादव या दोघांनी ८३ धावांची भागिदारी करत मुंबईचा डाव सावरला. त्यानंतर हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांनीही चांगली खेळी करत मुंबईची धावसंख्या १६० धावांच्या पुढे जाण्यास हातभार लावला.  कृणाल पंड्याची डावातली २२ चेंडूत केलेली ४२ धावांची खेळी निर्णायक ठरली. आता चेन्नई या धावसंख्येचा पाठलाग कसा करणार? मुंबईच्या संघाचे गोलंदाज प्रभाव पाडू शकणार का? हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. मुंबईच्या संघाने ४ गडी गमावत १६५ धावांची खेळी केली. आता चेन्नई हे लक्ष्य कसे गाठणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.