मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) बाद फेरीत पोहोचण्याच्या उद्देशाने थोडीशी धुगधुगी कायम राखण्यासाठी विजय अत्यावश्यक असलेल्या सामन्यात बुधवारी मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचे संघ एकमेकांशी भिडणार आहेत.

उत्तरार्धातील तीन सामन्यांमध्ये सलग विजय मिळाल्यानंतर मुंबईच्या बाद फेरीच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागल्यानंतर मुंबई थेट सहाव्या स्थानावर फेकला गेला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुकडून दारुण पराभव स्वीकारावा लागलेल्या पंजाबची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.प्रारंभीच्या सत्रात बहरात असलेल्या पंजाबच्या संघाला गेल्या पाच सामन्यांपैकी चारमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. पाचव्या आणि सहाव्या स्थानावरील या दोन संघांसाठी हा सामना म्हणजे यंदाच्या मोसमातील करो या मरो प्रकारातील असल्याने सामना संघर्षपूर्ण होणार आहे. मुंबईची सलामी चांगली होत असली तरी मध्य फळीत सातत्य नाही. सलामीला सूर्यकुमार यादव सातत्याने चांगली कामगिरी करीत आहे मात्र, त्याला इतरांकडून योग्य ती साथ मिळत नाही. त्यामुळे मुंबईची फलंदाजी ही त्यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरलेली आहे. रोहितने बेंगळूरुविरुद्ध केलेली ९४ धावांची खेळी वगळता तो एकही दमदार खेळी खेळू शकलेला नाही. त्यामुळे रोहित आणि त्यापाठोपाठ हार्दिक व कृणाल पंडय़ाकडूनही चांगल्या कामगिरीची गरज असून ते चमकले तरच संघाला पुढील अपेक्षा बाळगता येतील.

पंजाबची मदार पुन्हा एकदा लोकेश राहुल आणि ख्रिस गेल या फलंदाजांवरच आहे. बेंगळूरुविरुद्ध हे दोघे फारशी चमक दाखवू न शकल्याने आणि त्यानंतरच्या एकालाही मोठी धावसंख्या उभारता न आल्यामुळेच पंजाबचा संघ अवघ्या ८८ धावांत कोसळला होता. त्यामुळे त्या दोघांना रोखणे हेच मुंबईपुढील खरे आव्हान आहे. तर गोलंदाजीत मुजीब उर रहमान जायबंदी झाल्याने त्याची उणीव भरून काढण्याचे आव्हान पंजाबचा कर्णधार अश्विन आणि अक्षर पटेलसमोर राहणार आहे. ‘‘आमची कामगिरी मागील काही सामन्यांमध्ये ढेपाळली असली, तरी आता पुढील सामन्यांमध्ये कामगिरी उंचावून आम्ही बाद फेरीत पोहोचू , ’’ असा विश्वास पंजाबचा कर्णधार अश्विनने व्यक्त केला आहे.

* सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स