मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांचा सामना रंगला. या सामन्यात सूर्यकुमार यादव याची ५७ धावांची खेळी वगळली तर चर्चा झाली ती कृणाल पांड्याच्या आक्रमक खेळीची. कृणाल पांड्याने १२ चेंडूंमध्ये २ षटकार आणि ४ चौकार मारत मुंबईच्या विजयाचा कळस रचला. किंग्ज इलेव्हन पंजाबने मुंबईसमोर १७५ धावांचे आव्हान ठेवले होते.

सूर्यकुमार यादवने ४२ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि ३ षटकार लगावत ५७ धावांची खेळी केली. मात्र तो आऊट झाला. त्यानंतर मुंबईच्या संघाचे पुढचे तीन फलंदाजही ठराविक अंतराने बाद झाले. यानंतर हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या या दोघांवर सामन्यात विजय मिळवण्याची जबाबदारी आली. मात्र २३ धावांवर हार्दिक पांड्याही झेलबाद झाला. अशात कृणाल पांड्याने संयमी पण तितकाच आक्रमक खेळ करत मुंबईला विजय मिळवून दिला. त्याला कॅप्टन रोहित शर्मानेही साजेशी साथ दिली. कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा या सगळ्यांच्या खेळीमुळे मुंबईला विजय मिळवता आला. मात्र निर्णायक ठरली ती कृणाल पांड्याचीच कामगिरी!