चेन्नईविरूद्धच्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीला उतरलेली फिंच-पडीकल जोडी जपून फलंदाजी करत होती. पण फिंच १५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर देवदत्त पडीकल चांगली खेळी करत असताना सँटनरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा मोह त्याला आवरला नाही. त्याने खेळलेला फटका अपेक्षेपेक्षा खूपच उंच गेला आणि सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला नाही. त्यावेळी सीमारेषेवर असणाऱ्या डु प्लेसिसने चेंडू झेलला. पण आपला तोल जातोय हे समजताच त्याने चेंडू समोरच्या दिशेने येणाऱ्या ऋतुराज गायकवाडकडे फेकला. तो चेंडू ऋुतुराजने अप्रतिमपणे पकडला आणि पडीकलला माघारी पाठवलं.

पाहा हा भन्नाट झेल….

‘विराटसेना’ हिरव्या जर्सीत

विराट कोहलीचा बंगळुरू संघ चेन्नईविरूद्धच्या सामन्यात नियमित लाल रंगाच्या जर्सीऐवजी हिरवी जर्सी परिधान करून मैदानात उतरला. यामागचे कारण म्हणजे पर्यावरण आणि वृक्षांबद्दल सर्वांमध्ये जागरूकता (Go Green Initiative) निर्माण करणं हे आहे. प्रत्येक स्पर्धेत एका सामन्यासाठी बंगळुरूचा संघ हिरव्या रंगाची जर्सी परिधान करून सामना खेळतो. २०११पासून बंगळुरूचा संघ हा स्तुत्य उपक्रम करतो आहे. गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध तर २०१८ ला राजस्थानच्या संघाविरूद्ध बंगळुरूने हिरवी जर्सी परिधान करून सामना खेळला होता.