हैदराबादच्या संघाविरूद्ध मुंबई इंडियन्सने ३४ धावांनी दमदार विजय मिळवला. शारजाच्या मैदानावरील सामन्यात मुंबईच्या संघाने २०८ धावांपर्यंत मजल मारली. क्विंटन डी कॉकचे अर्धशतक आणि इतर फलंदाजांच्या छोटेखानी खेळी यांच्या जोरावर मुंबईने दोनशेपार मजल मारली. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ २० षटकांत १७४ धावांपर्यंतच मजल मारु शकला. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ६० धावांची झुंजार खेळी केली, पण त्याला चांगली साथ लाभली नाही. त्यामुळे हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला.

सलामीवीर जॉनी बेअरस्टो-डेव्हिड वॉर्नर जोडीने हैदराबादच्या डावाची आश्वासक सुरुवात केली. पण बेअरस्टो स्वस्तात माघारी परतला. यानंतर मनिष पांडे आणि वॉर्नर यांनी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ही जोडी मैदानात स्थिरावणार असं वाटत असतानाच मनिष पांडे जेम्स पॅटिन्सनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने ३० धावांची खेळी केली. यानंतर हैदराबदच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी निराशा केली. एकीकडे कर्णधार वॉर्नर फटकेबाजी करत असतानाही केन विल्यमसन आणि प्रियम गर्ग स्वस्तात माघारी परतले. यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नरही पॅटिन्सनच्या गोलंदाजीवर बाद झाला. विजयासाठी आवश्यक धावगती वाढत जात असल्याने वॉर्नरने बाहेरचा चेंडू फटकावण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी इशान किशनकडे अप्रितम झेल टिपत त्याला बाद केले. वॉर्नरने ४४ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ६० धावा केल्या.

पाहा तो झेल-

प्रथम फलंदाजी करताना रोहित ६ धावांवर बाद झाला. रोहितनंतर सूर्यकुमार यादवने दमदार फटकेबाजी केली, पण तो फटकेबाजीच्या प्रयत्नात १८ चेंडूत ६ चौकारांसह २७ धावा करून माघारी परतला. गेले काही दिवस खराब कामगिरी करणाऱ्या क्विंटन डी कॉकने आज अर्धशतक ठोकलं. त्याने ६७ धावा (३९) केल्या. त्याने ४ चौकार आणि ४ षटकार खेचले. त्याच्याशिवाय, इशान किशन (३१), हार्दिक पांड्या (२८), कायरन पोलार्ड (२५*) आणि कृणाल पांड्या (२०*) यांनी छोटेखानी खेळी करत मुंबईला २००पार पोहोचवले. सिद्धार्थ कौल आणि संदीप शर्मा यांनी २-२ बळी टिपले.