चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाला दुसऱ्या सामन्यापूर्वी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. करोनाची लागण झालेल्या ऋतुराज गायकवाडची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आली आहे. सोमवारी सकाळी मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाड सरावासाठी नेटमध्ये हजर राहिला होता. चेन्नई संघानं आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर याबाबत माहिती दिली आहे. फोटो शेअर करत चेन्नईने ऋतुराज गायकवाडचं मैदानावर स्वागत केलं आहे.

जवळपास महिनाभरानंतर ऋतुराज गायकवाड मैदानावर परतला आहे. त्यानं आपला अलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला. शिवाय करोनाच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. ऋतुराज गायकवाड मंगळवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

स्थानिक क्रिकेटमध्ये महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडला यंदा सुरेश रैनाच्या जागेवर चेन्नईच्या संघात स्थान मिळणार अशी चर्चा होती. परंतू काही दिवसांपूर्वी दीपक चहर आणि ऋतुराज यांचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला. दीपकने यामधून सावरत करोनावर मात केली, परंतू ऋतुराजला यातून सावरायला थोडा वेळ गेला. मात्र, मंगळवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.


भारत अ आणि स्थानिक क्रिकेट स्पर्धेत खेळताना ऋतुराजने कमालीची कामगिरी करत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं होतं. सुरेश रैनाने आयपीएलच्या तेराव्या हंगामातून माघार घेतल्यानंतर ऋतुराजला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळाली होती…परंतू दरम्यानच्या काळात करोनाची लागण झाल्यामुळे त्याला सलामीच्या सामन्याला मुकावं लागले होतं. मात्र, करोनावर मात करत त्यानं पुनरागमन केलं आहे.