विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली RCB च्या संघाने तेराव्या हंगामात बहारदार कामगिरी केली आहे. प्ले-ऑफच्या शर्यतीत दाखल होण्यासाठी RCB चा संघ अवघी काही पावलं दूर आहे. रविवारी दुबईच्या मैदानावर चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध सामन्यात RCB चा संघ हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरला. प्रत्येक हंगामात एक सामना RCB चा संघ पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यासाठी हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानावर उतरतो. चेन्नईविरुद्ध सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

आयपीएलच्या इतिहासात RCB चा संघ आणि हिरव्या रंगाची जर्सी यांचं एक खास कनेक्शन आहे. २०११ च्या हंगामापासून RCB चा संघ हिरव्या जर्सीवर सामने खेळतो आहे. या ९ वर्षांच्या काळात RCB चा संघ हिरव्या जर्सीवर खेळताना फक्त २ वेळा सामने जिंकला आहे आणि या दोन्ही हंगामात म्हणजेच २०११ आणि २०१६ साली RCB ने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

आतापर्यंत RCB ने दोनवेळा आयपीएलची अंतिम फेरी गाठलेली असली तरीही विजेतेपद मिळवण्यात ते अपयशी ठरले आहेत. चेन्नईविरुद्ध सामन्यात RCB च्या फलंदाजांनी आश्वासक सुरुवात केली. पडीकल आणि फिंच यांच्यात ३१ धावांची भागीदारी झाल्यानंतर सॅम करनने फिंचला माघारी धाडलं. यानंतर देवदत पडीकलही सँटनरच्या गोलंदाजीवर माघारी परतला.