Dream11 IPL 2020 UAE: IPL स्पर्धेला शनिवारपासून सुरूवात झाली. सलामीच्या सामन्यात चेन्नईच्या महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईचा संघ २० षटकात ९ बाद १६२ धावांपर्यंतच मजल मारू शकला. या मुंबईच्या संघाने दणकेबाज सुरूवात केली होती, पण धोनीच्या अनुभवी नेतृत्वाने पुन्हा एकदा चेन्नईला तारलं. रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, हार्दिक आणि कृणाल पांड्या या खेळाडूंना मात्र आपली छाप पाडता आली नाही.

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी चांगली सुरूवात केली होती. पॉवरप्लेचा फायदा घेण्याच्या दृष्टीने हवेत चेंडू टोलवला आणि रोहित झेलबाद झाला. त्याने १० चेंडूत १२ धावा केल्या. दमदार सुरूवात केल्यानंतर रोहितपाठोपाठ क्विंटन डी कॉकही माघारी परतला. ५ चौकारांसह त्याने २० चेंडूत ३३ धावा कुटल्या, पण सॅम करनच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. सौरभ तिवारी आणि सूर्यकुमार यादव यांच्यात चांगली भागीदारी होत असतानाच सूर्यकुमार यादव बाद झाला. मोठा फटका खेळण्याच्या नादात तो १७ धावांवर बाद झाला. दमदार फलंदाजी करणाऱ्या सौरभ तिवारीचा सीमारेषेवर डु प्लेसिसचा अप्रतिम झेल टिपला आणि सौरभ तिवारी बाद झाला. त्याने ३१ चेंडूत ४२ धावा केल्या.

धडाकेबाज खेळाडू हार्दिक पांड्याने केवळ १४ धावा केल्या. पण त्यात दोन उत्तुंग अशा षटकारांचा समावेश होता. रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर पहिला षटकार त्याने गुडघ्यावर बसून मारला तर दुसरा षटकार क्रीजमध्ये फिरून मारला. दुसऱ्या षटकारात इतकी ऊर्जा होती की तो चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर छतावर जाऊन पडला.

पाहा ते दोन षटकार-

नंतर हार्दिक पांड्या तिसरा षटकार खेचण्याच्या नादात बाद झाला. एकाच षटकात दुसऱ्यांदा सीमारेषेवर आपली करामत दाखलत डु प्लेसिसची झेल टिपला आणि हार्दिक पांड्याला माघारी धाडले. हार्दिकने १० चेंडूत २ षटकारांसह १४ धावा केल्या. कृणाल पांड्याही ३ चेंडूत ३ धावा करून बाद झाला. अखेरच्या काही षटकात चेन्नईच्या गोलंदाजांनी सामन्यात ‘कमबॅक’ केलं आणि मुंबईच्या डावाची घसरण सुरू झाली. उत्तुंग षटकार लगावण्याची क्षमता असलेला पोलार्ड १८ धावांवर माघारी गेला. नंतर पॅटिन्सनदेखील ११ धावांवर बाद झाला. त्यामुळे मुंबईला १६२ धावांपर्यंतच मजल मारता आली.