तब्बल दीड महिन्यापेक्षा जास्त काळ रंगलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा अंतिम टप्पा आता जवळ येऊन ठेपला आहे. मंगळवारी दिल्ली आणि मुंबई यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. हैदराबादवर मात करुन दिल्लीने अंतिम फेरीचं तिकीट बुक केलं आहे. आतापर्यंतच्या इतिहासात अंतिम फेरीत प्रवेश करण्याची दिल्लीची ही पहिलीच वेळ ठरली आहे. यंदाच्या हंगामात दिल्लीच्या संघासाठी कगिसो रबाडा हा हुकुमाचा एक्का ठरतो आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही रबाडाने मोक्याच्या क्षणी विकेट घेत दिल्लीला सामन्यात पुनरागमन करुन दिलं.

आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये रबाडाने २९ बळी घेतले आहेत. केवळ १६ सामन्यांमध्ये रबाडाने ही कामगिरी करुन दाखवली आहे. एका हंगामात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत रबाडा सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत CSK चा ड्वेन ब्राव्हो ३२ बळींसह पहिल्या स्थानावर आहे. २०१३ साली झालेल्या हंगामात ब्राव्होने एकाच हंगामात ३२ बळी घेतले होते. त्यामुळे ब्राव्होचा हा विक्रम मोडण्यासाठी रबाडाला अंतिम सामन्यात ४ बळींची आवश्यकता आहे.

अवश्य वाचा – IPL मध्ये आतापर्यंत कसा राहिला आहे दिल्ली संघाचा प्रवास, जाणून घ्या…

ब्राव्होव्यतिरीक्त मुंबई इंडियन्सच्या लसिथ मलिंगाने २०११ साली तर राजस्थान रॉयल्सच्या जेम्स फॉकनरने २०१३ साली २८ बळी घेतले होते. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रबाडाने कर्णधार डेव्हिड वॉर्नरची महत्वपूर्ण विकेट घेतली. यानंतर मोक्याच्या षटकांमध्ये अब्दुल समद, राशिद खान आणि श्रीवत्स गोस्वामी यांचा बळी घेत दिल्लीच्या संघाला विजय मिळवून दिला.

अवश्य वाचा – IPL 2020 : अंतिम फेरी गाठणं ही सर्वोत्तम भावना – श्रेयस अय्यर