नामांकित खेळाडूंनी सजलेल्या गतविजेत्या मुंबई इंडियन्सला IPL 2020च्या पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आज होणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या लढतीत यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवण्यासाठी मुंबई उत्सुक आहे. मुंबईला २०१३पासून अद्याप एकाही हंगामात सलामीची लढत जिंकता आली नाही. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यातही मुंबईने ही परंपरा कायम राखली. पण पराभवाने खचून न जाता झोकात पुनरागमन करण्यात मुंबईचा संघ पटाईत आहे. त्यामुळे कोलकाता संघाविरूद्ध मुंबईचा संघ दमदार पुनरागमन करणार का याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. मुंबई आणि कोलकाता यांच्यात आतापर्यंत २५ IPL सामने झाले असून मुंबईने १९ विजयांसह कोलकातावर निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. कोलकाताला फक्त सहाच सामने जिंकता आले आहेत.

कधी पाहाल सामना?

मुंबई आणि कोलकात यांच्यातील सामन्याची वेळ सायंकाळी ७.३० वाजता आहे. ७ वाजता नाणेफेक होणार असून त्यानंतर अर्ध्या तासाने सामन्याला सुरूवात होईल.

कुठे पाहाल सामना?

यंदाचे आयपीएल हे युएईमध्ये रंगले आहे. या सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आलेला नाही. पण सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १, आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ या वाहिन्यांवर होणार आहे.

लाईव्ह अपडेट्स-

या सामन्याचे लाईव्ह अपडेट्स आणि इतर रंजक बातम्या तुम्ही लोकसत्ता.कॉमवरही पाहू शकता.

मुंबईच्या फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने सलामीवीर रोहित शर्मावर आहे. चेन्नईविरुद्ध रोहित १२ धावांतच माघारी परतला. तेथूनच मुंबईची फलंदाजीही ढेपाळली. त्याशिवाय अखेरच्या षटकांमध्ये हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड यांनीही अपेक्षित फटकेबाजी केली नाही. कोलकाता संघात अनेक फिरकीपटूंचा भरणा असल्याने त्यांच्याविरुद्ध हार्दिक, पोलार्ड कशी फलंदाजी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. मुंबईसाठी पहिलाच सामना खेळणाऱ्या ट्रेंट बोल्ट आणि जेम्स पॅटिन्सन यांनी गोलंदाजीची चांगली सुरूवात करून दिली होती, पण भरवशाचा जसप्रीत बुमरा अपयशी ठरल्यामुळे मुंबईला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आजच्या सामन्यात बुमराहच्या कामगिरीवरही विशेष लक्ष असणार आहे.

दुसरीकडे दोन वेळचा ‘आयपीएल’ विजेता कोलकाताचा संघ आंद्रे रसलवर मोठय़ा प्रमाणावर अवलंबून आहे. गतवर्षी रसेलनेच कोलकातासाठी सर्वाधिक धावा आणि बळी मिळवले होते. परंतु यंदा रसलबरोबरच इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार इआन मॉर्गनच्या फलंदाजीवरही चाहत्यांचे लक्ष असेल. रसेलचे अंतिम ११ खेळाडूंतील स्थान पक्के असले तरी मॉर्गनलाही पहिल्याच लढतीत खेळायची संधी मिळणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. शुभमन गिल कोलकाताकडून सलामीला येणे अपेक्षित आहे. गोलंदाजीत कोलकाताला पॅट कमिन्सकडून सर्वाधिक अपेक्षा असतील. यंदाच्या ‘आयपीएल’चा कमिन्स सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला होता. तसेच कुलदीप यादव आणि सुनील नारायण हे फिरकीपटूही कोलकाताच्या ताफ्यात असल्याने त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत.