इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) पहिल्या दोन्ही विजयांत द्विशतकी धावसंख्या उभारणाऱ्या राजस्थान रॉयल्सची विजयी घोडदौड रोखण्यासाठी बुधवारी कोलकाता नाइट रायडर्सच्या फलंदाजांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

‘आयपीएल’च्या हंगामाला प्रारंभ होण्यापूर्वी माफक अपेक्षा करण्यात आलेल्या राजस्थानने प्रत्यक्षात मात्र वादळी कामगिरी करीत सर्वाचे लक्ष वेधले आहे. महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला अस्मान दाखवल्यानंतर मागील सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचे यंदाच्या हंगामातील सर्वाधिक २२४ धावसंख्येचे लक्ष्यही त्यांनी दिमाखात पेलले. आतापर्यंत राजस्थानच्या प्रवासात संजू सॅमसन आणि राहुल तेवातिया हे दोन तारे त्यांना गवसले आहेत. पंजाबविरुद्ध हरयाणाचा उदयोन्मुख अष्टपैलू खेळाडू तेवातियाने ३१ चेंडूंत धडाके बाज ५३ धावा केल्या. सुरुवातीला २३ चेंडूंत फक्त १७ धावा करणाऱ्या तेवातियाने अखेरच्या तीन षटकांत संघाला ५१ धावांची आवश्यकता असताना जोरदार आक्रमण केले. त्याने डावखुरा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेलला एका षटकात पाच षटकारांची आतषबाजी केली. त्यामुळेच सामन्याच्या निकालाला कलाटणी मिळाली.

केरळचा यष्टीरक्षक-फलंदाज सॅमसनने सलग दोन अर्धशतके  झळकावून भारतीय संघातील यष्टीरक्षक-फलंदाजाच्या स्थानासाठी दावेदारी भक्कम केली आहे. कर्णधार स्टीव्ह स्मिथनेही दोन्ही सामन्यांत अर्धशतके  नोंदवून आपले सातत्य दाखवून दिले आहे. सलामीवीर जोस बटलरच्या फटके बाजीची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

राजस्थानच्या अवघड आव्हानाला सामोरे जाताना कोलकाता नाइट रायडर्सची प्रमुख मदार आंद्रे रसेल आणि विश्वविजेता इंग्लिश कर्णधार इऑन मॉर्गन यांच्यावर आहे. अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणाऱ्या या दोन्ही खेळाडूंना आतापर्यंत मर्यादित संधी मिळाली आहे. गतवर्षीच्या हंगामातील सर्वाधिक ५१० धावा करणाऱ्या रसेलला फलंदाजीत वरचा क्रमांक देण्याची आवश्यकता आहे.

युवा सलामीवीर शुभमन गिलने नाबाद अर्धशतक साकारले. त्यामुळेच हैदराबादविरुद्ध दोन षटके राखूनच कोलकाताला विजय मिळवता आला. यंदाच्या हंगामात दोन सामने सुपर ओव्हपर्यंत रंगले होते.

* सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, हिंदी १, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १