29 November 2020

News Flash

IPL 2020: पंजाबचा कोलकाताला विजयी ‘पंच’; मनदीप, गेलची दमदार अर्धशतकं

मनदीपच्या नाबाद ६६ धावा

ख्रिस गेल, मनदीप सिंग (फोटो- IPL.com)

कोलकाता विरूद्धच्या सामन्यात पंजाबच्या संघाने ८ गडी राखून दमदार विजय मिळवला. गिल-मॉर्गन जोडीची महत्त्वाची भागीदारी आणि लॉकी फर्ग्युसनने शेवटच्या षटकांमध्ये केलेली फटकेबाजी यांच्या बळावर कोलकाताच्या संघाने २० षटकांत केवळ १४९ धावांपर्यंतच मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाकडून मनदीप सिंग (६६*) आणि ख्रिस गेल (५१) यांनी दमदार अर्धशतकं ठोकली. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा हा सलग पाचवा तर स्पर्धेतील सहावा विजय ठरला. पंजाबने या विजयाच्या जोरावर चौथ्या स्थानी विराजमान होत स्पर्धेतील आव्हान कायम राखले.

नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाताच्या डावाची सुरूवात अतिशय खराब झाली. नितीश राणा पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. त्यानंतर शमीने दुसऱ्याच षटकात राहुल त्रिपाठी (७) आणि दिनेश कार्तिकला (०) माघारी धाडलं. पण शुबमन गिल आणि कर्णधार मॉर्गन यांनी पलटवार करत दमदार ८० धावांची भागीदारी केली. मॉर्गनने २५ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ४० धावा केल्या. मॉर्गन बाद झाल्यावर पुन्हा कोलकाताच्या डावाला गळती लागली. पण शुबमन गिलने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने ४५ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकार खेचत ५७ धावा केल्या. शेवटच्या काही षटकांमध्ये १३ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २१ धावा केल्या. त्यामुळे कोलकाताला १४९ धावांपर्यंत मजल मारता आली. मोहम्मद शमीने ३, जॉर्डन, बिश्नोईने २-२ तर मुरुगन अश्विन, मॅक्सवेलने प्रत्येकी १ बळी टिपला.

शुबमन गिलचं दमदार अर्धशतक

या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार लोकेश राहुल आणि मनदीप सिंग या दोघांनी दमदार सुरूवात केली. ४७ धावांची सलामी दिल्यानंतर लोकेश राहुल बाद झाला. वरूण चक्रवर्तीने त्याला २८ धावांवर माघारी धाडलं. त्यानंतर ख्रिस गेलने मनदीप सिंगच्या साथीने डावाला अपेक्षित गती दिली. मनदीप सिंग आणि ख्रिस गेल दोघांनीही शानदार अर्धशतक झळकावली. ख्रिस गेलने २९ चेंडूत ५१ धावा केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2020 9:29 pm

Web Title: ipl 2020 kxip vs kkr kings xi punjab bowlers restrict kolkata knight riders to 149 in 20 overs mohd shami chris jordan ravi bishnoi kl rahul chris gayle dinesh karthik eoin morgan shubman gill lockie
टॅग IPL 2020
Next Stories
1 Video: सुपर स्विंग! एकाच ओव्हरमध्ये शमीचे दोन बळी
2 IPL 2020 : विक्रमी सामन्यात अपयशाचा डाग, दिनेश कार्तिक शून्यावर बाद
3 IPL 2020: राहुलचा ‘मास्टरस्ट्रोक’! नितीश राणासमोर ‘या’ गोलंदाजाला आणलं अन्…