आयपीएलच्या तेराव्या हंगामात प्ले-ऑफची शर्यत आता अधिकच रंगतदार झाली आहे. दुबईच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात मनिष पांडे आणि विजय शंकर यांच्या नाबाद अर्धशतकी खेळाच्या जोरावर सनराईजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर ८ गडी राखून मात केली. राजस्थानने विजयासाठी दिलेल्या १५५ धावांचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो स्वस्तात माघारी परतले. मात्र यानंतर विजय शंकरच्या साथीने मनिष पांडेने संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

मैदानावर स्थिरावल्यानंतर मनिष पांडेने राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई केली. ४७ चेंडूत ४ चौकार आणि ८ षटकार लगावत मनिषने नाबाद ८३ धावांची खेळी केली.

२ बाद १६ अशी बिकट परिस्थिती असताना मनिष पांडे आणि विजय शंकर जोडीने मैदानावर स्थिरावत संयमी खेळ करत राजस्थानच्या गोलंदाजांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. तिसऱ्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी नाबाद १४० धावांची भागीदारी केली. आयपीएलमध्ये सनराईजर्स हैदराबादकडून शतकी भागीदारी करणारी विजय शंकर आणि मनिष पांडे ही पहिली भारतीय जोडी ठरली आहे.

राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने हैदराबादची ही जोडी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतू जोफ्रा आर्चर वगळता राजस्थानच्या एकाही गोलंदाजाला यश आलं नाही.