आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जची कामगिरी आतापर्यंत फारशी चांगली राहिलेली नाही. सलग तीन सामना हरल्यानंतर चेन्नईने पंजाबवर १० गडी राखून मात केली. संघ ट्रॅकवर आला आहे असं वाटत असतानाच अबु धाबीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नईवर १० धावांनी मात केली. एका क्षणाला सामन्यात वरचढ असणारा चेन्नईच्या संघाने हाराकिरी करुन सामना गमावला.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या काय आहे Mid Season Transfer ची संकल्पना?

सुरेश रैना, हरभजन सिंह यांची अनुपस्थितीत, खेळाडूंचं कामगिरीत नसलेलं सातत्य या सर्व गोष्टींमुळे चेन्नईचा संघ सध्या संकाटात सापडला आहे. चेन्नईच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर मिड सिझन ट्रान्स्फरच्या माध्यमातून नवीन खेळाडूंना संघात स्थान देण्याची मागणी केली आहे. अनेकांनी दिल्ली कॅपिटल्स संघाच्या अजिंक्य रहाणेला चेन्नईकडून संधी मिळावी अशीही मागणी केली आहे. CSK संघाची सध्याची परिस्थिती पाहता ३ खेळाडू संघासाठी फायदेशीर ठरु शकतात. Mid Season Transfer च्या माध्यमातून चेन्नई या खेळाडूंना आपल्या संघात घेऊ शकतं. पाहूयात कोणते पर्याय चेन्नईसमोर उपलब्ध आहेत…

१) अजिंक्य रहाणे – बाराव्या हंगामापर्यंत राजस्थानचं प्रतिनिधीत्व करणारा अजिंक्य रहाणे यंदा दिल्लीच्या संघात आला आहे. परंतू तेराव्या हंगामात आतापर्यंत अजिंक्य एकही सामना खेळलेला नाही. दिल्लीच्या संघाची घडी बसलेली असल्यामुळे अजिंक्यला संघात आपली जागा निर्माण करण्यासाठी थोडी वाट पहावी लागणार आहे. अजिंक्य रहाणेकडे आयपीएलमध्ये खेळण्याचा पूरेसा अनुभव आहे. चेन्नईच्या फलंदाजीची सध्या परिस्थिती पाहता अजिंक्य रहाणेला संघात घेण्यासाठी CSK प्रयत्न करु शकतं. रहाणे संघात आल्यास चेन्नईच्या फलंदाजीत स्थैर्य येईल, असा अनेकांचा अंदाज आहे.

१४० सामने, ३ हजार ८२० धावा, ३२.९३ ची सरासरी, १२१.९२ चा स्ट्राईक रेट, दोन शतकं आणि २७ अर्धशतक असा भक्कम अनुभव असलेला अजिंक्य रहाणे चेन्नईच्या संघात आल्यास चेन्नईचे अनेक प्रश्न सुटू शकतात.

अवश्य वाचा – IPL 2020 : Mid Season Transfer साठी अजिंक्य रहाणे उपलब्ध?? दिल्ली कॅपिटल्स म्हणतं…

२) पार्थिव पटेल – देवदत पडीकलमुळे पार्थिव पटेलला यंदा RCB कडून एकही सामना खेळायला मिळालेला नाही. भारतीय संघाच्या शर्यतीत पार्थिव पटेल सध्या नसला तरीही आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी चांगली आहे. सध्याच्या घडीला शेन वॉटसन आणि फाफ डु-प्लेसिस या जोडीवर भरवसा दाखवायचा ठरवल्यास पार्थिव पटेलच्या अनुभवाचा फायदा चेन्नईला मधल्या फळीत होऊ शकतो. तसेच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठीही पार्थिव पटेल चेन्नईसाठी चांगला पर्याय ठरु शकतो.

३) विराट सिंह – SRH संघात स्थान मिळालेल्या विराट सिंहने गेल्या हंगामात स्थानिक क्रिकेटमध्ये झारखंडकडून खेळताना चांगली कामगिरी केली होती. विजय हजारे करंडकात ७ सामन्यांत विराट सिंहने ३३५ धावा केल्या होत्या. याचसोबत सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतही त्याने ३४२ धावा केल्या होत्या. त्यामुळे एखाद्या नवीन खेळाडूवर विश्वास दाखवायचा झाल्यास CSK चं प्रशासन विराट सिंहचाही विचार करु शकतं.