आयपीएलच्या तेराव्या हंगामात पदार्पण करणाऱ्या कल्याणच्या तुषार देशपांडेने आपली छाप पाडली आहे. हर्षल पटेलला विश्रांती देत दिल्लीने राजस्थानविरुद्ध सामन्यात तुषार देशपांडेला संघात संधी दिली. तुषारनेही आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करत राजस्थान रॉयल्सच्या बेन स्टोक्सचा महत्वाचा बळी घेत संघाला यश मिळवून दिलं. १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाची सुरुवात अडखळत झाली. जोस बटलर आणि स्टिव्ह स्मिथ लागोपाठ माघारी परतल्यानंतर बेन स्टोक्सने संजू सॅमसनच्या साथीने संघाचा डाव सावरला.

स्टोक्सने दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेत फटकेबाजी करत ३५ चेंडूत ६ चौकार लगावत ४१ धावा केल्या. स्टोक्स आणि सॅमसनची जोडी मैदानात जम बसवते आहे असं वाटत असतानाच दिल्लीचा बदली कर्णधार शिखर धवनने तुषार देशपांडेला संधी दिली. तुषारनेही आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करत बेन स्टोक्सला आपल्या जाळ्यात अडकवलं. पुढे येऊन मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात स्टोक्स देशपांडेच्या गोलंदाजीवर बदली खेळाडू ललित यादवकडे झेल देऊन माघारी परतला. तुषारने घेतलेल्या या बळीमुळे बॅकफूटवर जाणाऱ्या दिल्लीने पुन्हा एकदा सामन्यात पुनरागमन केलं.

अवश्य वाचा – कल्याण ते युएई व्हाया मुंबई, जाणून घ्या पहिला IPL सामना खेळणाऱ्या मराठमोळ्या तुषार देशपांडेविषयी