आयपीएलच्या तेराव्या हंगामात सलग तीन पराभवांचा सामना करावा लागल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जने पंजाबविरुद्धच्या सामन्यात चांगलं पुनरागमन केलं. कर्णधार लोकेश राहुलचं अर्धशतक आणि निकोलस पूरनची फटकेबाजी यामुळे पंजाबचा संघ सामन्यात मोठी धावसंख्या उभारेल असं वाटत होतं. परंतू चेन्नईच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये दमदार पुनरागमन करत पंजाबला १७८ धावांवर रोखलं. यात मोलाची भूमिका बजावली ती मुंबईच्या शार्दुल ठाकूरने.

शार्दुलने सामन्यात ४ षटकांत ३९ धावांत देत २ बळी घेतले. परंतू शेवटचं षटक टाकताना शार्दुलने पंजाबच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधीच दिली नाही. सरफराज खान आणि ग्लेन मॅक्सवेल यासारखे फटकेबाजी करणारे फलंदाज मैदानावर असतानाही शार्दुलने अखेरच्या षटकात फक्त १२ चं धावा दिल्या. विरेंद्र सेहवागने या कामगिरीसाठी त्याचं कौतुक करत, ठोकर खाऊनच माणूस ठोकूर बनतो अशा शब्दांत त्याचं कौतुक केलं.

याआधी १८ वं षटक टाकत असतानाही शार्दुलने लोकेश राहुल आणि निकोलस पूरन या खेळपट्टीवर स्थिरावलेल्या फलंदाजांना माघारी धाडत पंजाबला दोन मोठे धक्के दिले. हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यामुळे अखेरच्या षटकांत पंजाबचे नवखे फलंदाज मैदानावर आले, ज्याचा फटका त्यांना बसला.

शार्दुल ठाकूरच्या दोन बळींव्यतिरीक्त चेन्नईकडून रविंद्र जाडेजा आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. चेन्नईच्या इतर गोलंदाजांना विकेट घेता आली नाही.