सलामीवीर इशान किशनचं अर्धशतक आणि त्याला क्विंटन डी-कॉकने दिलेली भक्कम साथ या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ९ गडी राखून विजय मिळवला. प्ले-ऑफ्सचं तिकीट मिळवलेल्या मुंबईने दिल्लीवर मात करत इतर दिल्लीची ‘प्ले-ऑफ्स’साठीची वाट खडतर केली. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट या दोघांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या बळावर मुंबईने दिल्लीला ११० धावांवर रोखलं. हे माफक आव्हान मुंबईने सहज पार केले.

१११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किशन आणि डी-कॉक जोडीने पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. सलामीची जोडी मुंबईला विजय मिळवून देणार असं वाटत असताना डी-कॉक बाद झाला. परंतू यानंतर इशानने सूर्यकुमारच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. इशान किशनने नाबाद ७२ धावांची खेळी केली.यात ८ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. IPL कारकिर्दीतील हे त्याचं सहावं अर्धशतक ठरलं. याचसोबत त्याने ६ अर्धशतकं ठोकणाऱ्या ग्लेन मॅक्सवेल, हर्षल गिब्स, ब्रॅड हॉज या दिग्गजांच्या कामगिरीशी बरोबरी केली.

कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर शिखर धवन आणि मुंबईकर पृथ्वी शॉ झटपट बाद झाले. कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी केली. हे दोघे मोठी भागीदारी करणार असं वाटत असताना राहुल चहरच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यर स्टंपिंग झाला. अय्यरने २५ धावा केल्या. पाठोपाठ पंतदेखील २१ धावांवर माघारी परतला. हे दोघे बाद झाल्यानंतर दिल्लीच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी ३-३ तर कुल्टर-नाईल आणि चहर यांनी १-१ बळी घेतला आणि दिल्लीला ११० धावांवरच रोखले.