आयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिलाच सामना खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने सुपरओव्हरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात केली. इशांत शर्माला दुखापत झाल्यामुळे तो पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. त्याच्या जागेवर कगिसो रबाडा व इतर गोलंदाजांनी दिल्लीची बाजू सांभाळली. सरावादरम्यान इशांतच्या पाठीला दुखापत झाली होती. या दुखापतीमधून इशांत अद्याप सावरु शकलेला नाहीये, त्यामुळे दिल्लीच्या आगामी दोन सामन्यांमध्येही तो खेळण्याची शक्यता कमी आहे.

“इशांतला सावरण्यासाठी अजुन थोडा वेळ लागेल, अंदाजे दोन सामन्यांना तो मुकेल असं वाटतंय. इशांतवर कोणताही दबाव नाहीये, त्याला बरं होण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा वेढ देण्यात येईल. दुखापतीमधून सावरल्यानंतरच त्याला अंतिम ११ संघात स्थान मिळेल.” दिल्लीच्या संघातील सूत्रांनी माहिती दिली. दुखापत हा खेळाडूच्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे. ज्यावेळी इशांतला त्रास जाणवायला लागला त्यावेळी त्याने तात्काळ फिजीओची मदत घेऊन उपचार सुरु केले आहेत. तो लवकरच दिल्ली संघाकडून खेळताना दिसेल अशीही माहिती सूत्राने दिली.

किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात दिल्लीकडून स्टॉयनिसने महत्वाची भूमिका बजावली. फलंदाजीदरम्यान फटकेबाजी करत स्टॉयनिसने दिल्लीला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. तर गोलंदाजीत अखेरचं षटक टाकत असताना पंजाबला विजयासाठी अवघ्या एका धावेची गरज असताना स्टॉयनिसने दोन बळी घेत सामना बरोबरीत सोडवला. यानंतर सुपरओव्हरमध्ये कगिसो रबाडाने दोन बळी घेत फक्त दोन धावा दिल्या. विजयासाठी आवश्यक असलेल्या ३ धावा दिल्लीने सहज पूर्ण केल्या.