आयपीएलचा तेरावा हंगाम महेंद्रसिंह धोनी आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघासाठी फारसा चांगला गेलेला नाही. एरवी अंतिम फेरीच्या शर्यतीत असणारा हा संघ यंदा गुणतालिकेत तळातल्या स्थानावर फेकला गेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनीची फटकेबाजी आयपीएलच्या मैदानावर पहायला मिळेल अशी चाहत्यांना आशा होती परंतू इकडेही धोनीने निराशाच केली. याव्यतिरीक्त संघ निवडीत चुकीच्या खेळाडूंना दिलेला पाठींबा, उशीरा फलंदाजीसाठी येणं यामुळेही चाहते धोनीवर नाराज आहेत. संघाची आणि स्वतःची कामगिरी फारशी चांगली झालेली नसली तरीही धोनीने आयपीएलच्या तेराव्या हंगामात जाहीरातींमधून रग्गड कमाई केली आहे. Mutual Fund, Digital Accounting Platform Khatabook, Dream 11, PokerStar अशा अनेक ब्रँडच्या जाहीरातींमधून धोनीने यंदा अंदाजे १२०-१५० कोटींची कमाई केली आहे.

अवश्य वाचा – समजून घ्या : आयपीएलमध्ये धोनी अपयशी ठरण्यामागची कारणं…

TAM Media Research या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार धोनीने आयपीएलच्या तेराव्या हंगामादरम्यान १६ ब्रँडच्या जाहीराती केल्या. ज्यामुळे तो सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे. या माध्यमातून धोनीने किमान १५० कोटींची कमाई केली आहे. मार्केटमधील तज्ज्ञ मंडळीच्या मतानुसार धोनी एक चांगला खेळाडू तर आहेच पण तो अभिनयही चांगला करतो. प्रत्येक बँडच्या जाहीरातीदरम्यान त्याच्या देहबोलीमुळे ग्राहकांना ब्रँडबद्दल एक विश्वास निर्माण होतो.

अवश्य वाचा – BLOG : धोनीकडून पळवाट शोधण्याचा प्रयत्न??

तेराव्या हंगामात धोनी आणि चेन्नईसमोरचं आव्हान आता अधिक खडतर होत जाणार आहे. शुक्रवारी, चेन्नईसमोर मुंबई इंडियन्सचं आव्हान असणार आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमधली खराब कामगिरी लक्षात घेता पुढील सामन्यांमध्ये नवीन खेळाडूंना संधी देण्याबद्दल भाष्य धोनीने केलं होतं. तेराव्या हंगामात सलामीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईवर मात करत धडाकेबाज सुरुवात केली होती. परंतू यानंतर त्यांची गाडी रुळावरुन घसरली. त्यामुळे मुंबईविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.