IPL 2020च्या सलामीच्या सामन्याला अवघे ९ दिवस राहिले आहेत. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांमध्ये गेल्या हंगामाचा अंतिम सामना रंगला होता. त्या सामन्यात अवघ्या एका धावेने मुंबई इंडियन्सचा संघ विजयी झाला होता. त्याच जोशात मुंबईचा संघ मैदानात उतरेल हे नक्की. मुंबई इंडियन्सच्या संघातील जवळपास सर्व खेळाडू आता युएईमध्ये दाखल झाले असून सराव सत्रात त्यांची जोरदार फलंदाजी आणि गोलंदाजी पाहायला मिळत आहे. याचदरम्यान, मुंबई इंडियन्सच्या एका धडाकेबाज खेळाडूचा IPLसाठी खास नवा लूक समोर आला आहे.
मुंबई संघाचा स्टायलिश खेळाडू म्हणून हार्दिक पांड्याची ओळख आहे. हार्दिक कायम नवनव्या लूकमध्ये दिसत असतो. पण यावेळी हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्या हा नव्या लूकमध्ये दिसला आहे. त्याने आपल्या इस्टाग्राम अकाऊंटवर चार फोटो पोस्ट केले आहेत. त्या फोटोंमध्ये त्याचा नवा लूक दिसतो आहेत. त्या फोटो खाली त्याने ‘नवा हंगाम, नवा लूक’ असं कॅप्शनदेखील दिलं आहे.
दरम्यान, यंदाच्या हंगामात अनेक बड्या खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यात मुंबई इंडियन्सचा अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा याचा समावेश आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि ऑस्ट्रेलियाचा जेम्स पॅटीन्सन हे दोन परदेशी वेगवान गोलंदाज मुंबईच्या ताफ्यात आहेत, पण फिरकी गोलंदाजीची धुरा कृणाल पांड्या आणि राहुल चहर यांच्या खांद्यावर असणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 10, 2020 6:35 pm