मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये काल झालेल्या सामन्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. सूर्यकुमार यादवच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने विराट कोहलीच्या RCB वर दणदणीत विजय मिळवला. पण त्याचवेळी हार्दिक पांडया आणि RCB च्या खेळाडूंमध्ये मैदानावर झालेला राडा, विराटच्या स्लेजिंगकडे सूर्यकुमार यादवने केलेले दुर्लक्ष यामुळे देखील हा सामना चांगलाच गाजला.

सूर्यकुमार यादवने काल नाबाद ७९ धावांची जी खेळी केली, त्यामागे भारतीय संघात निवड न झाल्याचे शल्य देखील आहे. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करुन सुद्धा सूर्यकुमारला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही.

सूर्यकुमारला यादवला वगळण्याच्या निर्णयावर अनेकांनी नाराजी प्रगट केली आहे. जिंकलस भावा, तू संघात नाही हे आमचं नुकसान आहे. तुझ्याकडे प्युअर क्लास आहे. असं एका टि्वटर युझरने म्हटलं आहे.

सूर्यकुमारने भारतीय कर्णधाराला दाखवून दिलं. त्याच्या ताफ्यात काय नाहीय.

सूर्यकुमार आणि विराट कोहलीमधला परस्पराकडे एकटक पाहण्याचा खेळच सर्वकाही सांगून गेला. तो एका मिशनवर आहे. भारतीय संघात निवड न झाल्याचं त्याच्या मनाला लागलयं असे एका युझरने म्हटले आहे.

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि मुंबईकर क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर निवड समितीवर चांगलेच भडकले. भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी त्याला आणखी काय करावं लागणार आहे हे मला माहिती नाही. कोणताही फलंदाज आपल्या वयाच्या २६ ते ३४ या वयात चांगल्या फॉर्मात असतो. सूर्यकुमार सध्या तिशीत आहे. जर चांगला फॉर्म आणि फिटनेस हा भारतीय संघात निवड होण्याचा निकष नसेल तर नेमका निकष आहे तरी काय?? मला खरंच कोणीतरी समजावून सांगेल का?? असा प्रश्न वेंगसरकर यांनी विचारला.