संयुक्त अरब अमिरातीमधील प्रचंड उष्ण वातावरणात मोठी खेळी साकारणे आव्हानात्मक ठरले असले तरी यातून योग्य धडाही मिळाला, अशी प्रतिक्रिया मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केली.

कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध बुधवारी झालेल्या सामन्यात रोहितने ५४ चेंडूंत ८० धावांची खेळी साकारून मुंबई इंडियन्सला ४९ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर रोहित म्हणाला, ‘‘अमिरातीत मोठी खेळी साकारणे सोपे नाही. त्यामुळे अखेरीस मला प्रचंड ताण जाणवत होता. एक स्थिरावलेला फलंदाज अखेपर्यंत मैदानावर टिकणे आवश्यक आहे. ‘आयपीएल’ अमिरातीत होण्याच्या उद्देशाने आम्ही सराव केला नव्हता. वानखेडे स्टेडियमच्या दृष्टीने आमच्या वेगवान माऱ्याची रचना होती. एकंदरीत संघाच्या कामगिरीबाबत मी समाधानी आहे.’’