युएईत आयपीएलचा तेरावा हंगाम आता रंगात आलेला आहे. प्रत्येक सामन्यात फलंदाज चौकार-षटकारांची आतिषबाजी करत आहेत. विशेषकरुन शारजाच्या मैदानावर रंगणाऱ्या प्रत्येक सामन्यांत २०० ची धावसंख्या पार केली जात आहे. रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद सामन्यातही मुंबईने २०० धावांचा टप्पा पार केला. प्रत्येक सामन्यात शारजाच्या मैदानावर होणारी फटकेबाजी पाहता, माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी शारजाच्या मैदानावर नियमांमध्ये बदल करण्याची मागणी केली आहे.

चेंडू थेट सीमारेषेबाहेर गेला तर षटकार आणि चेंडू थेट मैदानाबाहेर गेला तर षटकार असा नियम शारजाच्या मैदानावर करायला हवा अशा आशयाचं गमतीशीर ट्विट संजय मांजरेकर यांनी केलं आहे.

दरम्यान, गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपला विजयी परंपरा कायम राखली आहे. शारजाच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनराईजर्स हैदराबादवर ३४ धावांनी मात केली. २०९ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला हैदराबादचा संघ १७४ धावांपर्यंतच मजल मारु शकला. हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ६० धावांची खेळी करत आक्रमक खेळी केली. परंतू दुसऱ्या बाजूने त्याला योग्य साथ मिळाली नाही. मुंबईच्या गोलंदाजांनीही या सामन्यात टिच्चून मारा करत हैदराबादला फार मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही.