पंजाबविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाने १६० धावांच्या पार मजल मारली. अप्रतिम लयीत असणाऱ्या शिखर धवनने सलग दुसरं नाबाद शतक झळकावत दिल्लीला २० षटकांत ५ बाद १६४ धावांची मजल मारून दिली. दिल्लीचे फलंदाज एकीकडे बाद होत असताना धवनने मात्र पंजाबच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि नाबाद १०६ धावांची खेळी केली.

दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना पृथ्वी शॉचा बळी लवकर गमावला. एका चौकारासह ७ धावा काढून तो बाद झाला. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत दोघांनाही चांगली सुरूवात मिळाली पण त्यांना मोठी धावसंख्या करता आली नाही. दोघेही वैयक्तिक १४ धावांवर माघारी परतले. मार्कस स्टॉयनीस ९ धावांवर तर शिमरॉन हेटमायरदेखील १० धावांवर बाद झाला. पण शिखर धवनने एक बाजू लावून धरली आणि अप्रतिम शतक लगावले. त्याने ६१ चेंडूत नाबाद १०६ धावांची खेळी केली. त्यात १२ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.

धवनचं धडाकेबाज शतक-

शिखर धवनने आपली लय कायम राखत धमाकेदार शतक ठोकलं. कर्णधार श्रेयस अय्यर, दुखापतीनंतर संघात संधी मिळालेला ऋषभ पंत, अष्टपैलू मार्कस स्टॉयनीस आणि धडाकेबाज शिमरॉन हेटमायर यांच्यासोबत भागीदारी करत शिखर धवनने दमदार शतक पूर्ण केलं. यंदाच्या हंगामात आणि IPL कारकिर्दीत त्याचं हे सलग दुसरं शतक ठरलं. IPLमध्ये दोन शतकं लगावणारा तो नववा फलंदाज ठरला.