बंगळुरू आणि राजस्थान यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात स्टीव्ह स्मिथने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आतापर्यंत झालेले सर्व सामने हे संध्याकाळी सुरू झाले होते. पण हा सामना दुपारी साडेतीन वाजता सुरू झाला, त्यामुळे प्रचंड उष्ण वातावरणात राजस्थानच्या खेळाडू फलंदाजी करावी लागली. त्याचा फटका त्यांच्या महत्त्वाच्या फलंदाजांना बसला. राजस्थानचे सलामीवीर स्टीव्ह स्मिथ आणि जोस बटलर दोघेही स्वस्तात बाद झाले. स्मिथ ५ तर बटलर २२ धावांत माघारी परतला, पण खरी चर्चा संजू सॅमसनच्या विकेटची रंगली.

स्मिथ बाद झाल्यावर संजू सॅमसन मैदानात आला. पण त्याला फार मोठी कामगिरी करता आली नाही. चौथ्या षटकात आपला सामन्यातील पहिला चेंडू टाकण्यासाठी फिरकीपटू युजवेंद्र चहल आला. त्याने योजनाबद्ध प्रकारे चेंडू टाकला आणि तो चेंडू सॅमसनने समोर ढकलला. चेंडू चहलच्या दिशेने जात असतानाच जमिनीच्या दिशेनेही जाऊ लागला. ते पाहताच चहलने अतिशय चपळतेने आपल्या उजव्या दिशेला झेप घेत त्याचा झेल टिपला. चेंडू जमिनीला लागतो की काय असं वाटत असतानाच त्याने तो झेल घेतला.

मैदानावरील पंचांनी शंका आल्याने त्यांनी तिसऱ्या पंचांनी मदत घेतली पण तिसऱ्या पंचांनीही सॅमसनला बाद घोषित केले. सॅमसनने ३ चेंडूत ४ धावा केल्या. दरम्यान, संजू सॅमसन बाद झाल्यावर सोशल मीडियावर तो नाबाद असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या पाहायला मिळाल्या.