बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात राजस्थानच्या संघाने २० षटकात १७७ धावांपर्यंत मजल मारली. स्टीव्ह स्मिथचं दमदार अर्धशतक आणि रॉबिन उथप्पाला गवसलेला सूर यांच्या बळावर राजस्थानने बंगळुरूला १७८ धावांचे लक्ष्य दिले. राजस्थानकडून स्मिथने ३६ चेंडूत ५७ धावांची तडाखेबाज खेळी केली.

सामन्यात बंगळुरूचा वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिसने भेदक मारा करत ४ षटकांत २६ धावा दिल्या आणि ४ बळी टिपले. रॉबिन उथप्पा आणि बेन स्टोक्स यांनी तडाखेबाज सुरूवात केली. तेव्हा मॉरिसने स्टोक्सला बाद करत राजस्थानला पहिला धक्का दिला. त्यानंतर मधल्या फळीत स्थिरावलेल्या जोस बटलर आणि स्टीव्ह दोघांनाही त्याने चेंडूच्या वेगात बदल करत झेलबाद होण्यास भाग पाडले. तर सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर त्याने जोफ्रा आर्चरला यॉर्कर चेंडूवर पायचीत केले.

पाहा ख्रिस मॉरिसचे ४ बळी-

नाणेफेक जिंकून राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने प्रथम फलंदाजी निर्णय घेतला. बेन स्टोक्ससोबत सलामीला रॉबिन उथप्पाला पाठवण्यात आले. हा डाव चांगलाच यशस्वी ठरला. उथप्पाने ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने एकूण २२ चेंडूत ४१ धावा कुटल्या. तर बेन स्टोक्स १५ धावांवर बाद झाला. संजू सॅमसनही स्वस्तात परतला. पण कर्णधार स्टीव्ह स्मिथने चांगली खेळी केली. त्याला जोस बटलरने साथ दिली. बटलर २४ धावांवर बाद झाला. स्मिथने मात्र अर्धशतकी खेळी केली. त्याने ३६ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकार खेचत ५७ धावा केल्या. शेवटच्या षटकांत राहुल तेवातियाने ११ चेंडूत १९ धावा करत संघाला १७७ पर्यंत नेले. ख्रिस मॉरिसने अप्रतिम गोलंदाजी करत २६ धावांत ४ बळी घेतले. तर चहलने ३४ धावांत २ बळी टिपले.