भारतीय कर्णधार विराट कोहली हा आक्रमक क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. मैदानात प्रतिस्पर्धी संघाच्या ‘आरे ला कारे’ करण्यासाठी तो कायम तयार असतो. सुरुवातीच्या काळात विराटच्या या आक्रमक स्वभावावर टीका करण्यात आली होती, पण हळूहळू तो कर्णधार म्हणून परिपक्व झाला. गेले काही वर्षे विराट भारतीय संघ आणि RCB च्या संघाची धुरा सांभाळतो आहे. भारताने विराटच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय कामगिरी केली आहे, पण बंगळुरूच्या संघाला अद्याप अपेक्षित यश मिळालेले नाही. याची अनेकदा चर्चा केली जाते. याचदरम्यान RCBचे माजी प्रशिक्षक रे जेनिंग्स यांनी विराटबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

रे जेनिंग्स हे RCBचे २००९ ते २०१४ या काळात मुख्य प्रशिक्षक होते. त्यांच्या प्रशिक्षणाच्या काळात विराट कोहली हा खूपच नवखा खेळाडू होता. त्याच्याबद्दल क्रिकेटडॉटकॉमशी बोलताना त्यांनी काही विधाने केली. “जर माझ्या काळातील IPLबद्दल बोलायचे झाले तर तेव्हा प्रत्येक संघ जवळपास २५ ते २० खेळाडूंचा चमू घेऊन सराव करायचो. प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीचे निरिक्षण आणि परिक्षण ही प्रशिक्षकाची जबाबदारी होती. त्यावेळी विराट कोहली हा थोडासा आत्मकेंद्री आणि एकलकोंडा होता. त्यामुळे त्याने काही वेळा चुकीच्या खेळाडूंना पाठिंबा दिला. पण मी त्यासाठी त्याला दोषी ठरवणार नाही. कारण मला काही खेळाडूंकडून अपेक्षा होत्या, तर त्याच्या डोक्यात काही खेळाडूंसाठी योजना होत्या”, असे जेनिंग्स म्हणाले.

IPL आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सहा आठवड्यांच्या स्पर्धेत काही खेळाडूंना सूर गवसतो तर काही खेळाडूंची कामगिरी अगदी खराब होते. त्यामुळे संघातील काही खेळाडूंनी संघासाठी ठामपणे उभे राहणे आवश्यक असते. मी संघाचा प्रशिक्षक असताना काही खेळाडू जास्त सामने खेळू शकले असते, पण विराटची त्यांच्याबद्दल वेगळी मतं होती. पण हे सारं भूतकाळात घडून गेलं. सध्या कर्णधार म्हणून विराट खूप परिपक्व होतोय हे पाहून मला आनंद आहे. मला खात्री आहे की तो एक ना एक दिवस IPLच्या ट्रॉफीवरही नाव कोरेल”, असा विश्वासही जेनिंग्स यांनी व्यक्त केला.