दिल्ली कॅपिटल्सवर ५७ धावांनी मात करत गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. फलंदाजीत इशान किशन, हार्दिक पांड्याने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने २०० धावांचा टप्पा ओलांडला. तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट यांनी भेदक मारा करत दिल्लीची आघाडीची फळी कापून काढली. ५० धावा व्हायच्या आतच दिल्लीचा निम्मा संघ माघारी परतला होता.

एकीकडे मुंबईचे इतर गोलंदाज चांगली कामगिरी करत असताना फिरकीपटू राहुल चहरचा दिवस मात्र खराब केला. त्याच्या दोन षटकांत दिल्लीच्या फलंदाजांनी तब्बल ३५ धावा कुटल्या. दिल्लीकडून अर्धशतकी खेळी करणाऱ्या स्टॉयनिसने चहरला आपलं लक्ष्य केल्यानंतर रोहितने पुन्हा चहरला संधी दिली नाही. परंतू सामना संपल्यानंतर राहुल चहरचा आत्मविश्वास कमी होऊ नये यासाठी रोहितने राहुल चहरला विजयी संघाचं नेतृत्व करत ड्रेसिंग रुमपर्यंत जायला सांगितलं. आपल्या खेळाडूचा आत्मविश्वास कमी होऊ नये यासाठी रोहितने केलेली ही छोटीशी कृती नेटकऱ्यांचं मन जिंकून गेली आहे. पाहा हा व्हिडीओ…

मुंबईविरुद्ध सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर दिल्लीला आता हैदराबाद आणि बंगळुरु यांच्यातील विजेत्यासोबत दुसऱ्या एलिमिनेटर सामन्यात खेळावं लागणार आहे. त्यामुळे दिल्लीचा संघ आता आपल्या रणतिनीत काय बदल करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.